इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२

प्रदीर्घ लढ्यातून मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 






प्रदीर्घ लढ्यातून मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत

-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत देशात 25 कोटी तर

राज्यात अडीच कोटी घरावर तिरंगा ध्वज अभिमानाने फडकावण्यात आला

 

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न

 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात निर्माण करण्यात आलेल्या संविधान स्तंभाचेही मान्यवरांच्या हस्ते अनावरण

 

कोल्हापूर, दि.15(जिमाका):- भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशात सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळाले नसून त्यासाठी स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारकांना प्रदीर्घ लढा द्यावा लागलेला होता. त्यामुळे मिळालेल्या या स्वातंत्र्याला टिकवण्यासाठी व वैभवशाली राष्ट्र निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

       भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्री शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी-पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले की, संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याचा व घरोघरी तिरंगा फडकवण्याचा उत्साह व अभिमान निर्माण झालेला आहे. अमृत महोत्सवानिमित्त 9 ऑगस्ट क्रांतिदिन ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या कालावधीत ठीकठिकाणी प्रभात फेऱ्या, रॅली काढून देशाबद्दल प्रेम व अभिमान जागृत करण्यात आला. देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळालेले नसून त्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी मोठा प्रदीर्घ लढा दिला आहे. त्यामुळे हे मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी व ते अधिक मजबूत करून बलशाली राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहन त्यांनी केले.

       बाराव्या शतकापर्यंत समृद्ध असणारा आपला देश त्यानंतरच्या काळात मुघल, इंग्रज, पोर्तुगीज व डच या परकीय सत्ता मुळे रसातळाला गेला. दीडशे वर्षाच्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी लढा दिला. यामध्ये महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभाई पटेल, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुखदेव, भगतसिंग व ज्ञात-अज्ञात यांनी आपापल्या पद्धतीने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले व 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. क्रांतिकारकांच्या स्मृती नेहमी स्मरणात राहण्यासाठी अनेक ठिकाणी स्मृतीस्तंभ निर्माण करण्यात आले, अशी माहिती श्री. पाटील यांनी दिली.

     


स्वातंत्र्यप्राप्तीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती केली, या संविधनामध्ये काय झाल्यास काय करायचे याबाबतची उत्तरे उपलब्ध आहेत. ही राज्यघटना हजार वर्षे बदलावी लागणार नाही, असे सांगून शेतकरी, उद्योगपती व सर्वसामान्य नागरिकांनी मेहनत घेऊन देशाला समृद्धीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. सन 2014 नंतर देशाच्या विकासाला अधिक चालना मिळाली. प्रधानमंत्री यांनी सबका साथ सबका विकास हा नारा देऊन सर्वसामान्य नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले, असे श्री. पाटील यांनी सांगून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत 25 कोटी तिरंगा ध्वज तर महाराष्ट्र राज्यात अडीच कोटी तिरंगा ध्वज फडकवण्यात आले. देशाच्या युवा पिढीमध्ये देशाभिमान जागृत करण्यात ही मोहीम अत्यंत मौलिक ठरली आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष व स्वातंत्र्य दिनानिमित्त येथे उपस्थित असलेले स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे कुटुंबीय, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, पालक, पत्रकार यांना श्री. पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. प्रारंभी ठीक नऊ वाजून पाच मिनिटांनी श्री. पाटील यांच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते तीन रंगांचे फुगे हवेत सोडून स्वातंत्र्यदिनाचा आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच येथे उपस्थित स्वातंत्र्यसैनिक व मान्यवरांना श्री. पाटील यांनी भेटी घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

संविधान स्तंभाचे अनावरण

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या संविधान स्तंभाचे अनावरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या या संविधान स्तंभाची उंची 15 फूट आहे. हा आकर्षक संविधान स्तंभ रात्रंदिवस काम करून अवघ्या आठ दिवसात तयार करून घेतल्याबद्दल श्री. पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

या संविधान स्तंभाच्या चबुतऱ्याचे दगडी बांधकाम दहा फूट उंचीचे असून त्यावर सोनेरी रंगाची पाच फूट उंचीची आकर्षक राजमुद्रा बसवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला उभारण्यात आलेला हा संविधान स्तंभ जिल्हाधिकारी कार्यालयाचे आकर्षण ठरला आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता संजय कुंभार, कार्यकारी अभियंता संजय पाटील, उप अभियंता महेश कांजर, शाखा अभियंता वैभव जाधव यांनी परिश्रम घेतले.

लामण दिवा व सेल्फी पॉईंट स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लावण्यात आलेला लामण दिवा व सेल्फी पॉईंट अभ्यागतांचे आकर्षण ठरत असून याठिकाणी फोटो घेण्यासाठी सर्वांनी गर्दी केली होती.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण

कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागातील दुर्गम भागात आरोग्य सेवा दिलेले कर्मचारी श्री प्रकाश रामचंद्र नाईक, श्रीमती दिपाली संतोष गोवीलकर, श्रीमती रेखा पांडुरंग दोरूगडे, श्रीमती शांता केरबा जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

पिंपळगाव खुर्द येथे लसीकरण कार्यक्रमात आपल्या सतर्कतेने तोतया डॉक्टर पकडून देण्याचे कार्य करणारे आरोग्य कर्मचारी श्री अजित अशोक चौगुले, श्री देवानंद मुंकुद कांबळे, श्रीमती अर्चना देवेंद्र सरनाईक, श्रीमती माधुरी राजेंद्र पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

माध्यमिक शिक्षण विभागाचे  राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा सन 2021 मध्ये शिष्यवृत्तीसाठी निवड झालेले विद्यार्थी

योगेश अशोक नेजे, इशान भुषण म्हेत्रे, रोहन शहाजी पाटील, विश्वजीत विनायक बांदल यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

स्वच्छ विद्यालय राज्यस्तरीय पुरस्कार 2020-21 प्राप्त शाळांचा गौरव यावेळी करण्यात आला. यामध्ये प्राथमिक, शहरी भागातून, कोल्हापूर पब्लिक स्कूल (राज्यात प्रथम),माध्यमिक,ग्रामीण भागातून, आदर्श विद्यालय कोथळी, ता.शिरोळ(राज्यात प्रथम) याचा समावेश आहे

      तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ॲपल हॉस्पिटल व सावित्रीबाई फुले या हॉस्पिटलचा सत्कार यावेळी श्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

*****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.