इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, ३१ ऑक्टोबर, २०२३

सैन्य भरतीला उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना सोयीसुविधा द्याव्यात - निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली

 


 कोल्हापूर, दि. 31 (जिमाका): कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या ॲथलेटिक्स ग्राउंडवर 11 ते 22 डिसेंबर 2023 दरम्यान होणाऱ्या सैन्य भरती मेळाव्यासाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केल्या.

   सैन्य सैन्य भरती मेळाव्याच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सैन्य भरती कार्यालयाचे संचालक कर्नल आकाश मिश्रा व सैन्य भरती सहायक अधिकारी तसेच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल (निवृत्त) राहुल माने, करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे, तहसीलदार (चिटणीस) स्वप्नील पवार,  कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे सहायक आयुक्त संजय माळी, जिल्हा क्रीडा अधिकारी मनीषा पाटील, शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक शरद बनसोडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ व संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

  सैन्य भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना पिण्याचे पाणी, ये-जा करण्यासाठी के.एम.टी. बसेसची सोय, आरोग्य सुविधा, तात्पुरती स्वच्छतागृहे उपलब्ध करुन द्यावीत. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सैन्य भरतीला उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना चहा, नाश्ता, भोजनाची सोय करावी. या ठिकाणी गर्दी होवू नये याचे नियोजन करावे. वाहतूक व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था राखावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.

 सैन्य भरती कार्यालयाच्या वतीने आवश्यक ते नियोजन करण्यात आले असल्याची माहिती संचालक कर्नल आकाश मिश्रा यांनी दिली.

  सैन्य भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने मैदान व्यवस्था, विद्युत व्यवस्था, उमेदवारांची भोजन व राहण्याची व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था, वाहन व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, मनुष्यबळ उपलब्धता आदी चोख तयारी करावी, अशा सूचना तहसीलदार स्वप्नील पवार यांनी दिल्या. सैन्य भरती सुरळीत पार पडण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे, असे तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी सांगितले.

****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.