इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१९

महापुरामुळे ग्रामीण भागात झालेल्या नुकसानीचा अहवाल तात्काळ सादर करा - ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे




            कोल्हापूर, दि. 29 (जि.मा.का.) : महापुरामुळे ग्रामीण भागात झालेल्य नुकसानीचा अहवाल ग्राम विकास विभागास त्वरीत सादर करावा. यामध्ये ग्राम पंचायत हद्दीतील रस्ते, मालमत्ता, इमारती, स्मशानभूमी शेड, इतर मालमत्ता, अंगणवाडी इमारती, ग्रामीण भागातील घरांचा समावेश असावा, अशा सूचना ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या.
            जिल्ह्यात महापुरामुळे ग्रामीण विभागाकडील झालेल्या नुकसानीचा आढावा महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील व ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काल जिल्हा परिषदेत घेतला.  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
            श्रीमती मुंडे म्हणाल्या, ग्राम पंचायत हद्दीतील रस्ते, मालमत्ता, इमारती, स्मशानभूमी शेड, इतर मालमत्ता, अंगणवाडी इमारती, ग्रामीण भागातील घरांच्या नुकसानीचा अहवाल ग्राम विकास विभागास सादर करावा. त्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करुन दिला जाईल. पुरबाधीत गावांमधील पाणी पुरवठा योजना, हातपंप, पाझर तलाव, जॅकवेल, ग्रामीण रस्ते, इतर जिल्हा मार्ग रस्ते, प्रा.आ.केंद्र इमारत उपकेंद्र इमारत, पशुवैद्यकीय दवाखाने, शाळा इमारती, पशुधनाचे झालेले नुकसान याबाबतचा आढावा त्यांनी घेतला.  या नुकसानीबाबत अहवाल ज्या-त्या मंत्रालयीन विभागास सादर करुन त्याची प्रत ग्राम विकास विभागास द्यावी. ग्राम विकास विभाग याबाबत पाठपुरावा करेल, असेही त्या म्हणाल्या.
            जिल्हयातील ग्रामीण भागातील 35000 घरांचे नुकसान झाले असून, सदर गावांना नुकसानीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष घरांना भेटी देवून, नुकसान झालेल्या घरांची माहिती आवास सॉफ्ट मध्ये नोंद करण्यात यावी.  त्या सर्वांना घरे मंजूर करण्याची कार्यवाही करण्यात येईल. जी घरे अतिक्रमणात आहेत, त्या नुकसान झालेल्या घरांचे अतिक्रमण नियमीत करुन देण्यात येतील किंवा पर्यायी जागा उपलब्ध झाल्यास त्याप्रमाणे व्यवस्था करण्यात येईल, असे ग्रामविकास मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या. 
            हातकणंगले तालुक्यातील हालोंडी या पुरग्रस्त गावास भेट देवून, नुकसानीबाबत माहिती घेतली, यावेळी त्यांनी गावांतील शाळा, अंगणवाडी तसेच घरे पडलेल्या ग्रामस्थांना भेटी दिल्या. ग्रामस्थांच्या भेटी घेवून जे नुकसान झालेले आहे,  त्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी तात्काळ कार्यवाही करावी, अशी सूचना श्रीमती मुंडे यांना दिल्या.
            जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी पुरहानीमध्ये झालेल्या नुकसानीबाबत माहिती दिली.
 0 0  0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.