इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१९

अटल महापणन अभियानात जिल्हा राज्यात अग्रेसर 230 संस्थांनी घेतला सहभाग : एक कोटीवर मिळविले उत्पन्न




        कोल्हापूर, दि. 30 (जि.मा.का.) : अटल महापणन विकास अभियानाच्या अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर असून जिल्ह्यातील 230 वि.का.स. सेवा संस्था आणि खरेदी विक्री संघानी या अभियानात सहभाग घेऊन विविध व्यवसाय उद्योगाव्दारे एक कोटीवर उत्पन्न मिळविले आहे. यापुढील काळात जिल्ह्यातील अधिकाधिक विकास सेवा संस्थांनी या अभियानात सहभागी होवून आर्थिक दृष्टया सक्षम व्हावे, अशी अपेक्षा कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक अनिरुध्द अष्टपुत्रे यांनी आज येथे बोलताना केली.
        सहकार विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या अटल महापणन विकास अभियानांतर्गत आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय लोकसंवाद मोहीमेचा शुभारंभ माहिती उपसंचालक अनिरुध्द अष्टपुत्रे यांच्याहस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा उप निबंधक कार्यालयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमास सहायक निबंधक टी.बी. बल्लाळ, प्रदीप मालगावे, संभाजी पाटील,अमित गराडे यांच्यासह जिल्ह्यातील विकास सोसायट्यांचे चेअरमन, सचिव उपस्थित होते.
            अटल महापणन विकास अभियानामध्ये जिल्ह्यातील 224 विकास सेवा संस्था आणि 6 खरेदी विक्री संघ सहभागी झाले असून या संस्थांनी 14 कोटी 69 लाखाची गुंतवणूक विविध व्यवसायत केली आहे. या गुंतवणुकीद्वारे 15 कोटी 47 लाखाची उलाढाल करुन 1 कोटी 6 लाखाचे उत्पन्न तर 58 लाखाचा निव्वळ नफा मिळविला आहे. विकास संस्थांनी या अभियानाद्वारे सुरु केलेल्या विविध व्यवसाय उद्योगामुळे 135 जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहे. यामध्ये कितेक विकास सेवा संस्थांनी महत्वपूर्ण योगदान  दिले असून गावकऱ्यांना सहायभुत ठरतील असे व्यवसाय विकसित करुन आर्थिकदृष्टया सक्षम बनण्याची नवी दिशा स्विकारलेली आहे. यामध्ये वॉटर एटीएम, सांस्कृतिक भवन, सोलर ऊर्जा प्रकल्प, मॉल, झेरॉक्स सेंटर, खत विक्री, धान्य विक्री, केटरिंग, पिठाची गिरणी असे कित्येक व्यवसाय यशस्वीपणे चालविले जात आहेत. या अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातून विकास सेवा संस्था गटातून कसबा बावडा येथील श्रीराम विकास सेवा संस्थेस प्रथम पुरस्कार, कोथळी विकास सेवा संस्थेस द्वितीय पुरस्कार, शेडशाळ ग्राम विकास सेवा संस्थेचे तृतीय पुरस्कार तर कोल्हापूर विभागातून खरेदी विक्री संघ गटांतर्गत  चंदगड तालुका खरेदी विक्री संघ, मर्या. तुर्केवाडी प्रथम पुरस्कार आणि आजरा तालुका सहकारी खरेदी विक्री संघास तृतीय पुरस्काराने सन्मानित केले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
            अटल महापणन विकास अभियान ही राज्य शासनाची महत्वकांक्षी योजना असल्याचे स्पष्ट करुन श्री. अष्टपुत्रे म्हणाले, या योजनेद्वारे विकास सेवा संस्था अधिक सक्षम होण्याबरोबरच रोजगार निर्मितीचे केंद्र म्हणून विकसित होवू लागले आहे. या अभियानाद्वारे मिळणारा नफा संस्थेच्या व सभासदांच्या हितासाठी उपयुक्त ठरणार आहे. यापुढील काळत जिल्ह्यातील सर्वच विकास सेवा संस्था व खरेदी विक्री संघांनी या अभियानात उत्स्फुर्तपणे सहभाग घेवून सहकार क्षेत्र अधिक सक्षम बनवावे, असे आवाहनही त्यांनी केले. या अभियानांतर्गत गावातील 100 टक्के शेतकऱ्यांनी विकास सोसायट्यांचे सभासद होवून सहकाराद्वारे ग्राम विकासाची नवी सुरुवात करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
            सहकार विभागाच्यावतीने गा्रमीण भागाच्या उन्नतीसाठी राबविण्यात येत असलेले अटल महापणन विकास अभियान गावा गावापर्यंत प्रभावीपणे पोहचावे तसेच या अभियानाचा लाभ घेवून विकास सेवा संस्था आर्थिकदृष्टय सक्षम आणि कार्यक्षम बनाव्या यासाठी सहकार विभागाने हे अभियान गतिमान करावे, असे सांगून श्री. अष्टपुत्रे म्हणाले, या अभियानांतर्गत सहभागी झालेल्या संस्थांच्या यशोगाथा तयार करण्यास माहिती विभागामार्फत पुढाकार घेतला जाईल. जेणेकरुन इतर विकास सेवा संस्थांना या अभियानाची माहिती व प्रोत्साहन मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
            प्रारंभी सहायक निबंधक प्रदीप मालगावे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात अटल महापणन विकास अभियानाची सविस्तर माहिती दिली. यावेळी या अभियानाच्या अनुषंगाने सहायक निबंधक टी.बी. बल्लाळ, संभाजी पाटील, बाळासाहेब पाटील तसेच चिखली विकास सोसायटीचे सचिव विकास पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी सहायक निबंधक अमित गराडे आभार मानले. समारंभास जिल्ह्यातील विकास सोसायट्यांचे पदाधिकारी आणि सचिव उपस्थित होते.
 00 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.