इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, ३० मार्च, २०२१

द्राक्ष महोत्सवाचा 'गोडवा' 21 लाखांवर

 




 

कोल्हापूर दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) :- राज्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या फळांना चांगला दर मिळावा म्हणून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळा मार्फत राज्यात व राज्याबाहेर वेगवेगळ्या फळ महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. कोल्हापूर विभागातील द्राक्ष उत्पादकांना चांगला दर मिळावा म्हणून उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेअंतर्गत गोवा व कोल्हापूर येथे द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर येथे आयोजित द्राक्ष महोत्सवात सुमारे २१ लाखांवर विक्री झाली असल्याची माहिती महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक सुभाष घुले यांनी दिली. 

महोत्सवात सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव, पलूस व जत तालुक्यातील एकूण १८ शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला होता. कोल्हापूर द्राक्ष महोत्सवात एकूण ३०.१०५ मे. टन द्राक्षांची विक्री करण्यात आली. द्राक्ष उत्पादकांना सरासरी प्रती किलो ६० रु दर मिळालेला आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना द्राक्ष विक्रीतून रक्कम १८ लाख प्राप्त झाले आहेत. कोल्हापूर द्राक्ष महोत्सवामध्ये १ मे. टन बेदाण्याची विक्री झालेली असून द्राक्ष उत्पादकांना सरासरी रुपये. २६० प्रती किलो दर प्राप्त झालेला आहे. बेदाणा विक्रीपोटी द्राक्ष उत्पादकांना अंदाजे रुपये २.७३ लाख प्राप्त झालेले आहेत. कोल्हापूर द्राक्ष महोत्सवात एकूण रक्कम रुपये २०.७३ लाखांची उलाढाल झालेली आहे.

अभिनेते राहूल सोलापूरकरांची भेट

   २६ मार्च ते आजअखेर झालेल्या या महोत्सवात अभिनेते राहूल सोलापूरकर यांनी आज भेट देवून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

गोवा राज्यात फोंडा येथे दि. २० मार्च ते २४ मार्च २०२१ या कालावधीन द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी गोवा द्राक्ष महोत्सावाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सावामध्ये एकूण १९ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला होता. महोत्सवामध्ये एकूण १७.५ मे.टन द्राक्ष विक्री करुन द्राक्ष उत्पादकांना रक्कम रु. १५.५ लाख प्राप्त झाली. द्राक्ष उत्पादकांचे ५०५ किलो बेदाणा विक्रीतून रक्कम रुपये २.०२ लाख द्राक्ष उत्पादकांना प्राप्त झाले. गोवा द्राक्ष महोत्सवामध्ये एकूण रक्कम रुपये १७.७७ लाख उलाढाल झाली.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे राज्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या फळांना चांगला दर मिळावा म्हणून कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, मंत्री (सहकार व पणन), उपाध्यक्ष. शंभुराज देसाई. (राज्यमंत्री पणन), अनुपकुमार, प्रधान सचिव, सुनिल पवार, कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे, दिपक शिंदे, सरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात व राज्याबाहेर वेगवेगळ्या फळ महोत्सवाचे आयोजन करीत असते.

कोल्हापूर विभागामध्ये माहे मे २०२१ मध्ये हापूस व केशर आंबा उत्पादकांसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, पणजी (गोवा) व बेळगाव येथे आंबा महोत्सव २०२१ चे आयोजन प्रस्तावित असल्याचे उपसरव्यवस्थापक श्री. घुले, यांनी कळविले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.