इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०

दिव्यांगांच्या योजनांची शासनाकडून प्रभावी अंमलबजावणी -रामदास आठवले







कोल्हापूर, दि. 25 (जिमाका)  :-  दिव्यांगांना बळ देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे महत्वाचे आहे. यासाठी  शासनाने त्यांच्यासाठी सुरु केलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्यावतीने शिवाजी विद्यापीठ येथे  जिल्ह्यातील दिव्यांगांना सहाय्यक साधन साहित्य वाटप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. आठवले व रतन लाल कटारिया यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.        कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, महापौर निलोफर आजरेकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने,  शिवाजी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, अतीरिक्त  पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे आदी उपस्थित होते.
सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याला सामाजिक समतेचा मोठा वारसा आहे. राजर्षी शाहू महाराजांनी समाजातील उपेक्षित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी विशेष योजना सुरु केल्या. शाहू महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन सरकारने सामाजिक न्याय विभागासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. यामध्ये  दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी सुमारे 950 कोटीची तरतूद करण्यात आली  असून यातून या योजना प्रभावीपणे राबविल्या जातील. दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या योजनांचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासकीय विभागांनी पुढाकार घ्यावा. जिल्हा परिषदेने  जिल्ह्यात दिव्यांग उन्नती अभियान यशस्वीपणे राबविले असून या योजनेतून दिव्यांगाना उपलब्ध होत असलेल्या साहित्यामुळे त्यांच्या जीवनात उभारी येणार असल्याचे श्री. आठवले म्हणाले.
 सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. कटारिया म्हणाले, दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी शासनाने अनेक योजना सुरु केल्या आहेत. दिव्यांगांना आधार मिळावा, त्यांचे जीवन सुखद व्हावे यासाठी त्यांना आवश्यक असणारी अत्याधुनिक समग्री उपलब्ध करुन देण्यात येत आहे.  यासाठी अनेक नामवंत कंपन्यांसोबत करार करण्यात आला आहे. दिव्यांगाना आवश्यक साधन सामग्री उपलब्ध करुन देण्यासाठी आतापर्यंत देशात 575 शिबिराचे आयोजन केले.  सरकाराने या शिबिरातून सुमारे 5 लाख  10 हजार दिव्यांगांना आवश्यक उपकरणे उपलब्ध करुन दिली असल्याचे श्री. कटारिया म्हणाले.  तसेच  देशात अटल भूजल योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून या योजनेतून भूगर्भातील पाणी पातळी वाढविण्यासाठी  काम केले जात असून  प्रत्येक घरात पाण्याचा नळ देण्यासाठी  जलशक्ती मंत्रालयामार्फत नियोजन केले जात असल्याचे ते म्हणाले.
खासदार धैर्यशील माने व संजय मंडलिक यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी स्वागत करुन  प्रास्ताविकात जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या दिव्यांग उन्नती अभियानाची माहिती दिली.  ते म्हणाले. या अभियानातून जिल्ह्यात 45 हजार 496 दिव्यांगांची नोंदणी करण्यात आली असून ती संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  यामधील 15 हजार 695 दिव्यांगांना  23 हजार 495 उपकरणाचे वितरण करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. दिव्यांगाना उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या साहित्य वितरणाची शिबीरे तालुकास्तरावर आयोजित केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
000000






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.