इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०२२

सारथीच्या योजनांच्या व्यापक प्रसिद्धीस समाज माध्यांचाही वापर करा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सूचना

 






 

कोल्हापूर, दि. 25 (जिमाका): सारथीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची व्यापक जनजागृती करण्यासाठी  सारथीने समाज माध्यमांचाही  वापर करावा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे दिल्या.

सारथी योजनेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना व सुरु असलेल्या कामांबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज आढावा घेतला. यावेळी सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, निबंधक अशोक पाटील यांच्यासह वसंतराव मुळीक, ॲड. गुलाबराव घोरपडे, इंद्रजीत सावंत, हर्षल सुर्वे, अवधुत पाटील  उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, सारथीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना समाज माध्यामांद्वारे पोहचविल्यास त्यास व्यापक प्रसिद्धी मिळेल व त्यांचा लाभ विद्यार्थींना, संबंधित लाभार्थीस घेता येईल.  सारथीच्या योजनांची माहिती पत्रके तयार करुन सारथीने द्यावीत. ही माहिती पत्रके शिक्षण विभागामार्फत शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वितरीत केली जातील.

कोल्हापूर येथे सुरु केलेल्या सारथीच्या उपकेंद्राचे काम गतीने व्हावे, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, सारथीच्या योजनांची माहिती देण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. या केंद्रात आठवड्यातून किमान दोन दिवस पुणे येथील अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. कोल्हापूर येथील सारथीच्या उपकेंद्राकडे येणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी दिला जाईल. यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक बाबींची पूर्तता करुन प्रस्ताव सादर करावा.

सारथीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. काकडे म्हणाले, सारथीमार्फत  समाज विकासाच्या  योजना  राबवण्यिासाठी आराखडा तयार करण्यात येणार असून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे. आराखड्यामध्ये कोणत्या योजना असाव्यात याबाबत तज्ज्ञांकडून माहिती घेण्यात येत आहे.  मराठा समाजाने याबाबत योजना सुचविल्यास त्याचे स्वागतच केले जाईल.  कोल्हापूर येथील केंद्रात सारथीच्या योजनांची माहिती देण्यासाठी पुणे येथील अधिकारी गुरुवार व शुक्रवार या दोन दिवशी उपस्थित राहतील, असे त्यांनी सांगितले. सारथीमार्फत युपीएससी, एमपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थ्याना मार्गदर्शन, पीएचडी करणाऱ्यांसाठी फेलोशीफ याबरोबच सन 2022 मध्ये होणाऱ्या युपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थी निवड प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचे सांगून सारथीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना व उपक्रमांची त्यांनी माहिती  दिली.

कोल्हापूर येथील सारथीच्या उपकेंद्रामार्फत गतीने काम व्हावे, सारथीमार्फत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्यावरील ग्रंथ प्रकाशित करावेत, सारथीच्या योजनांची प्रसिद्धी करावी, अशी अपेक्षा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. 

 

00000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.