इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, २८ डिसेंबर, २०२०

संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्णशोध अभियान टी.बी. हरेल देश जिंकेल संकल्प करूया, टीबी ला हरवू या

 


संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियान मोहिमेसाठी कोल्हापूर ग्रामीण मधील 100 टक्के लोकसंख्या व शहरी भागातील 30 टक्के  लोकसंख्या निवडलेली आहे. कोल्हापूर ग्रामीणमधील सर्व भागात हे  सर्वेक्षण  होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 1  ते ३१  डिसेंबर 2020  दरम्यान ही मोहीम राबविण्यात येत आहे.

क्षयरोग ही भारतातील एक प्रमुख सामाजिक आरोग्य समस्या असून देशात दररोज अंदाजे ६ हजार व्यक्तींना नव्याने क्षयरोग होतो. देशात क्षयरोगाने प्रत्येक ३ मिनटाला २ मृत्यू होतो. अद्यापही निदानापासून वंचित असणाऱ्या क्षयरोग कुष्ठरुग्ण  गृह भेटीव्दारे शोधून काढण्यासाठी रुग्णशोध मोहीम राज्यामध्ये राबविली जात आहे.  राज्यातील कोव्हिड- 19  च्या आपत्कालीन परिस्थितीमुळे कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णांचे निदान व औषधोपचाराखाली आणण्याचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत राज्यभर अत्यंत कमी झालेले आहे. (कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागील वर्षाचे तुलनेत 45 टक्के कमी रुग्ण नोंद झाली आहे). त्यामुळे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांचे कडून रुग्णांच्या लवकर निदानासाठी विविध उपाययोजना सुचविल्या गेल्या. त्यापैकी एक उपाययोजना म्हणून संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियान कोल्हापूरसह राज्यभर राबविण्यात येत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वेक्षणाकरिता 12 तालुक्यांतर्गत एकुण 34 लाख 82 हजार 726 लोकसंख्या  6 लाख 96 हजार 545 इतक्या घरांची निवड करण्यात आलेली आहे. या मोहिमेसाठी एकुण 2846 पथके व 5692 इतके कर्मचारी काम करत आहेत. एकुण 31  दिवसांच्या सर्वेक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे.  दररोज एका टिममार्फत त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात ग्रामीण भागात प्रत्येक पथकाद्वारे दर दिवशी 20 घरे व शहरी भागात 25 घरांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. घरातील सर्व सभासदांची तपासणी करण्यात येत आहे. महिला सभासदांची तपासणी आशा महिला स्वयंसेविकेमार्फत व पुरुष सभासदांची तपासणी टिममधील पुरुष कर्मचारी स्वयंसेवकामार्फत  करण्यात येत आहे. ऑटो रिक्षाव्दारे माईकिंग, पोस्टर, बॅनर, माहिती पत्रके, पथनाटय, आकाशवाणीवरील मुलाखतीद्वारे या मोहिमेचे जनजागरण करण्यात येत आहे.

दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीचा खोकला, ताप, छातीत दुखणे,वजनात लक्षणीय घट,थुंकीवाटे रक्त पडणे अशी लक्षणे असणा-या व्यक्तींनी मोहीम कालावधीमध्ये घरी

येणा-या आरोग्य कर्मचा-यांना व स्वयंसेवकांना योग्य ती माहिती  द्यावी व स्वयंसेवकांकडून तपासणी करून घ्यावी. एच.आर.सी.टी./एक्स रे/ सोनोग्राफी इ. निदानासाठी लागणा-या तपासण्या जि.क्ष.केंद्रात पूर्णपणे मोफत केल्या जातात. लवकर निदान, उपचारसाठी तसेच रुग्ण  पोषण आहार इत्यादी योजनांचा लाभ घ्यावा व कुष्ठरोगाची लक्षणे जसे त्वचेवर फिकट/लालसर, बधीर चट्टा, त्या ठिकाणी घाम न येणे. जाड बधीर तेलकट चकाकणारी  त्वचा, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण पणे बंद करता ने येणे अशी लक्षणे असणा-या व्यक्तींनीही मोहीम कालावधीमध्ये स्वयंसेवकांकडून तपासणी करून घेऊन देश, राज्य व आपला जिल्हा क्षयमुक्त व कुष्ठरोग मुक्त निरोगी करण्यास हातभार लावावा.

क्षयरोग जनजागृतीपर व क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम विषयक माहिती

भारतात 1906 मध्ये प्रथम क्षयरुग्ण उपचार सुरु केले गेले. 1962 मध्ये भारत सरकारने क्षयरोग कार्यक्रम सुरु केला व त्याची संपुर्ण भारतभर अंमलबजावणी केली. या कार्यक्रमामधील त्रुटी दूर करुन नवीन पथदर्शी मसुदा 1993 मध्ये तयार केला गेला व त्यानुसार 1997 मध्ये सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाची सुरूवात केली. व त्याची अंमलबजावणी 1998 मध्ये करण्यात आली. प्रथमतः 1998-2001 पर्यंत 102 जिल्हयामध्ये हा कार्यक्रम राबविण्यात आला व तेथुन पुढे मार्च 2006 पर्यंत संपूर्ण भारतभर त्याची अंमलबजावणी केली गेली. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम हा प्रामुख्याने जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक निर्देशानुसार डॉटस/ प्रणालीवर आधारीत आहे. यामध्ये नवीन क्षयरोगी रुग्ण लवकरात लवकर शोधणे व प्रत्यक्ष देखरेखीखाली रुग्णांना त्यांच्या घराजवळ मोफत औषधे पुरवणे हा मुख्य उददेश आहे. यामुळे रुग्णांना  बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासाठी नवीन सुक्ष्मदर्शी केंद्रे  व डॉटस/ सेंटर्सचे  जाळे भारतभर विणले गेले.2025 पर्यंत आपल्याला भारत  क्षयमुक्त करायचा  आहे व  मुळापासून क्षयरोगाचा नायनाट करावयाचा असल्याने जानेवारी 2020 पासुन  सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमचे नाव बदलुन राष्ट्रीय  क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम असे करण्यात आले आहे.

जगामध्ये सध्या 100 लाख  इतके क्षयरुग्ण आहेत त्यापैकी जवळपास  27 लाख क्षयरुग्ण हे भारतात आहेत. त्याचबरोबर जगामध्ये जवळपास 12.40 लाख क्षयरुग्णांचे  मृत्यु  झाले असून त्यामध्ये भारतातील क्षयरुग्णांच्या मृत्युचे प्रमाण हे 35 टक्के  आहे.( 4.40 लाख क्षयरुग्ण मृत्यु ) ‘ग्लोबल टीबी रिपोटनुसार जगभरात पसरलेल्या क्षयरोगाचा आढावा घेण्यात आलेला असून त्यामध्ये विविध आजारांमुळे होणा-या मध्ये क्षयरोग हा दहाव्या क्रमांकावरील आजार आहे. या अहवालानुसार क्षयरोगाने एचआयव्ही एडस/लाही मागे टाकले असून दररोज सुमारे चार हजारांहून अधिक लोंकांचे मृत्यू क्षयरोगामुळे होतात. सध्या जिल्हयामध्ये सन 2019 मध्ये शासकीय  आरोग्य संस्थांकडून 2228  क्षयरुग्ण व खाजगी आरोग्य संस्थांकडून 544 क्षयरुग्ण  क्षयरुग्णांची नोंद झालेली  आहे.एकुण 2772 क्षयरुग्ण 2019 मध्ये होते तर २०२० मध्ये कोविड साथरोग मुळे कमी रुग्ण संख्येची नोंद झाली आहे सन २०२० (नोव्हेंबर ) मध्ये शासकीय आरोग्य संस्थांकडून 1008 क्षयरुग्ण व खागी आरोग्य संस्थांकडून  342 क्षयरुग्णांची नोंद झाली आहे. एकुण 1354 क्षयरुग्ण  मध्ये  नोव्हेंबर 2020 पर्यंत आहेत.

केंद्र शासनाच्या आरोग्य धोरणानुसार सन 2025 पर्यंत आपल्याला क्षयमुक्त भारत करायचा असून आपली वाटचाल त्या दिशेने सुरु  आहे. सन 2019 हे वर्ष आरोग्यासाठी उल्लेखनीय वर्ष असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  धोरणानुसार   क्षयमुक्त भारत करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय स्ट्रॅटिजिक योजनेनुसार वेगवेगळय रणनिती  2017-2025 मध्ये आखल्या आहेत.  राष्ट्रीय स्ट्रॅटिजिक योजनेनुसार कार्यक्रमामध्ये बदल झाले आहेत. जसे सुलभ क्षयरुग्ण निदानासाठी जिल्हयात 4 ठिकाणी सी.पी.आर. कोल्हापूर, आय.जी.एम. इचलकरंजी , उपजिल्हा गडहिंग्लज, सावित्रीबाई  फुले हॉस्पिटल कोल्हापूर सीबीनॅटची उपलब्धता केली आहे. येणा-या काळात सर्व शासकीय संस्थास्तरावर ट्रूनेट  होणार आहे, सर्व निदान झालेल्या  रुग्णांची सीबीनॅट तपासणी करणे ,गृहभेटींमध्ये क्षयरुग्ण शोध मोहिम (. सी. एफ. ), क्षयमुक्त तालुका मोहिम, शासकीय व खाजगी अंतर्गत सर्व क्षयरुग्णांना पोषण आहार योजना, खाजगी वैद्यकीय व्यवसायिंकांना प्रोत्साहनपर भत्ता, क्षयरुग्णांसाठी सुलभ उपचार प्रणाली, दैनंदिन उपचारपध्दती,99 डॉटस/एफ डी सी,वजनानुसार उपचार पध्दती इ. बदल कार्यक्रमामध्ये केले आहेत. एम.डी.आर.- टी .बी. च्या रुग्णांना बेडाक्वीलाईन सारखे टी. बी. वरील नवीन औषध एप्रिल  2018 पासून उपलब्ध झाले  आहे. टोल फ्री क्रमांक 1800116666 क्षयरोग  सल्ला व मार्गदर्शनासाठी सर्वांसाठी उपलब्ध आहे.

क्षयरोग हा हवेव्दारे पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. मायक्रोबॅक्टेरियम टयुबरक्युलोसिस नावाच्या रोगजंतूमुळे होणारा रोग आहे. शरीराच्या कोणत्याही अवयवाला भागाला क्षयरोग होवू शकतो. फुफुसाला होणाऱ्या क्षयरोगास पल्मोनरी टीबी म्हणतात तर फुप्फुसाव्यतिरिक्त इतर कोणत्याही अवयवाचा क्षयरोग असल्यास त्याला  एक्स्ट्रा पल्मनोरी  क्षयरोग म्हणतात. उदा. हाडे, सांधे, मज्जातंतू इ. अवयवाचा क्षयरोग होय.क्षयरोग जंतू मुख्यतः हवेतून पसरतात. फुप्फुसाचा क्षयरोग झालेला रुग्ण जेव्हा खोकतो किंवा शिंकतो तेव्हा क्षयरोगाचे हे जंतू सूक्ष्म थेंबाव्दारे हवेत पसरतात. ज्यावेळी जवळचा निरोगी व्यक्ती श्वास घेतो तेव्हा ते जंतू त्याच्या शरिरात प्रवेश करतात व त्या निरोगी  व्यक्तीला क्षयजंतुचा संसर्ग होतो. मात्र  संसर्ग झालेल्या  सर्वच व्यक्तींना क्षयरोग होत नाही. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शरीरात हे जंतु वर्षानुवर्ष सुप्त अवस्थेत असतात व प्रतिकारशक्ती कमी झालेस आजार हा होण्याची शक्यता असते. फुफुसातील क्षयाचे जंतु शरीरात अन्य ठिकाणी गेल्यास इतर अवयवांचाही क्षयरोग होतो. उदा. सांधे, आतडी, लसिकाग्रंथी, जननेंद्रिय इ.अशा अशा संसर्गिक माणसाला क्षयरोग होण्याची आयुष्यभराची शक्यता 10 टक्के असते.एच.आय.व्ही. बाधीत रुग्णांना क्षयरोग होण्याची शक्यता 60 टक्के असते.

          बेडकायुक्त दोन आठवडे किंवा जास्त दिवस खोकला, संध्याकाळी येणारा हलकासा ताप,भूक मंदावणे, वजन घटणे, छातीत दुखणे, रात्री खूप घाम येणे अशी लक्षणे असणाऱ्या व्यक्तीस  क्षयरोगी म्हणतात.  ही लक्षणे  अढळल्यास  जरूर त्या तपासण्या (स्पुटम, एक्स-रे,इत्यादी ) जवळच्या आरोग्य केंद्रात कराव्यात. निदान झाल्यास त्वरित मोफत  औषधोपचार सुरु करण्यात येईल. सामान्य टिबीच्या औषधांना दाद न देणा-या रोगाला  अतिजोखमीचा एम.डी.आर. म्हणतात. यामध्ये  हा क्षयरोग सामान्य औषधांना दाद  देत नाही.आतापर्यंत 464 एम.डी.आर. रुग्णांची नोंद जिल्हात झाली आहे.  एम.डी.आर . च्या पुढील टप्प्यातील आजारास   एक्स.डी.आर म्हणतात . आतापर्यंत 33 एक्स.डी.आर  रुग्णांची  नोंद जिल्ह्यात झाली आहे. एप्रिल २०१८ पासुन एक्स.डी.आर रुग्णांसाठी वरदान ठरणारे बेडाक्वीलाईन सारखे  नवीन औषध उपलब्ध झाले आहे. हे अत्यंत महाग औषध शासनाने शासकीय संस्थातील रुग्णांना  मोफत उपलब्ध करून दिले आहे.

 राष्ट्रीय  क्षयरोग दुरीकरण  कार्यक्रमांतर्गत पूर्वी क्षयरुग्णांना एकदिवसाआड 7 ते 8 गोळया दिल्या जात होत्या होत्या. त्यामध्ये बदल होऊन वन गटानुसार  सध्या 2 ते 6 गोळया दररोज दिल्या जातात  म्हणजे सोमवार ते रविवार सात दिवस क्षयरुग्णांच्या वजन गटानुसार औषध दिले जातात. ही औषधप्रणाली 17 फेब्रुवारी 2017 पासून सर्व रुग्णांकरीता चालू करण्यात आली. या औषध प्रणालीमुळे पेशंट मध्येच उपचार सोडून देण्याचे प्रमाण कमी झाले आहे. वजनानुसार डोसेसचे प्रमाण कमी झालेमुळे  पुर्नउदभव होणारा टिबीचा धोका कमी झाला आहे. पेशंटच्या  न गटानुसार औषधोपचार दिले  जातात. जसे 25 ते 34 किलोग्रॅम वन गटासाठी  दररोज 2 गोळया, 35 ते 49 किलोग्रॅम  न गटासाठी  दररोज 3 गोळया,50 ते 64 किलोग्रॅम  न गटासाठी  दररोज 4  गोळया,65 ते 75 किलोग्रॅम  व्जन गटासाठी  दररोज 5  गोळया, तर 75  किलोग्रॅम च्या वर सर्व व्जन गटासाठी दररोज 6 गोळया दिल्या जातात  कालावधी. २८ गोळ्यांचे एक औषधाचे पाकीट असते तर औषधोपचार ६ महिन्यांचा असतो.  पेशंटच्या औषधाबरोबर प्रथिनयुक्त आहाराचासुध्दा समावेश करावा. अंडी, दूध घ्यावे. खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल घ्यावा. मास्क चा वापर करावा, थुंकी दुषित रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. उघडयावर थुंकू नये. कोवळया उन्हात बसावे. पेशंटच्या सहवासीतांची सुध्दा   तपासणी करून घ्यावी.

 

7 मे 2012 च्या शासन निर्णयानुसार क्षयरोग आजाराचा अंतर्भाव सुचनीय आजारामध्ये (नोटीफायबल डिसीजमध्ये) करण्यात आला आहे. सर्व खागी आरोग्य संस्थेकडे निदान होणा-या किंवा उपचाराखाली असणा-या  प्रत्येक क्षयरुग्णांची माहिती विहित नमुन्यात जिल्हा क्षयरोग कार्यालयाकडे किंवा संबंधित जवळच्या सार्वजनिक आरोग्य संस्थांना सादर करणे बंधनकारक आहे. क्षयरुग्णांची माहिती निक्षय वेबसाईट सॉफ्टवेअरमध्ये माहिती भरणे आवश्यक आहे. खागी वैद्यकीय व्यवसायकांसाठी निदानासाठी रुपये ५०० व औषधपचार पूर्ण केल्यावर रुपये ५००  अनुदान थेट लाभार्थी हस्तांतरण (डी .बी.टी.) च्या माध्यमातून एप्रिल २०१८ पासून देण्यात येत आहेत. क्षयरुग्णांची नोंद न केल्यास कायद्यामध्ये २६९ व २७० कलमांतर्गंत दंड व शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. शासन धोरणानुसार सरकारी आरोग्य केंद्रात उपचार घेणारे क्षयरुग्ण व खागी वैद्यकीय व्यवसायकांकडील क्षयरुग्णांसाठी पोषण आहारासाठी दरमहा औषधोपचार सुरु असे पर्यंत रुपये ५०० अनुदान थेट लाभार्थी हस्तांतरण (डी .बी.टी.) च्या माध्यमातून एप्रिल २०१८ पासून देण्यात येत आहे.

 

डॉ. यु. जी. कुंभार

जिल्हा क्षयरोग अधिकारी,

कोल्हापू

000000

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.