इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, ३० मार्च, २०२१

लसीकरणाबरोरच ट्रेसिंग व टेस्टिंग वाढवा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या सूचना

 



कोल्हापूर दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) :- जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात रुग्ण संख्या अटोक्यात ठेवण्यासाठी, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरणाबरोबरच ट्रेसिंग व टेस्टिंग वाढविण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिल्या.

कोरोना प्रतिबंधात्मक  उपाय योजना आणि लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यातील तहसिलदार, गटविकास अधिकारी, नोडल अधिकारी, वैद्यकीय अधिकारी  यांच्याशी जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी  दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी  मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतीरिक्त जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, शेजारच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता येणाऱ्या काळात धोका टाळण्यासाठी पुन्हा सर्वांनी जागरुक राहून काळजी  घ्यावी.  आपल्या जिल्ह्यातही रुग्णांचा पॉझिटीव्ह रेट वाढत आहे. मागील वर्षी उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता आता सर्वांनी सतर्क व दक्ष राहून त्यासाठी आतापासूनच सुक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. नोडल अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर सोपविलेले जाबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी. ज्या तालुक्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे त्या तालुक्यात रुग्ण संख्या वाढणार नाही यासाठी एका रुग्णामागे 20 ते 30 लोकांचे ट्रेसिंग  करावे.  यामधील संशयित रुग्णांचे टेस्टिंग करुन त्यांना पुढील उपचारासाठी योग्य त्या ठिकाणी पाठविण्याची व्यवस्था करावी. नोडल अधिकाऱ्यांनी माझा तालुका माझी जबाबदारी समजून पुढील काळात काम करुन संपूर्ण तालुक्याची जबाबदारी स्वीकारावी. जिल्हास्तरावरुन देण्यात आलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी आपल्या कार्यक्षेत्रात करुन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी  सुक्ष्म नियोजन करावे. 

तालुकास्तरावर कोविड काळजी केंद्र कार्यान्वित करा

तालुकास्तरावर कोव्हिड काळजी केंद्र कार्यान्वित करुन प्रत्येक केंद्रात सुमारे 100 रुग्णांची सोय होईल या दृष्टिने नोडल अधिकारी, तहसिलदार व संबंधित यंत्रणेने नियोजन करावे. तालुकास्तरावरील आयसोलेशन सेंटर  गाव पातळीवर सुरु करण्याबाबतही नियोजन करावे. लक्षणे नसणाऱ्या रुग्णांची सोय गाव पातळीवरील आयसोलेशन सेंटरवर करण्यात यावी. यासाठी ग्राम समित्या पुन्हा सक्रीय होणे आवश्यक आहे. ग्राम व प्रभाग समित्यांनी ट्रेसिंगसाठी पुढाकार घ्यावा.  गावात, नगरपालिका क्षेत्रातील हॉट स्पॉट क्षेत्रातील सर्व लोकांची तपासणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी दिल्या.

नोडल अधिकाऱ्यांना जिल्हास्तरावरुन हॉटस्पॉटची यादी पाठविण्यात येत असते. त्यानुसार त्या भागाचा सर्व्हे करुन त्या ठिकाणी आवश्यक उपाय योजना राबविण्यावर भर द्यावा. गतवर्षीप्रमाणे खासगी रुग्णालयातील खाटांचे अधिग्रहण करण्याचे नियोजन आतापासून करावे. तसेच खासगी हॉस्पिटलमधील  कोरोना रुग्णांच्या देयकांची तपासणी करण्यासाठी लेखा परीक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. यासाठी आवश्यक ते सहकार्य व मार्गदर्शन जिल्हास्तरावरुन करण्यात येईल.

लसीकरणासाठी 370 केंद्रे

जिल्हाधिकारी म्हणाले, यापूर्वी 60 वर्षावरील व व्याधीग्रस्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी जिल्ह्यात  150 लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली होती. आता 45 वर्षावरील लोकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याने यापूर्वीची 150 व आणखी 220 लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात येत असल्याने जिल्ह्यात 370 लसीकरण केंद्रे कार्यानिव्त  राहणार आहेत.  60 वर्षावरील व व्याधीग्रस्त नागरिकांचे लसीकरणामध्ये  कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम आहे. त्याच प्रमाणे नोडल अधिकाऱ्यांनी  आताही लसीकरणामध्ये जिल्हा अग्रेसर राहील यासाठी प्रत्येक लसीकरण केंद्रनिहाय  नियोजन करुन नागरिकांचे लसीकरण करुन घ्यावे. गावात लसीकरणाचे नियोजन करुन त्यानुसार त्या-त्या  लसीकरण केंद्रावर नागरिकांना पाठविण्याची जबाबदारी  पार पाडावी. प्रत्येक केंद्रावर दररोज सुमारे 200 लोकांचे लसीकरण झाल्यास एप्रिल अखेर जिल्हातील 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल. लसीकरणासाठी आवश्यक असणारा लसीचा पुरवठा करण्यासाठी जिल्हास्तरावरुन सर्व उपाय योजना करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले.

पहिल्या व दुसऱ्या डोससाठी स्वतंत्र व्यवस्था करा

            लसीकरण केंद्रावर पहिला डोस घेणाऱ्या व्यक्तीसाठी तसेच दुसरा डोस घेणाऱ्या व्यक्तीसाठी स्वतंत्र व्यवस्था असणे आवश्यक आहे.  यासाठी लसीकरण केंद्रावर दोन कॉऊंटर सुरु करावेत. पहिला डोस ज्या कंपनीच्या लसीचा दिला आहे, त्याच कंपनीच्या लसीचा दुसरा डोस नागरिकांना‍ दिला जाईल यासाठी नोडल अधिकारी व संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी नोंदी ठेवून त्याप्रमाणे नागरिकांना डोस द्यावा. यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात यावे.

ऑक्सिजन पुरवठ्यावर लक्ष केंद्रीत करा

            रुग्णांना आवश्यकता भासल्यास त्वरित ऑक्सिजन उपलब्ध व्हावा, यासाठी  नोडल अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय व खासगी रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील यासाठीचे नियोजन करावे. गतवर्षी प्रमाणेच यंत्रणा उभी करुन त्याचा वापर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

            मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण म्हणाले,  जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्ण वाढत आहेत ही चिंतेची बाब आहे.  यासाठी एका रुग्णामागे 20-30 लोकांचे ट्रेसिंग होणे गरजेचे आहे. लोकांमध्ये जनजागृती  होण्यासाठी ग्राम समित्यांनी काम करावे. गतवर्षीप्रमाणेच ग्राम समित्या ॲक्टिव्ह झाल्या तर आपण करोनाच्या दुसऱ्या लाटेचाही मुकाबला करु असे ते म्हणाले. गृहअलगीकरणात असलेल्या व्यक्तींवर ग्राम समितीने नजर ठेवण्याबरोबर लसीकरणासाठी आपल्या गावाचे नियोजनही करावे.

            जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे म्हणाले, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य  उप केंद्रावरही आता लसीकरण केंद्र कार्यान्वित केले जाणार आहे.  जिल्ह्यात 220 ठिकाणी ही केंद्रे सुरु केली जाणार असून आज त्यापैकी  50 ते 75 केंद्रे सुरु केली आहेत. लसीकरणासाठी गाव पातळीवर सुक्ष्म नियोजन होणे गरजचे आहे. लसीकरणासाठी  वाडी, वस्ती, पाडे अशा ठिकाणाहून लांबून येणाऱ्या व्यक्तींना लसीकरणामध्ये प्राधान्य द्यावे.  पहिल्या टप्यात ज्या तालुक्यात लसीकरणाचे काम  कमी झाले आहे त्यांनी लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी काम करावे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर दररोज सुमारे 200 लोकांचे लसीकरण पूर्ण होईल अशा पद्धतीने नियोजन करावे.

            ईली व सारीच्या रुग्णांचे सर्व्हेक्षण नियमित होणे आवश्यक आहे. यासाठी गठित करण्यात आलेल्या पथकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात  सर्व्हेक्षणाची मोहीम हाती घ्यावी. सर्व्हेक्षणामध्ये आढळलेल्या संशयित रुग्णांचा स्वॅब घेण्यासाठी त्यांना केंद्रावर पाठवावे. रुग्णांची वाढ रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यावर भर द्यावा. यासाठी ग्राम व प्रभाग समित्यांनी सहकार्य करावे. गृह अलगीकरणामध्ये असलेल्या व्यक्ती नियमांचे पालन करतात की नाही याबाबत नियमित तपासणी करावी. गृह अलगीकरणामधील व्यक्तीस आवश्यक ते कीट उपलब्ध करुन द्यावे, अशा सुचना डॉ. साळे यांनी दिल्या.

            जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माळी यांनीही लसीकरण, ट्रेसिंग, टेस्टिंग बाबत सूचना दिल्या.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.