इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, १५ मे, २०२३

ज्येष्ठांना शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक कक्ष

 


 

   कोल्हापूर, दि.15 (जिमाका):  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयान्वये जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची ज्येष्ठांना एकाच छताखाली माहिती जोडून देण्याचे काम समाज कल्याण विभागामार्फत सुरु आहे. या योजनांचा लाभ संबंधित वृद्धांना देण्यासाठी सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयात ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

भारताच्या संविधानातील राज्य धोरणाची निर्देशक तत्वावरील अनुच्छेद 39 क व 41 मध्ये ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावा अशी तरतूद आहे. ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृद्धापकाळ चांगल्या पद्धतीने घालविता यावा, समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे शारीरिक, मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे, यासाठी राज्याचे जेष्ठ नागरिक धोरण जाहीर केले आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या या ज्येष्ठ नागरिक कक्षाला कोल्हापूर जिल्ह्यातील मुक्तांगण या ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य परशुराम नांदवडेकर, राजश्री नांदवडेकर, विद्या रमेश चव्हाण तसेच बाळासाहेब भोगम या ज्येष्ठ नागरिकांनी या कक्षास आज भेट दिली. परशुराम नांदवडेकर वय 62, राजश्री नांदवडेकर वय 60, विद्या रमेश चव्हाण वय  60 या ज्येष्ठ नागरिकांनी माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केला.  या अनुषंगाने समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला. ज्येष्ठ नागरिक समाजाच्या आदर्शस्थानी असतात. ज्येष्ठांपासून अनुभवाच्या गोष्टी शिकायला मिळतात, तसेच चांगला समाज घडवण्यामध्ये  ज्येष्ठांचा विशेष समावेश असतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ नागरिकांच्या मनोगतामध्ये बाळासाहेब भोगम (76 वर्षे) यांनी 1992 पासून मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवत अनेक तालुकास्तरीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल संपादन केल्याच्या अनुषंगाने त्यांचाही समाज कल्याण विभागाच्यावतीने सत्कार करण्यात आला. विद्या चव्हाण यांनी एवरेस्ट गाठण्यासाठीचे आपले थरारक अनुभव सांगताना 5 हजार 364 मीटर एव्हरेस्ट गाठून कोल्हापूरचे नाव उंचावले. परशुराम नांदेडकर यांनी शासनाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांची दखल घेऊन या विभागाने नक्कीच ज्येष्ठांच्या कलागुणांना वाव दिल्याबद्दल या विभागाचे शतशः आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा डवर यांनी तर आभार समाज कल्याण निरीक्षक कल्पना पाटील यांनी मानले. कार्यक्रमास कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.