इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३

किटकनाशके उर्वरीत अंशमुक्त भाजीपाला प्रात्यक्षिकांचा शेतक-यांनी लाभ घ्यावा

 

 

कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) :  जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत "लोकराजा राजर्षी शाहू महाराज सेंद्रीय शेती प्रोत्साहन योजना" राबविण्यात येत आहे. यामध्ये किटकनाशक उर्वरित अंशमुक्त भाजीपाला उत्पादन प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. या योजनेस भाजीपाला उत्पादक शेतक-यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, इच्छुक भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिकाचा लाभ घेण्यासाठी तालुक्याच्या पंचायत समिती कृषि विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी भिमाशंकर पाटील यांनी केले आहे.

भाजीपाला पिकावरील अमर्याद किटकनाशकांच्या वापरापासून शेतकऱ्यांना सावध करून परावृत्त करणे व मानवी आरोग्यास सुरक्षित असणाऱ्या पर्यायी कीड नियंत्रण पध्दतीचा, भाजीपाल्याचा शेतकऱ्यांनी अंगीकार करावा, यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.

योजनेतंर्गत टोमॅटो, वांगी, कोबी व फुलकोबी या चार भाजीपाला पिकांसाठी प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येत आहे. या पिकांवरील प्रमुख कीड विचारात घेवून त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी लिंग प्रलोभन सापळे, चिकट सापळे, परभक्षी किडी, जैविक किटकनाशके इत्यादींचा समावेश असणारे प्रात्यक्षिक संच रामेती, कोल्हापूर व कृषि शास्त्रज्ञांच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली तयार केले असून त्याचा वापर करुन किटकनाशक उर्वरित अंशमुक्त भाजीपाला प्रात्याक्षिके आयोजित करण्यात येत आहेत. योजनेंतर्गत चालू वर्षी जिल्ह्यात टोमॅटो - ३६० एकर, वांगी - ३५० एकर व कोबी फुलकोबी -४०० एकर क्षेत्रावर प्रात्याक्षिके घेण्यात येत असून लाभार्थी निवड चालू आहे.

योजनेतंर्गत प्रति लाभार्थी किमान ०.१० हेक्टर व कमाल ०.४० हेक्टर क्षेत्रासाठी लाभ देण्यात येईल. सहभागी शेतकऱ्यांनी, निश्चित केलेल्या प्रात्यक्षिक संचातील साहित्य स्वतः खरेदी करुन त्याचा वापर करावयाचा असून त्यासाठी प्रति एकर प्रात्याक्षिकासाठी खर्चाच्या ५० टक्के कमाल टोमॅटो 5 हजार रु., वांगी 4 हजार रु. व कोबी, फुलकोबी 4 हजार रु. याप्रमाणे अनुदान रक्कम थेट लाभ हस्तांतरण पध्दतीने लाभार्थाच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल, असेही कळविले आहे

0000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.