इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

गृहनिर्माण सहकारी संस्थांसाठी मानीव अभिहस्तांतरण 1 ते 15 जानेवारी कालावधीत विशेष मोहिम

 


            कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) : गृहनिर्माण सहकारी संस्थांना मानीव अभिहस्तांतरण प्राप्त होण्यासाठी सहकार विभागामार्फत 1 ते 15 जानेवारी 2021 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी दिली.

          राज्यामध्ये सहकारी संस्थांचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे. विविध प्रकारच्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामान्य व्यक्तीचे जीवनमान उंचावण्यास मोठ्या प्रमाणात सहकारी संस्थांचा हातभार आहे. सहकारी संस्था अनेक प्रकारात कार्यरत असून सहकारी गृहनिर्माण संस्था हा प्रकारदेखील त्यामध्ये आहे. जो प्रत्येक व्यक्तिच्या वैयक्तिक जीवनाशी निगडीत आहे. एखादी सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन झाल्यानंतर 4 महिन्यांत विकसकाने इमारतीच्या जमिनीचे संस्थेच्या नावे हस्तांतरण करून देणे, महाराष्ट्र सदनिका मालकी हक्क अधिनियम 1963 मधील तरतूदीनुसार बंधनकारक आहे. जोपर्यंत इमारतीखालील जमीन गृहनिर्माण संस्थेच्या मालकीची होत नाही, तोपर्यंत वाढीव एफ.एस.आय. व इमारतीची पुनर्बांधणी यासाठी संस्थेला पूर्णपणे विकसकांवर अवलंबून रहावे लागते.

            सहकारी गृहनिर्माण संस्थांना यातून मुक्त करण्यासाठी मानीव अभिहस्तांतरणासाठी महाराष्ट्र सदनिका मालकी हक्क अधिनियम 1963 मधील कलम 5,10 व 11 अन्वये या कामासाठी जिल्हा उप निबंधक यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मानीव अभिहस्तांतरणासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या दि.22 जून 2018 च्या शासन निर्णयानुसार कमी करण्यात आलेली आहे.

            सहकारी गृहनिर्माण संस्थांना जमिनीचा मालकी हक्क प्राप्त व्हावा यासाठी  सहकार आयुक्तालयाकडून विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्थांनी सदर संस्था ज्या तालुका उप / सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांचे अधिपत्याखाली आहे त्या कार्यालयाशी संपर्क साधून या प्रक्रियेसाठी आवश्यक प्रस्तावातील कागदपत्रांची माहिती प्राप्त करुन घ्यावी व आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उप निबंधक यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. सदर संबंधातील शासन निर्णय, परिपत्रके आणि इतर माहिती http://housing.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

            या विशेष मोहिमेद्वारे सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या जमिनीचे कायदेशीर हक्क, विकसकाकडून प्राप्त करुन घेण्यासंदर्भात प्रयत्न आहे. इमारत संस्थेची, जमिनीची मालकीदेखील संस्थेचीच यानुसार या विशेष मोहिमेत सक्रिय सहभाग करुन मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन सहकारी संस्थचे, जिल्हा उप निबंधक श्री. शिंदे यांनी केले आहे.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.