शुक्रवार, २३ डिसेंबर, २०२२

पंचमहाभूत लोकोत्सवासाठी सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणेने उत्कृष्ट समन्वय ठेवावा प्र. जिल्हाधिकारी संजय शिंदे

 


 

कोल्हापूर, दि. 23 (जिमाका) : श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कनेरी मठ येथे दिनांक 20 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी परस्परांत उत्कृष्ट समन्वय ठेवून चोखपणे पार पाडावी, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले.

          श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कनेरी मठ येथे आयोजित सुमंगलम पंचमहाभूत महोत्सवाच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठकीत श्री. शिंदे मार्गदर्शन करत होते. मठाधिपती श्री. काडसिद्धेश्वर महाराज, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, महावितरण चे अधिक्षक अभियंता अंकुर कावळे, जल संपदा विभागाचे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे, डॉ. संदीप पाटील व अन्य अधिकारी उपस्थित होते.

       श्री. शिंदे पुढे म्हणाले की, सर्व शासकीय यंत्रणांनी या पंचमहाभूत महोत्सवाच्या अनुषंगाने कनेरी मठ व परिसरात ज्या पायाभूत सुविधा निर्माण करावयाच्या आहेत त्याबाबतच्या कामांचा प्रस्ताव तात्काळ प्रशासनाला सादर करावा. जेणेकरून या कामांना शासन स्तरावरून लवकरात लवकर निधी उपलब्ध होईल असे त्यांनी सांगितले.

     प्रत्येक शासकीय विभागाने या महोत्सवात दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी व हा महोत्सव सांघिक कार्यक्रम असून त्यात प्रत्येकाने एक्शन मोड मध्ये काम करावे. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी ज्या 70 समित्या स्थापन केलेल्या आहेत त्या समिती प्रमुखांनी त्यांच्या स्तरावर सर्व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र मीटिंग घेऊन सूचना द्याव्यात असेही श्री. शिंदे यांनी सूचीत केले.

      प्रारंभी डॉ. संदीप पाटील यांनी सुमंगल पंचमहाभूत महोत्सवाच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या समितीच्या कामकाजाविषयी बैठकीत माहिती सादर केली.

       दिनांक 20 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत कनेरी मठ परिसरात  होणाऱ्या  सुमंगलम पंचमहाभूत महोत्सवाच्या जागेची व त्यावर होत गेल्या कामाची माहिती जिल्हाधिकारी श्री. शिंदे व सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी प्रत्यक्ष भेट देऊन घेतली.

           0000

सोमवार, १९ डिसेंबर, २०२२

सिल्लोड येथे राज्यस्तरीय कृषि महोत्सवाचे आयोजन

 

 

कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) :  शेतकऱ्यांची शाश्वत प्रगती व्हावी, शेतमालाला चांगला बाजारभाव मिळावा तसेच शेतमाल उद्योग प्रक्रियेला चालना मिळावी, शेतकरी व वरिष्ठ कृषि शास्त्रज्ञ यांच्यामध्ये थेट संवाद व्हावा, यासाठी कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून दिनांक 1 ते 5 जानेवारी 2023 या कालावधीत महाराणा प्रतापसिंह चौक परिसर, सिल्लोड, जि. औरंगाबाद येथे राज्यस्तरीय कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

कृषि महोत्सवात 600 पेक्षा जास्त स्टॉल्स, 99 विविध प्रात्यक्षिके, आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग, शासनाच्या विविध योजनांचे सादरीकरण, यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा, कृषि प्रदर्शन, चारही कृषि विद्यापीठामार्फत विविध विषयांवर तांत्रिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. कृषि महोत्सवात शेती औजारे, बी बियाणे, लागवड साहित्य, शेती औषधे, ग्रीन हाऊस व साहित्य, जैवतंत्रज्ञान, डेअरी तंत्रज्ञान व उत्पादने, कुक्कुट पालन, हॉल्टीकल्चर, सिंचन यंत्रणा, पशूधन विकास, सौर उर्जा, जलव्यवस्थापन, शेतमाल साठवणूक यंत्रणा, अपारंपारिक ऊर्जा संरक्षित शेती, पणन व विपणन, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, शेतविमा व अर्थसहाय्य, शैक्षणिक संस्था, सहकार क्षेत्र, फार्म टेक्नॉलॉजी, उती तंत्रज्ञान, जैविक खते, फार्म मशिनरी या संस्था, कंपन्या सहभागी होणार आहेत.

 

जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, उत्पादक कंपन्यांनी बदलत्या काळानुसार शेतीमध्ये उच्च तंत्र व नवनवीन तंत्रज्ञान, संधी, व्यवस्थापन जाणून घेण्यासाठी या राज्यस्तरीय कृषि महोत्सवास अवश्य भेट द्यावी. अधिक माहितीसाठी क्षेत्रीय स्तरावरील मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.

00000

 

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास मुदतवाढ

 

 

कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) :  दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांतपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी शाळा, महाविद्यालयांनी व पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत परिक्षोत्तर (पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती) व  दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी दि.30 डिसेंबर 2022 पर्यंत विद्यार्थी नोंदणी, सदोष अर्ज पडताळणी व संस्था पडताळणी 15 जानेवारी 2023 पर्यंत व नोडल अधिकाऱ्यांची पडताळणी 31 जानेवारी 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

000000

 

 

अधीक्षक डाकघर कार्यालयात डाक अदालतीचे आयोजन

 

कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) :  अधीक्षक डाकघर कोल्हापूर विभागाच्यावतीने  दि. 28 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 4 वाजता प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर येथे डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कोल्हापूर डाक विभागाचे प्रवर अधीक्षक ए.व्ही.इंगळे यांनी दिली आहे.

कोल्हापूर डाकघर विभागाशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालत मध्ये दखल घेतली जाईल.  विशेषत: टपाल, वस्तु /मनीऑर्डर/ बचत खाते / प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा.  उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव, हुद्दा इत्यादी.

 संबंधितानी डाक सेवे बाबतची तक्रार  प्रवर अधीक्षक डाकघर ए.व्ही.इंगळे, अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर ४१६००३ यांच्या नावे दोन प्रती सह दिनांक 24 डिसेंबर पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाणार नाही.

00 0 0 0

रविवार, १८ डिसेंबर, २०२२

जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्याक हक्क दिन साजरा....

 


जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्याक हक्क दिन साजरा....

अल्पसंख्याक समाजासाठी असलेल्या शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणार

                                                - प्र. जिल्हाधिकारी संजय शिंदे

कोल्हापूर, दि. 18 (जिमाका):-केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अल्पसंख्याक समाजातील नागरिकांसाठी विविध शासकीय योजना राबविल्या जातात. या कल्याणकारी योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून अल्पसंख्याक समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली.

            अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अप्पर चिटणीस संतोष कणसे, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक उदय कांबळे, जिल्हा मुस्लीम बोर्डिंगचे संचालक रफिक हा. शेख, वायल्डर मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष आनंद म्हांळुगेगर, महाविर महाविद्यालयाचे चेअरमन ॲड.के.कापसे, वीर सेवादलचे अल्पसंख्याक अध्यक्ष अनिल गडकरी, हातकणंगले येथील सामाजिक कार्यकर्ते सिंकदर शौकतअली, विनय हुक्केरी आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

            प्र. जिल्हाधिकारी श्री. शिंदे पुढे म्हणाले की, जिल्ह्यात अल्पसंख्याक समाजातील नागरिकांसाठी विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत आहे. अल्पसंख्याक समाजातील एक ही लाभार्थी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही. यासाठी सर्व संबंधित शासकीय विभागांनी दक्षता घ्यावी. तसेच अल्पसंख्याक समाजासाठी कार्यरत असलेल्या सर्व संघटनांनी त्यांच्या समाजासाठी असलेल्या याबाबतचे प्रबोधन प्रत्येक घटकापर्यंत करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

            त्याप्रमाणेच अल्पसंख्याक समाजातील नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. परंतु काही मागण्या शासनाकडून सोडविणे आवश्यक आहे, त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचीही माहिती श्री. शिंदे यांनी दिली. अल्पसंख्याक दिनानिमित्त अल्पसंख्याक समाजातील सर्व नागरिकांना त्यांनी शुभेच्छा देऊन प्रशासनाच्या वतीने शासकीय योजनेचा लाभ त्वरित देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी अल्पसंख्याक  समाजातील संघटनेच्या प्रतिनिधींनी शासन व प्रशासनाच्या वतीने विविध शासकीय योजनांचा लाभ त्वरित मिळण्याबाबत कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

            अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव होण्यासाठी 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, अशी माहिती श्री. कणसे यांनी प्रास्ताविकात दिली. प्रशासनाच्या वतीने अल्पसंख्याक समाजातील नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनेची माहिती त्यांनी सादर केली.

            मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक उदय कांबळे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना अल्पसंख्याकासाठी शैक्षणिक तसेच व्यावसायिक शासकीय योजनांची माहिती दिली.

            यावेळी उपस्थित अल्पसंख्याक पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे अल्पसंख्याक समाजाच्या अशासकीय सदस्यांच्या नेमणुका व मागण्याबाबत निवेदन सादर करून शासन दरबारी पाठपुरावा करून प्रशासनामार्फत दर तिमाहीत याचा आढावा घेण्याची मागणी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अप्पर चिटणीस संतोष कणसे यांनी केले.

 

सोबत : फोटो जोडला आहे

00000000

गुरुवार, १५ डिसेंबर, २०२२

सर्व दुग्ध संकलन केंद्रावर इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरण अनिवार्य

 


 

कोल्हापूर, दि. 15 (जिमाका): जिल्ह्यातील दुग्ध संकलन केंद्रावर दूध मापनासाठी 10 ग्रॅम अचूकतेचे वर्ग-3 इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणांचा वापर अनिवार्य आहे. तरी जिल्ह्यातील सर्व दुध संकलन केंद्रावर इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरण वापरण्याबाबत 1 जानेवारी 2023 पूर्वी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश वैधमापन शास्त्राचे उपनियंत्रक रा.ना.गायकवाड यांनी दिले आहेत.

नियंत्रक वैधमापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील दुग्ध संकलन केंद्रावर दूध खरेदी- विक्री मधील गैरप्रकार रोखणे व ग्राहकांची होणारी फसवणूक थांबविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणांचा वापर करणाऱ्या दुग्ध संकलन केंद्रावर दुध मापनासाठी 10 ग्रॅम अचूकतेचे (E-Value- 10g) वर्ग-3 (Accuracy Class-III) इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणांचा वापर अनिवार्य आहे. आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र वैधमापन शास्त्र (अंमलबजावणी) नियम, 2011 चे नियम 23 अन्वये कारवाई करण्यात येईल. हे आदेश 1 जानेवारी 2023 पासून लागू होतील, असेही श्री. गायकवाड यांनी कळविले आहे.

000000

 

जिल्हा कौशल्य, विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयाचे स्थलांतर

 


 

कोल्हापूर, दि. 15 (जिमाका): जिल्हा कौशल्य, विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर हे कार्यालय पागा इमारत, भवानी मंडप येथे होते. सध्या हे कार्यालय 'सी' बिल्डींग, शासकीय निवासस्थान, विचारे माळ, कावळा नाका, कोल्हापूर 416004 येथे स्थलांतरीत झाले आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी दिली आहे.

00000

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या 16 डिसेंबरच्या अभ्यागत भेटी रद्द

 


 

कोल्हापूर, दि. 15 (जिमाका): प्रशासकीय कारणास्तव जिल्हाधिकारी राहुल रेखावार शुक्रवार दि. 16 डिसेंबर  2022 रोजी अभ्यागतांना भेटू शकणार नाहीत. या दिवशीच्या अभ्यागत भेटी रद्द करण्यात आल्याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

000000

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कारासाठी 31 जानेवारीपर्यंत प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन

 


 कोल्हापूर, दि. 15 (जिमाका): मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड:मय निर्मितीसाठी राज्य शासनाच्यावतीने स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार योजना जाहीर झाली असून यासाठी प्रवेशिका 31 जानेवारीपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिवांनी केले आहे.

मराठी भाषेतील उत्कृष्ठ वाड:मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2022 करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कारासाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून) तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 1 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत पाठविता येणार आहेत. दिनांक 1 जानेवारी  ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी मुंबई 400025 यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर 'नवीन संदेश' या सदरात 'स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार 2022 नियमावली व प्रवेशिका' या शीर्षाखाली व 'What's new' या सदरात Late Yashwantrao Chavan State Literature Award 2022 Rules Book and Application Form या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या https://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका  व नियमपुस्तिका उपलब्ध होतील.

प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक कागदपत्रांसह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2023 या विहित कालावधीत पोहचतील अशा पाठवाव्यात. लेखक, प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक, प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी मुंबई 400025 येथे पाठवाव्यात. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक, प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रवेशिका व पुस्तकांच्या दोन प्रती दिनांक 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2023  या विहित कालावधीत पाठवाव्यात.

 लेखक, प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना बंद लिफाफ्यावर, पाकीटावर स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार 2022 साठी प्रवेशिका असा स्पष्ट उल्लेख  करावा. प्रवेशिका व पुस्तके स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2023 राहिल. विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत.

00000

सोमवार, २८ नोव्हेंबर, २०२२

महारेशीम अभियान 2023: शेतकऱ्यांना संपर्क करण्याचे आवाहन

 


 

 कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : जिल्ह्यात महारेशीम अभियान 2023 राबविण्यात येत असून या अंतर्गत नवीन तुती क्षेत्र नोंदणीचा कार्यक्रम 15 डिसेंबरपर्यंत असणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा रेशीम अधिकारी राजेश कांबळे यांनी केले आहे.

जिल्हा रेशीम कार्यालयातर्फे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तुती लागवडीव्दारे रेशीम कोष उत्पादन योजना राबविण्यात येत आहे. यात लाभार्थी निवडताना अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जमाती, दारिद्रय रेषेखालील कुटुंबे, शारीरिक अपंगत्व प्रधान कुटुंबे, भूसुधार योजनेचे लाभार्थी, कृषी कर्ज माफी योजनेनुसार अल्प भूधारक सीमांत शेतकऱ्यांना निवडण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत रेशीम विकास प्रकल्पासाठी तीन वर्षामध्ये अकुशल व कुशल मजुरी देण्यात येते. यात तुती लागवड व जोपासनेसाठी 682 मनुष्य दिवस व किटक संगोपन गृहासाठी 213 दिवस असे एकूण 895 दिवसांची मजुरी देण्यात येते. स्वत: मजुर म्हणून स्वत:च्या शेतात काम करणे आवश्यक आहे.

लाभार्थी निवडताना इच्छुक लाभार्थ्यांकडे मध्यम ते भारी व पाण्याची निचरा होणारी जमीन असावी. नवीन तुती लागवड क्षेत्रासाठी सिंचनाची पुरेशी सोय उपलब्ध असणे आवश्यक आहे. सर्व खर्च वजा जाता एकरी वार्षिक किमान दिड लाख रुपये उत्पन्न निश्चित मिळेल. जिल्ह्यात रेशीम शेती उद्योगासाठी वाव आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आठमाही सिंचनाची सोय व खर्च करण्याची तयारी असलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालय, 564 ई वॉर्ड, व्यापारी पेठ, शाहुपुरी, कोल्हापूर 416001 येथे संपर्क साधावा, असेही श्री. कांबळे यांनी कळविले आहे.

अधिक माहितीसाठी 0231-2654403 व 2666682 वर संपर्क साधावा.

000000

बालगृहातील मुला-मुलींनी सुविधांचा लाभ घेऊन जीवनात आदर्श निर्माण करावा - संजयसिंह चव्हाण

 

 


 

कोल्हापूर,दि. 28 (जिमाका) : सर्व बालगृहातील मुला-मुलींनी सुविधांचा लाभ घेऊन शुन्यातून विश्व निर्माण करुन जीवनात आदर्श निर्माण करावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी चाचा नेहरु बाल महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी केले.

विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, जिल्हा परिवक्षा अनुरक्षण संघटनेच्या मानद कार्यवाह पद्मजा तिवले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष वैशाली बुटाले, बाल कल्याण समिती सदस्य शिल्पा सुतार, अश्विनी खाडे, श्रीमती गारे तसेच बाल न्याय मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

परिवक्षा अनुरक्षण संघटनेच्या मानद कार्यवाह पद्मजा तिवले म्हणाल्या, मागील तीन वर्षात महोत्सव घेता आला नाही. सध्या घेण्यात आलेला महोत्सव सर्व मुलांनी मनापासून आनंदाने साजरा करावा.

 

 

 

 2018 नंतर प्रथमच या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील महिला बाल विकास विभागाच्या नऊ बालगृहातील 350 मुले- मुली सहभागी झाली आहेत. हा महोत्सव तीन दिवस चालणार आहे. यामध्ये खो-खो, कबड्डी, धावणे, कॅरम, बुध्दीबळ या खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. तसेच दोन दिवस सांस्कृतिक आणि मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.

कार्यक्रमास सर्व संस्था अधीक्षक, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

000000

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०२२

तृतीयपंथीयांनी ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्रासाठी अर्ज करावेत


 

कोल्हापूर, दि. 16 (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांना ‘राष्ट्रीय तृतीयपंथीय पोर्टल’बाबतची माहिती व्हावी यासाठी जास्तीत-जास्त पात्र तृतीयपंथीयांनी ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळविण्यासाठी संबंधित वेबसाईटला भेट देवून अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव तथा समाज कल्याण  विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

 

राज्यातील तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने राज्य स्तरावर व विभागीय स्तरावर राज्यातील तृतीयपंथीय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करण्यास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मान्यता दिली आहे.

 

जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या समस्या तसेच प्राप्त तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरावर तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे. तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियमानुसार जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र अदा करण्याची तजविज आहे. त्यानुषंगाने सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभाग, मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत राष्ट्रीय तृतीयपंथीय पोर्टल सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पात्र तृतीयपंथीयांनी तृतीयपंथीय व्यक्तींसाठी राष्ट्रीय पोर्टल (National Portal For Transgender Persons) वर भेट देवून ॲप्लाय ऑनलाईन यावर आपला युजरआयडी व पासवर्ड तयार करून आपली सर्व माहिती भरावी. तसेच ऑनलाईन अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे संलग्न करावीत.

 

अधिक माहितीकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, समाजकल्याण कार्यालय, विचारे माळ, बाबर हॉस्प‍िटल शेजारी कोल्हापूर येथे ०२३१- २६५१३१८ वर संपर्क साधावा, असेही श्री. लोंढे यांनी कळविले आहे.

 

00000

ग्रामपंचायत निवडणूक खर्चाचा हिशोब मुदतीत सादर न केलेले उमेदवार निवडणूक लढवण्यास अपात्र

 


 

कोल्हापूर, दि. 16 (जिमाका) : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2017 मध्ये जिल्ह्यातील ज्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब मुदतीत सादर केला नाही, अशी व्यक्ती राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये पाच वर्षांच्या कालावधीकरीता पंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा असा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास निरर्ह असेल. निरर्ह उमेदवारांची यादी kolhapur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी  श्रावण क्षीरसागर यांनी दिली आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 14 (ब) (1) अन्वये ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2017 मध्ये जिल्ह्यातील हातकणंगले, राधानगरी, कागल, भुदरगड, शाहूवाडी, गडहिंग्लज, पन्हाळा व करवीर तालुक्यातील एकूण 446 उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब मुदतीत सादर न केल्याने त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या  आदेशान्वये अनर्ह ठरविण्यात आले आहे. अनर्ह उमेदवारांची माहिती शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ, पुणे विभाग, पुणे असाधारण क्रमांक 5 दिनांक 24/01/2019 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.  

000000

 

रविवार, १३ नोव्हेंबर, २०२२

शिक्षणाच्या माध्यमातून विकास साधण्यावर शासनाचा भर - उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत दादा पाटील

 





कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : आपल्या देशात तरुणांची संख्या अधिक आहे. शिक्षणाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून शिक्षणाच्या माध्यमातून राज्याचा व देशाचा विकास साधण्यावर शासनाचा भर आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

 सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग कार्यालय, कोल्हापूर व इंडो काऊन्ट फाऊंडेशन, गोकुळ शिरगांव एम. आय. डी. सी., कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्ह्यातील आश्रमशाळांना शैक्षणिक साहित्य ( ई-लर्निंग किट ) सुपूर्द सोहळा कार्यक्रम राधाबाई शिंदे सभागृह, सायबर महाविद्यालय, कोल्हापूर या ठिकाणी झाला, या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी इंडोकाऊंट इंडस्ट्रीजचे डायरेक्टर कमल मित्रा, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी नारी शक्ती पुरस्कार प्राप्त माजी मुख्याध्यापिका अंजली पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्य शासनाने अभियांत्रिकी तसेच पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचे मराठीकरण करण्याचे काम पूर्ण केले असून त्या पुस्तकांचे विमोचन विद्यापीठ अनुदान आयोगाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत मुंबईत होणार असून भविष्यात वैद्यकीय शिक्षणसुध्दा मराठीतूनच उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न राहील.

 देशातील खासगी कंपन्यांनी आपल्या नफ्यातील काही रक्कम सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबविण्याबाबत केंद्र सरकारने निर्बंध घातले असून त्यामुळे अशा शैक्षणिक संस्थांना आणि पर्यायाने विद्यार्थ्यांना लाभ होणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

इंडो काऊन्ट फाऊंडेशनच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत प्राप्त झालेल्या शैक्षणिक साहित्य (ई-लर्निंग किट) चा वापर करुन आश्रमशाळेतील विद्यार्थी जागतिक स्तरावर विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवतील. अशा शैक्षणिक साहित्याची भविष्यात गरज असून त्यामुळे रोजगार निर्मितीसही हातभार लागेल. विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणावर अवलंबून न राहता कौशल्यावर आधारीत शिक्षण घेण्यावर भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांनी ई-लर्निंग साहित्याचा वापर करुन विविध क्षेत्रात ज्ञान मिळवावे तसेच संशोधनामध्येही अग्रेसर रहावे, असेही आवाहन त्यांनी केले.

 इंडो काउन्ट सारख्या कंपन्यांनी संशोधन केंद्रे उभारणीसाठी तसेच संशोधन झालेले उत्पादन, शोध यांची संबंधितांना मालकी हक्क मिळवून देण्याकरीता सहकार्य करण्याचे त्यांनी सूचित केले.

कार्यक्रमाची सुरुवात आश्रमशाळा, कुशिरे येथील विद्यार्थीनींच्या स्वागत गीताने झाली. प्रास्ताविकामध्ये सहायक आयुक्त विशाल लोंढे म्हणाले, विमुक्त जाती, भटक्या जमाती मधील कुटूंबे ही उदरनिर्वाहासाठी सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकत असतात. तसेच अत्यंतिक गरीब परिस्थितीमुळे त्यांना आपल्या मुलामुलींना शिक्षण देता येत नाही. दुर्बल घटकातील मुलामुलींचा शैक्षणिक विकास व्हावा व ते समाजाच्या मुख्य प्रवाहात यावेत, यासाठी राज्य शासनाने आश्रमशाळा सुरु केल्या आहेत.

विजाभज समाजातील मुलामुलींना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण आहे. शिक्षण घेऊन या समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या या आश्रमशाळा मोलाचे कार्य करीत आहेत. त्याचबरोबर इंडो काउन्ट फाऊंडेशनने त्यांच्याकडील सीएसआर फंडामधून जिल्ह्यामधील आश्रमशाळांना शैक्षणिक साहित्य ( ई-लर्निंग किट ) उपलब्ध करून दिल्याने त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील.

 इंडोकाऊंट इंडस्ट्रीचे डायरेक्टर कमल मित्रा यांनी इंडो काऊन्टच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत शैक्षणिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांमध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच भविष्यातही राज्य शासनाच्या विविध विभागांबरोबर काम करुन सामाजिक बांधिलकी जपण्याचे आश्वासित केले.

शैक्षणिक साहित्य ( ई-लर्निंग किट ) दिल्याबद्दल कमल मित्रा यांचा मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारार्थी अंजली पाटील तसेच पूर्वा कांबळे व समृध्दी कांबळे या विद्यार्थिनींनी  मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन इंडो काऊन्टचे सीएसआर सल्लागार अमोल पाटील यांनी केले तर आभार समाज कल्याण निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी मानले.

कार्यक्रमासाठी इंडोकाऊंट इंडस्ट्रीजचे सिनीअर व्हाईस प्रेसिडेंट शैलेश सरनोबत, जिल्ह्यातील विजाभज आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, समाजकल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सायबर महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी,  उपस्थित होते.

000000

 

गुरुवार, १० नोव्हेंबर, २०२२

शिरोळ तहसिलदार कार्यालयातील निर्लेखित वाहनाचा लिलाव

 

                       

            कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : शिरोळ तहसिलदार कार्यालयातील निर्लेखित वाहनाचा जाहीर लिलाव दि. 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय, शिरोळ, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, शिरोळ येथे होणार आहे, अशी माहिती इचलकरंजी विभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिली आहे.

 

(मॉडेल - महिंद्रा बोलेरो, वाहन क्र. - MH-09-AG-0122, मेक- 2007 व अपसेट किंमत 75 हजार रुपये)

तहसिलदार शिरोळ यांच्या ताब्यात असलेले वाहन ‘आहे त्या परिस्थितीत’ जाहीर लिलावाव्दारे विक्री करावयाचे असून लिलावाच्या सर्वसाधारण अटी व शर्ती कार्यालयीन वेळेत(सुट्टीच्या दिवसा व्यतिरिक्त) उपविभागीय अधिकारी कार्यालय इचलकरंजी व तहसिल कार्यालय शिरोळ यांच्या नोटीस बोर्डवर पहावयास मिळेल, असेही श्री. खरात यांनी कळविले आहे.

0000000

 

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान: शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

 


कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) :  एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2022-23 अंतर्गत जिल्ह्याकरिता एकूण 350.83 लाखाचा कार्यक्रम प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.

या अभियानामध्ये विदेशी फळपिक लागवड (ड्रॅगन फ्रुट लागवड), पुष्पोत्पादन कार्यक्रम (कंदवर्गीय फुले सुट्टी फुले लागवड), मसाला पिके (मिरची, हळद आले लागवड), सामुहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, संरक्षित शेती (हरितगृह, शेडनेट, प्लॅस्टिक मल्चिंग) मधुमक्षिका पालन, फलोत्पादन यांत्रिकीकरण (ट्रॅक्टर, पॉवर टिलर) पॅक हाऊस, शीतखोली, रेफर व्हॅन, रायपनिंग चेंबर, प्रक्रिया युनिट फिरते विक्री केंद्र या घटकांचा समावेश आहे.

योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक कृषी सहायक यांना संपर्क साधावा इच्छुक शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर (www.mahadbt.gov.in ) अर्ज करावेत, असेही श्री. पांगरे यांनी कळविले आहे.

00000