इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०२२

खेळाडूंनी खिलाडूवृत्ती जोपासावी -ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

 






कोल्हापूर, दि. 25 (जिमाका): विविध क्रीडा स्पर्धांतून खेळाडूंच्या मानसिकतेचा कस लागतो. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर खेळाचे महत्व अनन्य साधारण आहे. खेळाडूंनी जय-पराजयाचा विचार न करता खिलाडूवृत्ती जोपासावी, असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

       कसबा बावडा येथील पोलीस क्रीडांगणावर जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेस मुश्रीफ यांच्या हस्ते आज प्रारंभ झाला. अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील उपस्थित होते.

          मुश्रीफ पुढे म्हणाले, कोरोना स्थितीमुळे गेल्या दोन वर्षात या स्पर्धा भरविता आल्या नाहीत. मात्र यंदा या स्पर्धा होत आहेत याचा आपणाला मनस्वी आनंद होत आहे. तर पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, क्रीडा स्पर्धेव्दारे खेळाडूंच्या नेतृत्वगुणाला निश्चत वाव मिळतो. या स्पर्धेतून अनेक खेळाडू स्वत:ला सिध्द करुन त्यांच्यातील नैपुण्य दाखवतील, असे सांगत कोरोना स्थितीत जिल्हा परिषदेने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव केला.

प्रारंभी मंत्री महोदय श्री. मुश्रीफ आणि श्री. पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन, क्रीडाज्योत आणि ध्वजारोहण करण्यात आले.

          प्रास्ताविकामध्ये या क्रीडा स्पर्धा आयोजनामागील भूमिका जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांनी मांडली तर या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व  पंचायत समित्यांनी आपला सहभाग नोंदविल्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सांगितले.

          जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या खेळाडूंनी संचलनाद्वारे विविध थोर महापुरुषांची पात्रे साकारत उपस्थितांची वाहवा मिळवली. दि. 25, 26 रोजी क्रीडा स्पर्धा संपन्न होणार असून 28 फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचा समारोप होणार आहे.

           यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयंत शिंपी, सभापती श्रीमती रसिका पाटील, वंदना जाधव, शिवानी भोसले, कोमल मिसाळ, उमेश आपटे, युवराज पाटील, अति. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, सामान्य प्रशासनच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. रवि शिवदास यांच्यासह जिल्हा परिषदेचे इतर सदस्य, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.