इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२०

गॅस वितरण गाडीवर दर फलक लावा जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे आदेश






        कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) : जिल्ह्यातील प्रत्येक गॅस वितरण गाडीवर गॅस दराचे दरपत्रक प्रसिध्द करावे. गॅस वितरण करणाऱ्या व्यक्तींने उध्दट वर्तन केल्यास त्यांच्यावर संबंधित गॅस कंपनीने कारवाई करावी, असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत दिले.  
       जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती शाहूजी सभागृहात आज झाली. बैठकीस पोलीस निरीक्षक (शहर वाहतूक) वसंत बाबर, जिल्हा अग्रणी प्रबंधक राहूल माने, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त मोहन केंबळकर, सहायक पुरवठा अधिकारी सरस्वती पाटील,   अशासकीय सदस्य अरुण यादव आदी उपस्थित होते. 
            जिल्हा पुरवठा अधिकारी  श्री. कवितके म्हणाले, गॅस वितरणाबाबत खूप तक्रारी जिल्हा पुरवठा कार्यालयाकडे येत असून गॅस कंपन्यांनी ग्राहकाबरोबर संवेदनशिलपध्दतीने वागणे आवश्यक आहे. गॅस कंपन्यांमधील अधिकाऱ्यांनी सर्व गॅस एजन्सीमध्ये भेट द्यावी. जादा दराने गॅस सिलेंडरचे वाटप करणाऱ्या वितरकांवरही कारवाई करावी.  त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला बदलणाऱ्या दराची प्रसिध्दी करावी, अशा सूचनाही श्री. कवितके यांनी दिल्या.
            अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील औषध दुकानांची तपासणी करावी. वैद्यकीय व्यवसायाची नोंद नसणाऱ्या डॉक्टरांवर कडक करावाई करावी.  फार्मासिस्ट उपलब्ध नसणाऱ्या दुकानांचे परवाने निलंबित करावेत. संबंधित विभागाने तक्रारीचे निवेदन प्राप्त झाल्यानंतर निवेदनाचे उत्तर संबंधित तक्रारदारास देणे आवश्यक आहे.  एस.टी.चा मार्ग काही कारणास्तव रद्द होणार असेल तर एस.टी. महामंडळाने प्रवाशांना सूचना द्यावी. जिल्ह्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर प्रसाधन गृह, हवा व पाण्याची सोय आहे काय याबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्याबाबत  पेट्रोल कंपन्यांच्या सेल्स ऑफीसर यांना  यावेळी सूचना देण्यात आल्या.
             स्वस्त धान्य दुकानाची तपासणी होण्याबाबत, गॅस ग्राहक यांची आर्थिक शोषण होत असल्याबाबत, गॅस वेळेत मिळत नाही, गॅसचे वजन करुन न देणे, पावती न देणे, जादा दराचे गॅस विक्री करणे, उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत गॅस जोडणी जादा दराने करणे असा तक्रारी अर्ज  अरुण यादव यांनी दाखल केला आहे.  याबाबत गॅस कंपन्यांची गॅस एजन्सीच्या बैठक घेवून तक्रारी निदर्शनास आणून द्याव्या असे करणाऱ्यांवर कडक करावाई करावी, अशा सूचना गॅस कंपन्यांना दिल्या. अनिल जाधव यांनी दूधगंगा नदी पात्रामध्ये वैद्यकीय कचरा तसेच प्रदूषण युक्त कचरा टाकला जातो असा तक्रार अर्ज दाखल केला असून याबाबतही संबंधित विभागाने चौकशी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.
                         शहरातील रिक्षा चालकांना गणवेश आणि मीटर प्रमाणे भाडे आकारणी याबाबत पुढाकार घेतला. नियमांचे पालन न करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई केल्याबद्दल शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांचा  अखिल भारतीय ग्राहक परिषदेमार्फत सत्कार करण्यात आला.

000





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.