इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०२१

सार्वजनिक कार्यक्रम व प्रवासाबाबत जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक तत्वे जारी


कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा व मनोरंजनविषयक क्षेत्रातील कार्यांना कोविड-१९ सार्वत्रिक साथरोग येण्यापूर्वी, विविध स्थानिक किंवा इतर सक्षम प्राधिकरणांनी ठरविलेल्या सर्वसाधारण वेळानुसार, शर्तींना अधीन राहून, खुले करण्यात आले आहेत. यानुसार सार्वजनिक कार्यक्रम व प्रवासाबाबत जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक तत्वे जाहिर करण्यात आल्याचे  आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

१. कोविड अनुरूप वर्तनाचे (Covid Appropriate Behaviour) पालन:

राज्य शासनाने व केंद्र सरकारने वेळोवेळी निर्धारित केलेल्या कोविड अनुरूप वर्तनाचे (CAB), सेवा प्रदाते, परिवास्तूंचे (जागांचे) मालक, परवानाधारक, आयोजक, इत्यादींसह सर्वांनी तसेच सर्व अभ्यागत, सेवा घेणारे, ग्राहक, अतिथी, इत्यादींनी काटेकोर पालन केले पाहिजे. कोविड अनुरूप वर्तनाची तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे तसेच त्याचे उल्लंघन केल्यास करावयाचे दंड, कोविड अनुरूप वर्तनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि यात यापुढे नमूद केलेल्या दंडांनुसार असेल.

कोविड अनुरूप वर्तनाचे पालन काटेकोरपणे होईल यासाठी कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत आयुक्त व त्यांचे अधिकारी / कर्मचारी , नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत हद्दीत मुख्याधिकारी व त्यांचे अधिकारी / कर्मचारी तसेच ग्रामीण भागात गट विकास अधिकारी व त्यांचे अधिकारी / कर्मचारी याच बरोबर त्या त्या पोलीस स्टेशन मधील पोलीस  अधिकारी / कर्मचारी  यांची  पथके  स्थापन करुन प्रत्येक गाव / शहरातील आवश्यक त्या ठिकाणी तपासणी, आकस्मीक भेटी देवून तपासणी करावी व ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन होत नसल्यास उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती / आस्थापनांवर दंडात्मक / प्रशासकीय / फौजदारी कारवाई करण्यात यावी. तहसिलदार यांनी तात्काळ या व्यवस्थेची खात्री करावी.

२. संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता:

अ. तिकीट असलेल्या किंवा तिकीट नसलेल्या, कोणत्याही कार्यक्रमाच्या, समारंभाच्या किंवा प्रयोगाच्या आयोजनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्ती तसेच सर्व सेवा प्रदाते व सहभागी होणाऱ्या व्यक्ती (जसे की, खेळाडू, अभिनेते, इत्यादी), अभ्यागत, पाहुणे, ग्राहक यांचे, यात यापुढे दिलेल्या व्याख्येनुसार, संपूर्ण लसीकरण केलेले असावे.

ब. जेथे जनतेतील कोणत्याही व्यक्तींना येण्याचा आणि सेवा घेण्याचा हक्क आहे असे कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल, समारंभ, संमेलन (मेळावे), इत्यादी ठिकाणी, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीद्वारे व्यवस्थापन केले पाहिजे आणि अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यागत, ग्राहक यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे.

क. सर्व सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी असेल. असे नसल्यास 72 तासांच्या आतील आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट सोबत असणे अत्यावश्यक असेल. याबाबत वाहनांची तपासणी करण्याकामी प्रादेशिक परिवहन विभागाकडील अधिकारी / कर्मचारी यांची पथके स्थापन करुन आवश्यक त्या ठिकाणी तपासणी, आकस्मीक भेटी देवून तपासणी करावी व ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन होत नसल्यास उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती / आस्थापना / वाहनांवर दंडात्मक / प्रशासकीय / फौजदारी कारवाई करण्यात यावी.

ड. राज्य शासनाने तयार केलेला युनिव्हर्सल पास (https://epassmsdma.mahait.org किंवा telegram-MahaGovUniversalPass Bot) हा, संपूर्ण लसीकरण झाल्याच्या स्थितीचा वैध पुरावा असेल. तसेच राज्य शासनाने जारी केलेल्या 9013151515 या व्हॉटस अप नंबर वरुन संपूर्ण लसीकरण सर्टिफिकेट प्राप्त करुन घ्यावे. अन्यथा, छायाचित्र असलेले वैध ओळखपत्र असलेले कोविन प्रमाणपत्र देखील त्यासाठी वैध पुरावा मानले जाईल. १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी, इतर शासकीय संस्थेने किंवा शाळेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र आणि वैद्यकीय कारणांमुळे ज्या व्यक्ती, लस घेऊ शकत नाहीत त्या व्यक्तींसाठी, प्रमाणित वैद्यकीय व्यावसायीकाकडील प्रमाणपत्र प्रवेशासाठी कागदोपत्री पुरावा म्हणून वापरता येईल.

इ. जेथे सर्वसामान्य जनतेतील कोणतीही व्यक्ती भेट देत नाही अशी कार्यालये व इतर आस्थापना तसेच खाजगी परिवहन सेवा यांच्यासाठी, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी त्या खुल्या असण्याची शर्त नसली तरी, त्यांना देखील संपूर्ण लसीकरण करणे आवश्यक आहे.

कोविड अनुरूप वर्तनाचे पालन काटेकोरपणे होईल यासाठी कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत आयुक्त व त्यांचे अधिकारी / कर्मचारी , नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत हद्दीत मुख्याधिकारी व त्यांचे अधिकारी / कर्मचारी तसेच ग्रामीण भागात गट विकास अधिकारी व त्यांचे अधिकारी / कर्मचारी याच बरोबर त्या त्या पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी / कर्मचारी तसेच वाहनांची तपासणी करण्याकामी प्रादेशिक परिवहन विभागाकडील अधिकारी / कर्मचारी यांची पथके स्थापन करुन आवश्यक त्या ठिकाणी तपासणी, आकस्मीक भेटी देवून तपासणी करावी व ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन होत नसल्यास उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती / आस्थापनांवर दंडात्मक / प्रशासकीय / फौजदारी कारवाई करण्यात यावी. तहसिलदार यांनी तात्काळ या व्यवस्थेची खात्री करावी.

३. कोल्हापूर जिल्ह्यात प्रवास:

कोणत्याही आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानावरून किंवा इतर राज्यातून कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांचे, या बाबतीतील भारत सरकारच्या निदेशांद्वारे विनियमन करण्यात येईल. जिल्ह्यात येणाऱ्या अशा सर्व प्रवाशांचे, यात यापुढे व्याख्या केल्यानुसार, संपूर्ण लसीकरण केले असलेबाबतची खात्री केली जाईल किंवा मागील ७२ तासांमध्ये नमुना घेवून बनलेले वैध असलेले आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र तपासले जाईल. असे न आढळल्यास सदर व्यक्तीस कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करु दिला जाणार नाही आणि जर प्रवेश केल्यास संस्थात्मक अलगिकरणामध्ये ठेवण्यात येईल. अशा व्यक्तींना गाव / शहरामध्ये शोधून विलगीकरण कक्षात आणण्याची जबाबदारी संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थांनी आरोग्य विभागाच्या मदतीने पार पाडावी.

कोविड अनुरूप वर्तनाचे पालन काटेकोरपणे होईल यासाठी विमानतळ प्राधिकरण, आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे तपासणी पथक नेमून विमानतळावर तीनही पाळीमध्ये तैनात ठेवावित. या पथकाची नेमणूक तहसिलदार करवीर यांनी करावी. विमानतळावरील अशा प्रवाशांसाठी संस्थात्मक विलगीकरण  ठिकाणांची  यादी बनविणे  व  व्यवस्था  करणे  ही  जबाबदारी आयुक्त, कोल्हापूर महानगपालिका  यांची राहील. इतर सर्व तालुक्यांमध्ये अशा प्रवाशांसाठी तालुका स्तरावर विलगीकरण केंद्र बनविण्याची व आवश्यक कर्मचारी नेमणेची जबाबदारी  संबंधीत नगरपालिकांची राहील. तहसिलदार यांनी तात्काळ या व्यवस्थेची खात्री करावी.                                                                                                               

४. कोणताही कार्यक्रम, समारंभ, इत्यादींमधील उपस्थितीवरील निर्बंध:

प्रत्येक कार्यक्रमाचा/समारंभाचा आयोजक आणि कार्यक्रम समारंभ ज्या ठिकाणी आयोजित करण्यात आला असेल त्या जागेचा व इमारतीचा मालक व व्यवस्थापक हे या आदेशातील सर्व अटींचे पालन करवून घेण्यास जबाबदार असतील.

अ. चित्रपट गृह, नाट्यगृह, मंगलकार्यालय, सभागृह, इत्यादी बंदिस्त /बंद जागेत घेण्यात येणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाच्या/समारंभाच्या/ उपक्रमाच्या बाबतीत, जागेच्या क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेपर्यंत परवानगी देण्यात येत आहे.

ब. संपूर्ण खुल्या असलेल्या (open to sky) जागांच्या बाबतीत, कोणत्याही समारंभांसाठी किंवा संमेलनांसाठी तेथील जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के लोकांना परवानगी दिली जाईल. संमेलनाच्या किंवा समारंभाच्या अशा ठिकाणांच्या बाबतीतील क्षमता, औपचारिकपणे आधीच निश्चित केलेली नसेल तर (उदा. स्टेडियम इ.) संबंधीत मनपा आयुक्त, मुख्याधिकारी किंवा तहसिलदार (ग्रामीण भागात) ही क्षमता निश्चित करतील.

क. खुल्या प्रांगण/लॉन मध्ये होणाऱ्या विवाह सोहळयास उपस्थितांची संख्या जास्तीत जास्त 200 व्यक्ती या मर्यादेत असेल.

ड. बंदीस्त मंगल कार्यालये/ हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 100 व्यक्ती या मर्यादीत असेल.

इ. जर वरील नियमानुसार कोणत्याही सामुहीक सोहळ्यासाठी / कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या एकूण लोकांची संख्या वरील निर्बंधापेक्षा अधिक असणे आवश्यक असेल तर, अशा बाबतीत. कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत आयुक्त व त्यांचे अधिकारी / कर्मचारी , नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत हद्दीत मुख्याधिकारी व त्यांचे अधिकारी / कर्मचारी तसेच ग्रामीण भागात गट विकास अधिकारी व त्यांचे अधिकारी / कर्मचारी यांना त्याची माहिती द्यावी लागेल व परवानगी घ्यावी लागेल आणि संबंधीत यंत्रणा अशा कोणत्याही संमेलनाचे (मेळाव्याचे) निरीक्षक म्हणून पर्यवेक्षण करण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी पाठवतील आणि तेथे वर नमूद केलेल्या नियमांचे काटेकोरपणे अनुपालन केले जात असल्याची खात्री करतील, कोविड-१९ च्या प्रसाराचा धोका लक्षात घेता, तेथे कोविड अनुरूप वर्तनाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले तर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या उक्त प्रतिनिधीला, कार्यक्रम पूर्णत: किंवा अंशत: बंद करण्याचे आदेश देण्याचा प्राधिकार असेल.

५. संपूर्ण लसीकरणाची व्याख्याः

संपूर्ण लसीकरण झालेली व्यक्ती याचा अर्थ, -

लसीच्या दोन्हीही मात्रा (डोस) घेतलेल्या आहेत आणि दुसरी मात्रा (डोस) घेतल्यानंतर १४ दिवस झालेले आहेत अशी कोणतीही व्यक्ती, असा आहे किंवा

ज्या व्यक्तीचे वैद्यकीय स्थिती अशी आहे की, ज्यामुळे त्याला किंवा तिला लस घेण्यास मुभा नाही आणि त्या व्यक्तीकडे तशा अर्थाचे मान्यताप्राप्त डॉक्टराकडील प्रमाणपत्र आहे अशी कोणतीही व्यक्ती. असा आहे. किंवा

१८ वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती असा आहे.

६. कोविड अनुरूप वर्तनविषयक नियम व दंड :

व्याख्या: कोविड १९ विषाणूचा प्रसार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यामुळे त्याच्या प्रसाराची साखळी खंडित करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने व संस्थेने पालन करण्याची गरज असलेले दैनदिन सामान्य वर्तन अशी कोविड अनुरूप वर्तन (CAB) या संज्ञेची व्याख्या करता येऊ शकेल, ज्यांचे काविड अनुरूप वर्तन (CAB) म्हणून म्हणून वर्णन केले जाते आशा वर्तनाच्या पैलूंमध्ये, खाली नमूद केलेल्या वर्तनांचा समावेश होतो आणि कोविड १९ विषाणूचा प्रसार होण्यास जे अडथळा निर्माण करू शकतील अशा सर्व तर्कसंगत पैलूंचा देखील समावेश होतो, त्यात नमूद केलेली त्याच्या प्रसाराची कार्यपद्धती (methodology) दिलेली आहे.

मूलभूत कोविड अनुरूप वर्तनाचे काही पैलू पुढीलप्रमाणे असून त्यांचे प्रत्येकाने सदैव पालन केले पाहिजे. सर्व संस्थांनी हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की, त्यांचे सर्व कर्मचारी, त्यांच्या परिसरांत भेट देणारे अभ्यागत, ग्राहक किंवा संस्थेच्या कोणत्याही कार्यक्रमात, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, सहभागी होणारी कोणीतीही व्यक्ती, त्याचे पालन करतील आणि त्यांच्या परिसरांमध्ये आणि/किंवा व्यवसायाशी संबंधित व्यवहार करताना किंवा संबंधित संस्थेशी संबंधित असलेली अन्य कार्य करताना, त्यांची अंमलबजावणी करण्याकरिता संस्था उत्तरदायी असतील. संस्था, त्यांच्या  नियंत्रणाखाली  किंवा जेथे ती संस्था आपला व्यवहार  किंवा इतर कार्य करत असेल अशा सर्व ठिकाणी, अशा सर्व कर्मचाऱ्यांनी कोविड़ अनुरूप वर्तनाचे पालन करण्यासाठी आवश्यक असलेल्या हॅन्ड सॅनिटायझर, साबण व पाणी, तापमापक (thermal scanner), इत्यादी गोष्टी उपलब्ध करण्यासाठी देखील जबाबदार आहेत.

१. नेहमी योग्य पद्धतीने मास्क परिधान करा. नाक व तोंड नेहमी मास्कने झाकलेले असले पाहिजे. मास्क हा एन९५/ सर्जिकल थ्री लेअर / कापडी थ्री लेअर असावा. याव्यतिरिक्त कापडी एकेरी मास्क दंडास पात्र राहील. (रुमालाला, मास्क समजले जाणार नाही आणि रूमाल वापरणारी व्यक्ती, दंडास पात्र असेल.)                                              

२. जेथे जेथे शक्य असेल तेथे, नेहमी सामाजिक अंतर (६ फूट अंतर) राखा.

३. साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार व स्वच्छपणे हात स्वच्छ धुवा.

४. साबणाने हात न धुता किंवा सॅनिटायझर न वापरता, नाक/डोळे/तोंड यांना स्पर्श करणे टाळा.

५. योग्य श्वसन स्वच्छता(आरोग्य) राखा.

६. पृष्ठभाग नियमितपणे आणि वारंवार स्वच्छ व निर्जतुक करा.

७. खोकताना किंवा शिंकताना, टिश्यू पेपरचा वापर करून तोंड व नाक झाका आणि वापरलेले टिश्यू पेपर नष्ट करा; जर एखाद्याकडे टिश्यू पेपर नसेल तर, त्याने स्वतःचा हात नव्हे तर, हाताचा वाकवलेला कोपर नाका तोडांवर ठेवून खोकाचे व शिकावे,

८. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.

९. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा आणि सुरक्षित अंतर (६ फूट अंतर) राखा.

१०. कोणालाही शारीरिक स्पर्श न करता, नमस्कार/अभिवादन करा.

११. कोविड-१९ विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी आवश्यक असलेले अन्य कोणतेही तर्कसंगत वर्तन.

शास्ती :

या नियमानुसार अपेक्षित असलेल्या कोविड अनुरूप वर्तनाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, असा कसूर केल्याच्या प्रत्येक प्रसंगी, रुपये ५००/- इतका दंड करण्यात येईल.

 ज्यांनी, आपले अभ्यागत, ग्राहक, इत्यादीवर कोविड अनुरूप वर्तन लादणे अपेक्षित आहे अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही परिवास्तूत (जागेत), जर एखाद्या व्यक्तीने कसूर केल्याचे दिसून आले तर, त्या व्यक्तीवर दंड लादण्याव्यतिरिक्त, अशा संस्थांना किंवा आस्थापनांना सुद्धा रुपये१०,०००/- इतका दंड करण्यात येईल. जर कोणतीही संस्था किंवा आस्थापना तिचे अभ्यागत, ग्राहक, इत्यादींमध्ये कोविड अनुरूप वर्तन विषयक शिस्त सुनिश्चित करण्यात वारंवार कसूर करीत असल्याचे दिसून आले तर, एक आपत्ती म्हणून कोविड १९-ची अधिसूचना अंमलातअसेपर्यत, अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.

 जर एखाद्या संस्थेने किंवा आस्थापनेने, स्वत:चे कोविड अनुरूप वर्तनाचे (CAB) किंवा प्रमाण कार्यचालन कार्यपद्धतीचे (SOP) पालन करण्यात कसूर केली तर, ती, प्रत्येक प्रसंगी, रूपये ५०,०००/- इतक्या दंडास पात्र असेल. वारंवार कसूर केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड-१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत ती संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.

जर कोणत्याही टॅक्सीमध्ये किंवा खाजगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये, कोविड अनुरूप वर्तनात कसूर केली जात असल्याचे आढळून आले तर, कोविड अनुरूप वर्तनात कसूर करणाऱ्या व्यक्तीना, रूपये ५००/- इतका दंड करण्यात येईल, तसेच सेवा पुरविणारे चाहनचालक, मदतनीस, किंवा वाहक यांना देखील रूपये ५००/- इतका दंड करण्यात येईल. बसेसच्या बाबतीत, मालक परिवहन एजन्सीस, कसुरीच्या प्रत्येक प्रसंगी, रुपये १०,०००/- इतका दंड करण्यात येईल, वारंवार कसूर केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड-१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत मालक एजन्सीचे लायसन काढून घेण्यात येईल किंवा तिचे परिचालन बंद करण्यात येईल.

कोविड अनुरूप वर्तणुकी संबंधीच्या वर नमूद केलेल्या नियमांचे, अनिवार्यपणे पालन करण्यात येईल आणि त्यांचे उल्लंघन केल्यास, वर नमूद केल्यानुसार दंड व शास्ती करण्यात येईल तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ नुसार कोणत्याही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे, उल्लंघन करणान्यांवर इतर कोणताही दंड किंवा शास्ती लादता येईल. कोविड अनुरूप वर्तनाचे नियम/धोरणे, वरील प्रमाणे असतील आणि त्यामध्ये विशेषरित्या नमूद न केलेले कोविड अनुरूप वर्तनाशी संबंधित असणार इतर कोणतेही विषय/मुद्दे. राज्य शासनाच्या अंमलात असलेल्या प्रचलित नियमानुसार/आदेशानुसार असतील.

कोविड अनुरूप वर्तनाचे पालन काटेकोरपणे होईल यासाठी कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत आयुक्त व त्यांचे अधिकारी / कर्मचारी , नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत हद्दीत मुख्याधिकारी व त्यांचे अधिकारी / कर्मचारी तसेच ग्रामीण भागात गट विकास अधिकारी व त्यांचे अधिकारी / कर्मचारी याच बरोबर त्या त्या पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी / कर्मचारी तसेच वाहनांची तपासणी करणेकामी प्रादेशिक परिवहन विभागाकडील अधिकारी / कर्मचारी  यांची  पथके  स्थापन  करुन  आवश्यक  त्या  ठिकाणी  तपासणी, आकस्मीक भेटी देवून तपासणी करावी व ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन होत नसल्यास उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती / आस्थापनांवर दंडात्मक / प्रशासकीय / फौजदारी कारवाई करणेत यावी. तहसिलदार यांनी तात्काळ याची खात्री करावी.

तसेच सर्व विभागांनी त्यांच्या मार्फत नियंत्रित (अंशत: किंवा पूर्णत:) आस्थापनांमध्ये या सर्व नियमांची अंमलबजावणी होत आहे याची खात्री करावी. यासाठी तहसिलदारांच्या मदतीने पथके नेमावीत. तसेच अशा सर्व आस्थापनांच्या कोविड विषयक शंकांचे निरसन करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची तात्काळ नेमणूक करावी. सर्व विभागांनी असे नोडल अधिकारी नेमल्याची खात्री निवासी उपजिल्हाधिकारी यांनी तात्काळ करावी.

आदेशा व्यतिरिक्त लागू करण्यात आलेले निर्बंध हे या आदेशाच्या दिनांकापासून 48 तासांनंतर म्हणजेच दिनांक 02 डिसेंबर 2021 रोजीचे सकाळी 05.00 वा. पासून अंमलात येतील. याबाबीसाठी आदेश हीच नोटीस समजण्यात यावी.

 

 

 

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.