इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, २४ मार्च, २०२२

पेड न्यूज व उमेदवाराच्या जाहिरात खर्चावर माध्यम सनियंत्रण व प्रमाणीकरण समितीची करडी नजर -जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार


 


* जिल्हा माध्यम सनियंत्रण व प्रमाणीकरण समितीची(MCMC) बैठक संपन्न

* राजकीय पक्ष व उमेदवारांनी जाहिरातीचे प्रमाणीकरण करून घेणे अनिवार्य

* नागरिकांनी पेड न्यूज बाबत तक्रार असल्यास diokop@gamil.com ई-मेल वर द्याव्यात

 

कोल्हापूर, दि. 24 (जिमाका):- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार तसेच अपक्ष उमेदवारांनी त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी मोहीम करावयाची असेल तर संबंधित ऑडिओ, व्हिडिओ क्लिप्स व मजकूर जिल्हा माध्यम सनियंत्रण व प्रमाणीकरण समितीकडून प्रमाणित करून घ्यावा. तसेच कोणत्याही प्रकारची पेड न्युज करू नये अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच राजकीय पक्ष उमेदवाराच्या निवडणूक जाहिरात खर्चावर समितीची करडी नजर राहणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा माध्यम सनियंत्रण व प्रमाणीकरण समितीचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी सांगितले.

           जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित जिल्हा माध्यम सनियंत्रण व प्रमाणीकरण समितीच्या पहिल्या बैठकीत जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. रेखावर मार्गदर्शन करत होते. यावेळी समितीचे सदस्य निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी प्रवीण चिपळुणकर, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री, सायबर तज्ञ विक्रांत पाटील, प्रा. शिवाजी जाधव, जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव सुनील सोनटक्के, माहिती अधिकारी तथा सहाय्यक नोडल अधिकारी वृषाली पाटील, माहिती सहाय्यक एकनाथ पोवार आदी उपस्थित होते.

          जिल्हा निवडणूक अधिकारी रेखावार पुढे म्हणाले की, समितीच्या सर्व सदस्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष व उमेदवाराच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर अधिक बारकाईने लक्ष ठेवावे. तसेच दैनंदिन वृत्तपत्रातून प्रसारित होणाऱ्या राजकीय व प्रचाराच्या बातम्यांची निवडणूक आयोगाच्या पेड न्युज संदर्भातील मार्गदर्शक सूचनेप्रमाणे योग्य ती तपासणी करून संबंधित वृत्त पेड न्यूज सदृश्य असल्यास तात्काळ समिती समोर ठेवावे व संबंधित उमेदवाराला त्या पेड न्यूजचा खर्च त्याच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्याबाबत नोटीस देण्याबाबत प्रस्तावित करावे, अशी सूचना त्यांनी केली.

         जिल्ह्यातील सर्व प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया प्रतिनिधिनी कोणत्याही राजकीय पक्षाची व उमेदवाराची जाहिरात प्रसारित करण्यापूर्वी त्या जाहिरातीचे प्रमाणीकरण माध्यम सनियंत्रण व प्रमाणीकरण समितीकडून करण्यात आलेले आहे का याची खात्री करावी व त्यानंतर त्याचे प्रसारण करावे. कोणीही अनाधिकृत जाहिरात प्रसारित करू नये अन्यथा निवडणूक नियमावलीप्रमाणे संबंधितांवर कठोर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असे निर्देश श्री. रेखावार यांनी दिले. तसेच जिल्ह्यात जे अनाधिकृत यूट्यूब चैनल आहेत त्या सर्वांनी राजकीय पक्ष व उमेदवाराची विना परवानगी जाहिरात प्रसारित करू नये, अन्यथा संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी निर्देशित केले.

     यावेळी समिती सदस्यांनी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियावर कशा पद्धतीने नियंत्रण ठेवावे, पेड न्युज नियंत्रण याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या. तसेच समितीकडे आलेल्या राजकीय पक्ष उमेदवाराचे व्हिडीओ क्लिप, ऑडिओ क्लिप व आणि जाहिरात मजकुराचे निवडणूक आयोगाच्या नियमावलीप्रमाणे विहित वेळेत प्रमाणीकरण करून देण्यात येईल असे सांगितले.

       प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव सोनटक्के यांनी जिल्हा माध्यम व प्रमाणीकरण सनियंत्रण समितीची रचना व कार्य याविषयी बैठकीत सविस्तर माहिती दिली.

पेड न्यूजच्या अनुषंगाने नागरिकांनी जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे तक्रारी द्याव्यात

             276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या अनुषंगाने कोणत्याही राजकीय पक्ष व उमेदवारा बाबत पेड न्यूजच्या अनुषंगाने तक्रारी असतील तर नागरिकांनी जिल्हा माहिती कार्यालय यांच्या ई-मेल diokop@gmail.com वर द्याव्यात, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.