इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, २५ मार्च, २०२२

मटण विक्रेत्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेल्या मटणाचीच विक्री करावी

 


 

कोल्हापूर दि. 25 (जिमाका) : शहरातील मटण विक्रेते महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमाणित न केलेले मटण विक्री करीत असल्याचे तपासणी दरम्यान आढळून आले आहे. या प्रकरणी बऱ्याच वेळा मटण विक्रेत्यांना दंड देखील करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील सर्व मटण विक्रेत्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या कत्तलखान्यामध्येच बकरे कत्तल करावेत आणि महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले मटणच विक्री करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त तु. ना. शिंगाडे यांनी केले आहे.

 

स्वतःच्या व्यवसायाच्या ठिकाणीच बकरे कत्तल केल्याने तेथून निघणारे सांडपाणी नाल्याद्वारे नदीमध्ये मिसळून नदी प्रदुषण होऊ शकते तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांनी प्रमाणित न केलेले मटण विक्री केल्याने शहरातील लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याचा धोका संभवतो. तरी देखील बहुतांश मटण विक्रेते महानगरपालिकेच्या कत्तलखान्यामधून बकरे कत्तल न करता स्वतःच्या व्यवसायाच्या ठिकाणीच बकरे कत्तल करीत असल्याचे आणि वारंवार महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी यांनी प्रमाणित न केलेले मटण विक्री करित असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याअनुषंगाने अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत स्थापन झालेल्या जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी देखील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील मटण विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेले आहेत.

 

या नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या मटण विक्रेत्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई समवेत परवाना निलंबन तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे, याची सर्व मटण व्यावसायिकांनी नोंद घ्यावी, असे सहायक आयुक्त श्री. शिंगाडे यांनी कळविले आहे.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.