इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, ६ जानेवारी, २०१६

                                     
                                       
                                           पत्रकारितेत सामाजिक बांधिलकी महत्वाची

                                                                                    - डॉ. सुधीर गव्हाणे
                                             शिवाजी विद्यापीठात पत्रकार दिन संपन्न
     कोल्हापूर, दि. 6 : पत्रकारितेत विश्वासार्हता आणि सामाजिक बांधिलकी महत्वाची असल्याचे प्रतिपादन औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे यांनी आज येथे बोलतांना केले.
     पत्रकार दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन आणि वृत्तपत्र विद्या संवादशास्त्र विभाग, विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि ऐतवडे खुर्द येथील वारणा महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात डिजीटल मीडिया आणि प्रसारमाध्यमे विकास या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. समारंभाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक दशरथ पारेकर, माहिती अधिकारी एस. आर. माने आणि वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रताप पाटील, डॉ. रत्नाकर पंडीत आणि वृत्तपत्रविद्या संवादशास्त्र विभागाच्या प्रमुख आणि मास कम्युनिकेशन विभागाच्या समन्वयक डॉ. निशा पवार आदीजण उपस्थित होते.
     पत्रकारितेत ध्येय आणि निष्ठा महत्वाची बाब असल्याचे स्पष्ट करुन डॉ. सुधीर गव्हाणे म्हणाले, मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या पत्रकारीतेशी तसेच सामाजिक बांधिलकीशी नातं जोडून पत्रकारांनी लेखन करणे काळाची गरज आहे. वृत्तपत्रांनी बातमी आणि जाहिरात यामध्ये संतुलन असणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे विचार आजच्या पिढीने आत्मसात करुन पत्रकारिता करावी, असेही ते म्हणाले.
     डिजीटल इंडिया हा नाविन्यपूर्ण आणि दिशादर्शक प्रकल्प असल्याचे स्पष्ट करुन डॉ. सुधीर गव्हाणे म्हणाले, डिजीटल इंडियामुळे अद्ययावत तंत्रज्ञान, माहिती सर्वदुर पोहचण्यास मदत होणार असून या तंत्रज्ञानावर विद्यार्थ्यांची पत्रकारांची मांड असणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. या उपक्रमामुळे विकासाची नव-नवी दालने सामान्य माणसाला उपलब्ध होणार असून पारदर्शकतेसाठी डिजीटल इंडिया उपक्रम उपयुक्त ठरत असल्याचेही ते म्हणाले. विकासात्मक पत्रकारितेसंदर्भातही त्यांनी सविस्तर विवेचन केले.
     या प्रसंगी समारंभाचे अध्यक्ष ज्येष्ठ संपादक दशरथ पारेकर, डॉ. प्रताप पाटील, डॉ. रत्नाकर पंडीत, माहिती अधिकारी एस. आर. माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
      प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वृत्तपत्रविद्या संवादशास्त्र विभागाच्या प्रमुख आणि मास कम्युनिकेशन विभागाच्या समन्वयक डॉ. निशा पवार यांनी स्वागत प्रस्ताविक केले. शेवटी डॉ. सुमेधा साळुंके यांनी आभार मानले. या कार्यक्रमास पत्रकार तसेच प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि पत्रकारितेतील विद्यार्थी, विद्यार्थींनी उपस्थित होते.
 0 0 0 0 0 0


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.