इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, ३१ ऑगस्ट, २०१९

पोषण माह अभियान राबवून जिल्ह्याचा नाव लौकीक वाढवाल -जिल्हाधिकारी दौलत देसाई









        कोल्हापूर, दि. 31 (जिमाका) : पूर्ण आत्मविश्वासाने आणि जोशपूर्ण वातावरणात पोषण माह अभियान चांगल्या पध्दतीने राबवून अंगणवाडी सेविका जिल्ह्याचा नावलौकीक वाढवतील, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज व्यक्त केली.
       जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत पोषण माह अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महिला व बालविकास समितीच्या सभापती वंदना मगदूम आदी उपस्थित होते.
          वृक्षाला पाणी देऊन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्याचबरोबर अभियानाच्या लोगोचेही उपस्थितांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. जिल्हाधिकारी श्री. देसाई पुढे म्हणाले, पुणे जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना केवळ अंगणवाडी आणि आशा सेविकांच्या आत्मविश्वासावर आणि त्यांना दिलेल्या जबाबदारीवर संपूर्ण जिल्हा हागणदारी मुक्त केला होता. प्रत्येक सेविकेकडे दिलेल्या कुटुंबाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केली होती.
          जिल्ह्यावर आलेल्या आपत्तीमध्ये अंगणवाडी शाळांचे तसेच साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यासाठी विशेष निधी दिला आहे. या परिसारातील स्वच्छतेसाठी प्राधान्य द्या. त्यामुळे अंगणवाडीमध्ये बालकांचे आरोग्य चांगले राहील. याकामी आवश्यकती सर्व मदत केली जाईल, असे आश्वासनही जिल्हाधिकाऱ्यांनी शेवटी दिले.
          अंगणवाडी सेविकांनी मागील वर्षी चांगले काम केले आहे, असे सांगून श्री. मित्तल पुढे म्हणाले, याही वर्षी आपला जिल्हा देशात आघाडीवर राहील असे काम व्हायला हवे. जिल्ह्यातील आपत्तीमुळे अंगणवाडींचे झालेले नुकसान 3 महिन्यांमध्ये भरून काढले जाईल, असेही ते म्हणाले.
          अध्यक्ष श्रीमती महाडिक म्हणाल्या, अंगणवाडी सेविकांमुळे देशात कोल्हापूरला ओळख मिळाली. याही वर्षी करवीर प्रकल्प 2 ला पारितोषिक मिळाले. हे सर्व तुमच्यामुळे घडले आहे. त्याबद्दल तुमचे मन:पूर्वक आभार आणि अभिनंदन. सभापती श्रीमती मगदूम, सदस्य आकांक्षा पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
          महिला व बालविकासचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. यामध्ये पोषण माह दरम्यान घेण्यात येणारे कार्यक्रम व उपक्रम याविषयी सविस्तर माहिती दिली. बालविकास प्रकल्प अधिकारी एम.एम. पालेकर यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालविकास प्रकल्प अधिकारी पी.एस.कुंभार यांनी केले. यावेळी महिला व बालविकास समितीच्या सदस्य पद्माराणी पाटील, शिवानी भोसले, कल्पना चौगुले, रेखा हत्तरकी, सुनीता रेडेकर, आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, राजेंद्र भालेराव आदी उपस्थित होते.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.