इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, २७ सप्टेंबर, २०१७

स्वच्छ भारत मिशनमधील कोल्हापूर जिल्ह्याच्या कामगिरीबद्दल अभिमान -पालकमंत्री चंद्रकात पाटील


                     कोल्हापूर दि. 27 : देश स्वच्छ रहावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षापूर्वी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. यामध्ये उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्यांना गुणांकनाच्या आधारे राष्ट्रीय स्तरावरील पारीतोषिके देऊन गौरविण्यात येत आहे. यामध्ये यावर्षी कोल्हापूर जिल्ह्याने नेत्रदिपक कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळविला. जिल्ह्याचे हे यश अत्यंत अभिमानास्पद व आनंददायी आहे. अशा भावना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या.
                      2 ऑक्टोबर,2017 या महात्मा गांधी जयंती निमित्ताने केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयामार्फत स्वच्छता दर्पण पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत होणा-या कामांवर आधारित याचे गुणांकन केले गेले असून यामध्ये कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम स्थानावर आहे. 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छता दर्पण पुरस्काराने कोल्हापूरसह  महाराष्ट्रातील 5 तर देशातील 47 जिल्ह्यांना यावेळी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
                      पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कोल्हापूर जिल्हा प्रथम स्थानी आहे. यामध्ये जिल्ह्यातील नागरिक आणि प्रशासन यांचा महत्वाचा वाटा आहे. स्वच्छता या विषयामध्ये कोल्हापूर राष्ट्रीय पातळीवर सातत्याने अधोरेखीत होत आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या लोगो निर्मितीच्या स्पर्धेतही कोल्हापूरचे सुपूत्र अनंत खासबागदार यांनी निर्माण केलेला महात्मा गांधीजींचा चष्मा असणारा लोगो स्वच्छ भारत अभियानाचा लोगो म्हणून निवडला गेला आणि आता तर त्याला नोटेवरही स्थान मिळाल्याने तो प्रत्येकाच्या हातात गेला आहे. या जिल्ह्यात प्रचंड कल्पकता आणि समर्पण आहे. नकारात्मकता बाजूला ठेवून करवीर निवासीनी अंबाबाईच्या या जिल्ह्यात सर्वांनी मिळून एकत्र येवून कार्य केल्यास जिल्हा सर्वार्थाने प्रथम क्रामांकावर राहील. दरडोई उत्पन्नामध्ये देशात चंदीगड अग्रेसर आहे. कोल्हापूर गेली पाच वर्ष सातत्याने दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वानी मिळून एकत्र येवून काम केल्यास आपण प्रथम क्रमांकावर येवू शकतो, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.