गुरुवार, १३ जानेवारी, २०२२

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे राष्ट्रीय युवक दिन संपन्न

 


कोल्हापूर, दि. 13 (जिमाका): जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि महावीर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय युवक दिन’ साजरा करण्यात आला.

हा कार्यक्रम  ऑनलाईन घेण्यात आला असून यामध्ये महावीर कॉलेजचे एकुण 56 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला. यावेळी महावीर कॉलेजचे प्रा.अरूण पाटील यांनी सुत्रसंचालन करून युवक दिन साजरा करण्याबाबतची  माहिती  दिली.  तसेच स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती  निमित्त विनम्र अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

त्याचबरोबर महावीर कॉलेजचे मराठी विभागाचे प्रोफेसर जयंत दळवी यांनी देशाचे भवितव्य युवा पिढी असुन देशाला महासत्ता बनवण्याचे काम युवक करू शकतात, अशा शब्दांत मार्गदर्शन केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे यांनी मनोगत व्यक्त करताना प्राधिकरणामार्फत  पुरविण्यात  येणाऱ्या  सेवा, सुविधा आणि विविध प्रकारची  शिबिरे तथा मेळावे या बाबत माहिती सांगितली. आजच्या  तरुण पिढीने समाजाबद्दलची आपली जबाबदारी ओळखून आपली  जडणघडण आणि ऊर्जा  सत्कर्मी  लावून स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे स्मरण करून नवनवी आव्हाने स्वीकारून आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. तसेच राजमाता जिजाऊंचे विचार डोळ्यासमोर ठेवून आपल्या घरातील आई, बहीण तसेच प्रत्येक महिलेला आदर दिला पाहिजे आणि महिलांच्या विचारांचे समर्थन केले पाहिजे व  तरुण पिढीला  व्यसनमुक्ती पासून आणि मोबाईल सारख्या तंत्रज्ञानाच्या  व्यसनापासून दूर राहून आपली नैतिक जबाबदारी ओळखून आपले समाजात स्थान निर्माण केले पाहिजे, असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी  व्यक्त केले.

यावेळी विधी सेवा प्राधिकरण येथील पॅनेल विधीज्ञ किरण खटावकर यांनी उपस्थित विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले व सक्षम भारत बनविण्यासाठी तरूण पिढीने नेहमी सजग राहून आपल्या गतीला चालना दिली पाहिजे, असे मत व्यक्त केले.

00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.