इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१

◆ आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जिल्हाधिकारी पंधरवड्यात निर्गत लावणार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आयुक्त व मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करणार ◆आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याच्या दिल्या सूचना

 



 



कोल्हापूर, दि. 29 (जिमाका):  आंबेओहोळ प्रकल्पातील 106 प्रकल्पग्रस्तांना जमीन व आर्थिक सहाय्य देणे बाकी आहे. या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जिल्हाधिकारी येत्या पंधरवड्यात निर्गत लावण्यासाठी प्रयत्न करतील. आयुक्त व मंत्रालय स्तरावर स्वतः ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ पाठपुरावा करणार असल्याचे आज आंबेओहोळ प्रकल्पाबाबत झालेल्या आढावा बैठकीत ठरले.

           ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आंबेओहोळ प्रकल्प पुनर्वसनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, गडहिंग्लज विभागाचे उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने, पुनर्वसन विभागाचे तहसीलदार वैभव लिपारे तसेच संबंधित अधिकारी व पुनर्वसनग्रस्त उपस्थित होते.

            आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील 21 गावांच्या लाभक्षेत्रातील आंबेओहोळ प्रकल्पांतर्गत पुनर्वसन प्रकल्पग्रस्तांना जमीन व विशेष आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी पुनर्वसन विभागाने युद्धपातळीवर काम करुन त्यांना लवकरात- लवकर न्याय मिळवून द्यावा, अशा सूचना ग्रामविकास मंत्रीहसन मुश्रीफ यांनी केल्या.

         मंत्री मुश्रीफ म्हणाले, या प्रकल्पातील 106 प्रकल्पग्रस्तांना जमीन व आर्थिक सहाय्य देणे बाकी आहे. प्रकल्पग्रस्तांनी प्रलंबित कामांची यादी जिल्हा प्रशासनाकडे सादर करावी. या कामी जिल्हाधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष घालावे, असे त्यांनी यावेळी सांगितले असता प्रकल्पग्रस्तांच्या

समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्याबरोबरच या प्रश्नी स्वत: लक्ष घालण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले.

        आंबेओहोळ प्रकल्पांतर्गत एकूण 849 प्रकल्पग्रस्त असून 65 टक्के रक्कम भरलेले 460 प्रकल्पग्रस्त आहेत. 357 प्रकल्पग्रस्तांनी स्वेच्छा पुनर्वसन घेतले आहे. 255 प्रकल्पग्रस्तांनी आर्थिक सहाय्य तर 87 प्रकल्पग्रस्तांनी जमीन घेतली आहे. तसेच 39 प्रकल्पग्रस्तांनी जमीन व आर्थिक पॅकेज घेतले असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

       यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली या प्रमुखांसह प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.