शनिवार, ५ मे, २०१२

पुढील वर्षापासून शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प- कृषीमंत्री

        कोल्हापूर दि. 4 : राज्यात पुढील वर्षापासून शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्याचा राज्य शासनाचा विचार आहे, अशी माहिती कृषि व पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज दिली.
       सुनिता नरके फौंडेशनतर्फे आयोजित कुंभी कृषी प्रदर्शनाचे आज त्यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. करवीर तालुक्यातील कोपार्डे येथील स. ब. खाडे महाविद्यालयाच्या मैदानावर हे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
       व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयसिंह मंडलिक, आमदार चंद्गदीप नरके, आमदार महादेवराव महाडिक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष हिंदुराव चौगले, माजी आमदार बजरंग देसाई, माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, संचालक अरुण नरके आदि उपस्थित होते.
       श्री. विखे-पाटील यांनी सांगितले, ' राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र कृषी आराखडा येत्या तीन महिन्यात तयार करण्यास सांगितले आहे. या आराखड्यात त्या-त्या जिल्ह्यातील गरजांचा विचार केला जाईल'.
       यंदा खताची टंचाई भासणार नाही अशी चाचणी घेण्यात आली आहे. शेतीच्या बांधावर खत मिळावे यासाठीही योजना आखण्यात आली आहे. या योजनेमुळे शेतकर्‍यांची फसवणूक होणार नाही, असे त्यांनी सांगितले.
       यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजयसिंह मंडलिक, आमदार महादेवराव महाडिक, आमदार चंद्गदीप नरके यांचीही भाषणे झाली. प्रदर्शनाचे संयोजक संदीप नरके यांनी प्रास्ताविक करुन प्रदर्शन आयोजित करण्यामागील आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी  अधिकारी उमेश पाटील आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.