इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, २९ डिसेंबर, २०२०

जात प्रमाणपत्र पडताळणीकरिता अर्ज स्वीकारण्याच्या सूचना

 


            कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : निवडणूक विषयक प्रकरणाच्या अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने व ऑनलाईन प्रणालीचा वेग मंदावलेला असल्याने विविध जिल्ह्यातून अर्जदार, लोकप्रतिनिधी तसेच समिती कार्यालयाकडून याबाबत ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्वीकृती करण्याबाबत विनंती केलेली आहे.  ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सुरू असल्याने उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्राची/जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव दाखल केलेल्या पावतीची आवश्यकता असल्याने तसेच अर्जदारांची गैरसोय होवू नये यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे प्र. उपायुक्त तथा प्रकल्प संचालक मेघराज भाते यांनी सूचना निर्गमित केल्या आहेत.

       दिनांक 29 ते 30 डिसेंबर 2020 केवळ या दोन्ही दिवशीच अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने स्वीकारण्यात यावेत. कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी व आवश्यकतेप्रमाणे पोलीस विभागास संपर्क साधून आवश्यक ती कार्यवाही करावी. अर्जदारांची संख्या विचारात घेता आवश्यकतेनुसार अर्ज स्वीकारण्याचा टेबल/खिडकी वाढवण्यात यावी. अर्जदारांची संख्या विचारात घेता कार्यालय पूर्ण वेळ तसेच आवश्यकतेप्रमाणे सर्व अर्जदारांचे अर्ज स्वीकारेपर्यंत दोन्ही दिवशी कार्यालय सुरू ठेवावीत. ज्या अर्जदारांचे ऑफलाईन पध्दतीने अर्ज दिलेले आहेत त्यांच्यासोबत तक्त्यात माहिती भरून दिनांक 1 जानेवारी 2021 पर्यंत पाठविण्यात यावी. कोणत्याही प्रकारचे अनियमितता तसेच गैरकृत्याबाबत या कार्यालयाकडे तसेच शासनाकडे अर्जदाराची तक्रार होणार नाही याची दक्षता घेवून नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

00000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.