इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, २३ मार्च, २०२२

शासकीय जमिनींमध्ये गौण खनिज उत्खनन परवानगीसाठी खनिकर्म अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज सादर करा

 


 

कोल्हापूर, दि. 23 (जिमाका): गौण खनिज खाणपट्याकरिता शासकीय जमीनीच्या लिलावाकरिता कार्यपध्दती अनुसरुन जमीनींचे जाहिर लिलाव करण्याचे नियोजन  करण्यात आले आहे. इच्छुक सर्व व्यावसायिकांनी कोणत्याही शासकीय जमिनींमध्ये गौण खनिज (दगड, माती, मुरुम) उत्खननाची परवानगी हवी असल्यास त्या जमिनीचा 7/12, 8अ उताऱ्यासह लेखी अर्ज जिल्हा खनिकर्म अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्याकडे सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार वजिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील यांनी केले आहे.

लिलावाची विहित प्रक्रिया पूर्ण करून शासन निर्णयातील तरतुदीनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनीसुध्दा अशा लिलाव योग्य जमिनींची माहिती खनिकर्म कार्यालयास सादर करावी.

शासकीय जमिनीसाठी लिलाव प्रक्रियेसाठी अर्ज सादर करताना जमिनीचे किमान क्षेत्र एक हेक्टर असावे व शासकीय जमीन ही गायरान, राष्ट्रीय उद्यान, वन्यजीव अभयारण्ये, इनामी, देवस्थान जमीन, राखीव वनक्षेत्र किंवा वनसंज्ञेत सामाविष्ट नसावी या निकषांचे पालन करावे.

खासगी जमिनीवरील खाणपट्टे खासगी जमीनधारक किंवा भोगवटादार यांच्या नावे मंजूर करण्यासाठी लिलाव प्रक्रियेमधून वगळण्यात येतील आणि खासगी जमिनधारकास किंवा भोगवटादारास त्यांच्या अर्जानुसार खाणपट्टा मंजूर करण्यात येईल. खासगी जमीनधारक किंवा भोगवटादार त्यांची जमीन अन्य व्यक्तीस खाणकामासाठी देण्यास इच्छुक असेल तर, असा जमीनधारक किंवा भोगवटादार, जिल्हाधिकाऱ्यांना या संबंधात लेखी संमतीपत्रक देईल. नंतर जिल्हाधिकारी विनिर्दिष्ट कालावधीकरिता लिलावाने अशा जमिनीत खाणकाम करण्याचा हक्क मंजूर करतील. अशा प्रकरणी लिलावापासून प्राप्त झालेली रक्कम शासनाकडे जमा करण्यात येईल व शासनाकडून वेळोवेळी निश्चित करण्यात येणारी भूपृष्ठ भाड्याची रक्कम जमीनधारक किंवा भोगवटादार यांना देण्यात येईल.

00000

 

 

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.