इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०

जनगणना आता मोबाईल ॲपद्वारे अधिकारी -कर्मचाऱ्यांनी डिजीटल जनगणनेची अचूक माहिती घ्यावी -जिल्हाधिकारी दौलत देसाई जनगणनेची माहिती नियोजन व देशाच्या प्रगतीसाठी पायाभूत -जिल्हाधिकारी






       कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : जनगणना ही आता मोबाईल ॲपद्वारे होणार असल्याने ती अधिक अचूक आणि प्रभावीपणे होईल, यासाठी नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी डिजीटल जनगणनेची अचूक माहिती घेऊन काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
       जनगणना संचालनालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जनगणना 2021 साठी नियुक्ती केलेल्या जिल्हास्तरीय जनगणना अधिकारी आणि चार्ज अधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या प्रशिक्षण सत्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शिवाजी सभागृहात आयोजित केलेल्या या प्रशिक्षण सत्राच्या शुभारंभास महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, जनगणना संचालनालयाचे उपसंचालक सतीश पायस, जिल्हा सांख्यिकी अधिकारी भूषण देशपांडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जनगणनेची माहिती नियोजन व देशाच्या प्रगतीसाठी पायाभूत -जिल्हाधिकारी
          जनगणना 2021 ही भारताची प्रथम डिजीटल जनगणना असल्याचे स्पष्ट करुन जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, सन 1872 पासून भारताची दशवार्षिक जनगणना अखंडपणे सुरु असून यावेळची ही सोळावी जनगणना आहे. जनगणनेतून संकलित होणाऱ्या माहितीला अनन्य साधारण महत्व असून ही माहिती नियोजन व देशाच्या प्रगतीसाठी पायाभूत माहिती म्हणून मानली जाते, त्यामुळे या जनगणनेला महत्व आहे.    भारताच्या जनगणनेच्या इतिहासामध्ये ही पहिलीच मोबाईल ॲप तसेच पत्रकावर माहिती भरणे अशा दोन पध्दतीद्वारे होत असून घरयादी व घरगणना करण्यासाठी सर्व प्रगणक आणि पर्यवेक्षकाद्वारे मोबाईल ॲप अत्यंत सोपे आणि सोईस्कर ठरणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, जनगणनेची व्याप्ती मोठी असून ही जनगणना दोन टप्प्यात होणार आहे. एप्रिल ते सप्टेंबर घरयादी तयार करण्याचे काम होणार आहे.
          कोल्हापूर जिल्ह्याने आर्थिक जनगणनेचे काम अतिशय उल्लेखनिय पध्दतीने केले असून जनगणेनेचे कामही त्याचपध्दतीने होईल, असा विश्वास व्यक्त करुन जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याचे काम पथदर्शी पध्दतीचे व्हावे यासाठी जनगणेनेसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी मनापासून आणि संवेदनशीलपणे जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.         
          महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी याप्रसंगी बोलताना म्हणाले, भारतीय जनगणनेच्या इतिहासामध्ये 2021 ची जनगणना ही जगातील सर्वात मोठी प्रशासकीय आणि सांख्यिकीय स्तरावरची असून यंदाही सलग सोळावी जनगणना आहे. ही जनगणना मोबाईल ॲपद्वारे होणार असल्याने नियुक्त अधिकारी- कर्मचाऱ्यांनी जनगणनेच्या सर्व प्रक्रियेची सविस्तर  माहिती घेऊन जनगणनेचे राष्ट्रीय कार्य पार पाडावे तसेच जनगणना हे राष्ट्रीय कार्य असून देशाच्या विकास व नियोजनासाठी अतिशय उपयुक्त असल्याने सर्वांनी या राष्ट्रीय कार्यात सक्रीय योगदान द्यावे, असे आवाहनही महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.
          याप्रसंगी जनगणना संचालनालयाचे उपसंचालक सतीश पायस यांनीही जनगणनेच्या कामाविषयी सविस्तर माहिती दिली. जिल्हा सांख्यिकी अधिकारी भूषण देशपांडे यांनी स्वागत केले तर निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी जिल्ह्यातील जनगणनेच्या कार्यपध्दतीची आणि प्रशिक्षण कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.