इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, २८ ऑक्टोबर, २०२१

प्रत्येक तालुक्यात लिंक एआरटी केंद्र व रक्त साठवण केंद्रासाठी प्रस्ताव सादर करा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सूचना

 

          कोल्हापूर, दि. 28 (जिमाका): जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर एचआयव्ही संसर्गित रुग्णांना एआरटी औषध पुरवठा होण्यासाठी, लिंक्ड एआरटी केंद्र व ग्रामीण भागातील रुग्णांना अत्यावश्यक वेळी रक्ताची कमतरता भासू नये, याकरिता प्रत्येक तालुक्यात रक्त संकलन व साठवण केंद्र सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे तात्काळ प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र स्तरावर एचआयव्ही तपासणी किट साठवणीसाठी शीतगृह उपलब्ध करुन देण्याबाबतही त्यांनी सांगितले.

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या आढावा बैठकीदरम्यान ते बोलत होते. यावेळी एचआयव्ही – क्षयरोगबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ.बर्गे प्रमुख उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, कोल्हापूर जिल्हा हा डोंगराळ व दुर्गम तालुक्यांचा जिल्हा आहे. शस्त्रक्रिया किंवा इतर कारणांसाठी रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास तालुकास्तरावर रक्त तातडीने मिळवण्यास अडचणी येतात, यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये रक्त साठवण सेवा उपलब्ध व्हावी, यासाठीचा  प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे आल्यास त्या संदर्भात जलद कार्यवाही केली जाईल. एच.आय.व्ही. संदर्भातील औषधे प्रत्येक तालुकास्तरावर उपलब्ध झाल्यास रुग्णांचा त्रास वाचेल. खासगी दवाखाने व प्रयोगशाळा यांनी पीपीपी तत्त्वावर एचआयव्ही तपासणी करण्यासाठी पुढाकार घेऊन, प्रत्येकाने एचआयव्ही संसर्गितांची माहिती जिल्हा एड्स नियंत्रण पथकाकडे दर महिन्याला सादर करावी. जिल्ह्यातील नोंदणी झालेल्या सर्व गरोदर महिलांची एचआयव्ही तपासणी करण्यात यावी. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गरोदर महिलांची तपासणी उद्दिष्टानुसार झाली नसल्यास याबाबत माहिती घ्यावी. जिल्ह्यातील बंद झालेल्या आयसीटीसी व लिंक्ड एआरटी केंद्रांपैकी गरजेनुसार ती पूर्ववत करण्याची कार्यवाही व्हावी. एचआयव्ही संसर्गित रुग्णांना संजय गांधी निराधार योजनेच्या लाभाची प्रक्रिया सुलभ व्हावी, एचआयव्ही संसर्गित रुग्णांना डायलिसिस सेवा मिळावी, यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. 

जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी एचआयव्ही-एड्स संसर्गितांची जिल्ह्याची आकडेवारी व सद्यस्थिती सादर केली. नवीन संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले.

          स्वागत व प्रास्ताविक विनायक देसाई यांनी केले. यावेळी एआरटी विभागाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिविक्षा अधिकारी, नेहरु युवा केंद्राच्या समन्वयक पूजा सैनी, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. दळवी यांच्यासह एड्स विभागाचे कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.