इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, ३१ ऑगस्ट, २०१९

दातृत्वाची वज्रमुठ... कोल्हापूरकरांची बात काही औरच...सलाम कोल्हापूरकरांना... माणुसकीचा महापूर अशा शब्दात कोल्हापूरकरांविषयी कृतज्ञता व्यक्त





















            कोल्हापूर दि. 31 (जिमाका) : महापुराने अनेकांचे संसार वाहून गेले. कोल्हापूरकरांच्या दातृत्व पुढे आले आणि त्यांचे वज्रमुठ नव्या संसार उभारणीत कामी आली. कोल्हापूरकरांच्या मदतीचा रस्त्यावर उतरलेला महापूर पाहून बात काही औरच आहे. अशा कोल्हापूरकरांना सर्वांचा सलाम, अशा शब्दामध्ये आज विविध वक्त्यांनी कोल्हापूरकरांविषयी आपल्या भाषणात कृतज्ञता व्यक्त केली.
       नुकत्याच येवून गेलेल्या आपत्तीमध्ये कोल्हापुरातील विविध संस्था, सामाजिक कार्यकर्ते, रेस्क्यू टिम, तरुण मंडळे, सेवाभावी संस्था यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येथील केशवराव भोसले नाट्यगृहात कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, पश्चिम देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, आमदार उल्हास पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, प.पू. काडसिध्देश्वर स्वामी, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उप महापौर भुपाल शेटे आदी उपस्थित होते.
            सुरुवातील विनायक म्हेत्तर यांनी महापुरावर बनवलेली चित्रफीत दाखविण्यात आली. पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यावेळी म्हणाले, आपत्तीच्या काळात स्वयंस्फूर्तीने नागरिक पुढे आले. रेस्क्यू आणि रिलिफचं आदर्श काम केलं. हे काम पाहून पोलीस दलातर्फे मी सलाम करतो. भविष्यामध्ये याविषयी संशोधन आणि अभ्यास केला जाईल त्यावेळी त्याला कोल्हापूर पॅटर्न म्हणून ओळखले जाईल.
            आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, कोल्हापूरकरांचा मला अभिमान वाटतो. जयंती नाला सफाईच्या कामात ही मंडळी हिरिरीने सहभागी झालीत. कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुपचं नियोजन अत्यंत सुंदर पध्दतीने सुरु होत. प्रत्येकाने संघटनात्मक पातळीवर काम केल्याने आपण यशस्वी राहीलो. सर्व संघटनांनी निरोगी कोल्हापूरसाठी मोठ्या प्रमाणात जनजागराणाचे काम सुरु केले.  या सर्वाला सलामचं.
            डॉ. योगेश जाधव म्हणाले, तिपटीने पाऊस पडला अनेकांचे संसार वाहून गेले, शेती वाहून गेली, कित्येक वर्ष सांगली, कोल्हापूर मागे जाण्याची भिती निर्माण झाली. अशातच कोल्हापूरकरांचे दातृत्व पुढे आले. जीवाचं रान करुन ज्ञात, अज्ञात लोकांनी मदतीचं काम सुरु केलं. ही वज्रमूठ अनेकांचे संसार उभं करण्यासाठी उपयोगी पडली. अशा कामाला मी सलाम करतो.
            मदतीच्या कार्यात माता भगिनी सुध्दा मोठ्या प्रमाणात सहभागी होत्या, असे सांगून पश्चिम देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. जाधव पुढे म्हणाले, इतक्या मोठ्या आपत्तीमध्ये मनुष्य हानी झाली नाही. अशी आपत्ती येवू नये म्हणून अभ्यास करुन आपल्याला तयारी करावी लागेल. त्याचबरोबर अंमलबजावणीही करावी लागेल. पश्चिम देवस्थान समितीकडून बाधित झालेली मंदिरे आणि शाळा यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. पंचगंगा हॉस्पिटल आणि बावड्यातील शासकीय रुग्णालयाला प्रत्येकी 15 लाखांची मदत देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
            झालेले अतिक्रमण, चुकीची बांधकामे, चुकीचा विसर्ग आणि अतिरिक्त पाऊस या सर्वांमुळे महापूर आला. अल्लमट्टी आणि हिपरगी या दोन धरणामुळे सांगली, कोल्हापूर दोन्ही जिल्हे महापुरात अडकले, असे सांगून आमदार उल्हास पाटील पुढे म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरण दरीवर बांधलं. मिरज ते कोल्हापूर रेल्वे सुरु केली या मार्गावर 7 ठिकाणी पुल बांधले, प्रत्येक पुलाला कमानी ठेवल्या, कुठेही नदी अडवली गेली नाही.  एवढ्या मोठ्या महापुरातही कोठेही भराव वाहून गेला नाही मात्र 2005 नंतर आम्ही तयार केलेले रस्ते भरावासकट वाहून गेले. हिपरगी धरण उंचावर बांधलं गेलं बॅरेजमधून आखीनदी 22 गेट मधून जाते. 90 किलो मीटर अंतरात माझा जिल्हा बुढाला.  अशा आपत्तीमध्ये जनतेला धक्का लागता कामा नये यासाठी आपल्याला टक्कर द्यावी लागेल. महापुरातून वाचले आणि धक्याने गेले अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळत आहेत. अशा धक्यातून पुन्हा जगण्याची नवी उमेद द्यावी लागेल. पूर नावाची आपत्ती गावाकडं पुन्हा येणार नाही अशा विश्वास द्यावा लागेल. हे काम कित्येक जण करत आहेत या सर्वांना मनापासून धन्यवाद.
            जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी महापुरातील अनेक प्रसंग सांगितले. ते म्हणाले,  ज्या गणरायाचं गोड कौतुक करत घरी आणयाचं त्याची पुजाअर्चा करायची आणि वाजत गाजत विसर्जन करायचं, अश गणरायालाही घरी आणण्यापूर्वीच पुरात विसर्जित व्हावं लागलं. आपत्तीग्रस्तांच्या मदतीला माणसांच्या मदतीचा महापूर रस्त्यावर उतरला होता. यात मुलीसुध्दा प्रलयात बोटी चालवत होत्या. यावेळी झालेल्या समाजाचा सहभाग हा रोल मॉडेल म्हणून जगात उदाहरण निर्माण करेल. प्रथमच हायवे बंद करण्याचा निर्णय घ्यावा यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील लाईफ लाईन बंद पडली होती. अशा कठीण परिस्थितीतही प्रशासनाच्या विरोधात आक्रोश दिसला नाही याचे सर्व श्रेय कोल्हापूरकरांना जाते. मदतीत सुध्दा ते कुठेही कमी पडले नाहीत. 80 ते 90 हजार कुटुंबांपर्यंत पोहोचले. संकटाची दाहकता कमी झाली. कोल्हापूरकरांची बात काही औरच, अशा शब्दात त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
            आपत्तीच्या काळात प्रशासन सतर्क आणि सज्ज होते, असे सांगून शाहू महाराज म्हणाले, सामाजिक संघटना पुढे आल्या, सर्वांनी हातभार लावला यात माणुसकीची एकजूट दिसली.  कोल्हापूरकरांनी आपत्तीग्रस्तांना स्वत:च्या पाण्यावर उभे राहण्यासाठी साथ दिली. योग्य दिशा मिळाली आणि योग्य लोकांपर्यंत मदत देखील पोहचली. यासर्वांमधून निसर्गाचा आदर केला पाहिजे, त्याच्या विरोधात जावू नये, असा संदेश मिळाला आहे.
            आपलं कार्य संपलय असं न समजता उद्या पासून कुटुंब उभारण्याच्या नव्या कार्याला सुरुवात करा, असा संदेश प.पु.काडसिध्देश्वर स्वामींनी दिला. ते म्हणाले, भाड्याची घरं मिळवून देणं हे आवश्यक काम आहे. 100 ते 150 तात्पुरती घरं आम्ही उभी करतोय. अजूनही जनावरांसाठी चाऱ्याची कमतरता आहे उद्यापासून चारा छावण्या सुरु करा. सरकारी यंत्रणेने रोगराई होवू दिली नाही, मनुष्य  हानी होवू दिली नाही. स्वयंसेवकासारखे सरकारी अधिकारी काम करत होते. आपल्याला संयम सोडून चालणार नाही, माणुसकीचा महापूर थांबवून चालणार नाही. उद्यापासून नव्या कार्याला सुरुवात करा. उपमहापौर श्री. शेटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
            यावेळी डेंग्युबाबत जनजागरण करणाऱ्या पोस्टरचे प्रकाशनही करण्यात आले. 80 हून अधिक सेवा संस्था, तरुण मंडळे, रेस्क्यू टिम्स, संघटना यांना कृतज्ञता पत्र देवून गौरविण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी स्वागत प्रास्ताविक तर मोहन घाडगे यांनी आभार प्रदर्शन केले.
           
000000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.