इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०२३

तृतीयपंथीयांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन कक्ष सुरु

 


कोल्हापूर, दि. 5 ( जिमाका) : केंद्र शासनाच्या पोर्टलवर तृतीयपंथीयांची नोंदणी करुन त्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी तसेच शासन व समाजकल्याण आयुक्तालयाच्या सूचनांची माहिती जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना देण्यासाठी व त्यांच्या समस्या स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, कोल्हापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, विचारे माळ, कोल्हापूर येथे तृतीयपंथीयासाठी स्वतंत्र हेल्पलाईन कक्ष सुरु करण्यात आला असल्याची माहिती समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी दिली आहे.

जिल्हा स्तरावर तृतीयपंथीय व्यक्तीच्या समस्या व तक्रारींचे निवारण करणे, तृतीयपंथीयांसाठी राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती देणे, महाविद्यालयांशी संपर्क साधून तृतीयपंथीय विद्याथ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडविणे, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्यनिवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना तसेच शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ देण्यासाठी कार्यवाही करणे व त्याबाबतच्या अडचणी सोडविणे, शिधापत्रिका, मतदान कार्ड व आधारकार्ड काढण्यासाठी मदत करण्यात येणार आहे.

कक्षाशी संपर्क साधण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक (०२३१) २६५१३१८ आहे. जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांनी या कक्षाशी प्रत्यक्ष संपर्क साधून अथवा हेल्पलाईन क्रमांकाद्वारे संपर्क साधून शासकीय योजनांची माहिती घ्यावी तसेच समस्या व तक्रारींबाबत माहिती दयावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त,  श्री साळे यांनी केले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.