इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन 31 डिसेंबर व नववर्षाचे स्वागत साधेपणाने करावे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आवाहन

 


 

                कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) :  कोव्हिड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीत 31 डिसेंबर 2020 व नुतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करण्याबाबत राज्य शासनाने सूचना जारी केल्या आहेत.  शासनाने जारी केलेल्या सूचनांचे जिल्ह्यातील नागरिकांनी पालन करुन 31 डिसेंबर व नववर्षाचे स्वागत साधेपणाने करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.

             दिनांक 31 डिसेंबर दिवशी नागरिकांनी तलाव, उद्याने, नदीघाट अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. विशेषत: रंकाळा तलाव, कळंबा तलाव, नदी घाट परिसर, उद्याने इत्यादी ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते, त्या दृष्टिने कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.

            नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात, अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.       

            ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन  करावे.फाटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. कोविड-19 या विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच 31 डिसेंबर, नूतन वर्ष सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सुचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन जिल्ह्यातील नागरिकांनी  करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी केले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.