इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

27 फेब्रुवारीची पल्स पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वी करूया - जिल्हाधिकारी श्री. राहुल रेखावार.

 


 

कोल्हापूर, दि. 24 (जिमाका) : पोलिओ निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शून्य ते पाच वयोगटातील सर्व बालकांना रविवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी पोलिओ डोस देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व बालकांना पोलिओ डोस मिळाल्याची खात्री करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्ती यांच्यामार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. घरोघरी भेट देणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सर्वतोपरी सहकार्य करावे व पल्स पोलिओ लसीकरण मोहिम शंभर टक्के यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतामध्ये १३ फेब्रुवारी २०११ नंतर एकही पोलिओ रुग्ण आढळून आलेला नसला तरी भारता शेजारील देशांमध्ये २०२१ या वर्षामध्ये पोलिओचे रुग्ण आढळून आले आहेत. पोलिओ हा भारतातून उच्चाटन झाला असला तरी जगातून अद्यापी नष्ट झालेला नाही. पर्यटन व जागतिकीकरणामुळे पोलिओ विषाणू पसरण्याची शक्यता असल्यामुळे ० - ५ वयोगटातील बालकांसाठी पोलिओचे दोन थेंब महत्त्वाचे आहेत.

देशामध्ये कोविड -19 च्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून दि. २७ फेब्रुवारी रोजी होणारी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना करून राबविण्यात येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये कोविड -19 विषयक सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करून यावर्षी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. याबाबतच्या सर्वतोपरी मार्गदर्शक सूचना सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत, जसे की दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राखणे, मास्क व ग्लोव्हज वापर करणे व सॅनिटायझर वापरणे या त्रिसूत्रीनुसार मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

 या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात ग्रामीण, शहरी तसेच महानगरपालिका विभागांतर्गत एकूण २ हजार ४२३ बुथची निर्मिती करण्यात आलेली असून त्या अंतर्गत एकूण ६ हजार ९९९ कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. जिल्ह्यासाठी एकूण ३ लाख ९० हजार पोलिओ डोस प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यामध्ये शुन्य ते पाच वयोगटातील अंदाजीत ३ लाख ८ हजार ३६० बालकांना या दिवशी पोलिओ डोस देण्यात येणार आहे. बाळ नुकतेच जन्मलेले असले तरी पोलिओ डोस द्यावयाचा आहे. जिल्ह्यातील सर्व बाजारहाट गर्दीची ठिकाणे, धार्मिक स्थळे, बस स्थानके, टोल नाके व रेल्वे स्टेशन्स या ठिकाणी सुद्धा ट्रान्झीट टीम व दुर्गम भागातील वाड्यावस्त्यावरील भटक्या जमाती, ऊस तोडणी मजूर यांच्या मुलांना मोबाईल टीमद्वारे पोलिओ डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

 00 0 0 0 0

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.