इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, २६ मे, २०२२

महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन इच्छुक स्टार्टअप्सनी सहभागी होण्यासाठी दि. 30 मे पर्यंत अर्ज करावेत

 

 


 

कोल्हापूर, दि. 26 (जिमाका): कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत तरूण आणि नव उद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे.  यामध्ये सहभागी होण्यासाठी दि. 30 मे पर्यंत अर्ज करावेत. इच्छुक स्टार्टअप्सनी www.msins.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. 

            स्टार्टअप्सना शासनासोबत काम करण्याची संधी देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह हा एक प्रमुख उपक्रम आहे. स्टार्टअप्सची नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवा यांचे प्रकल्प शासकीय यंत्रणेत राबवून प्रशासनात नाविन्यता आणणे हे या सप्ताहाचे मुख्य उद्दिष्ट आहे. याअंतर्गत प्राप्त अर्जापैकी अव्वल १०० स्टार्टअप्सना त्यांच्या नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा यांचे सादरीकरण मंत्री, वरिष्ठ शासकीय अधिकारी, गुंतवूणकरदार तज्ञ यांच्या समितीसमोर सादर करण्याची संधी भेटते व त्यातील विजेत्या २४ स्टार्टअप्सना त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने सेवा प्रायोगिक तत्वावर संबंधित शासकीय विभागाबरोबर राबविण्यासाठी नाविन्यता सोसायटीमार्फत १५ लाख रुपयांपर्यंतचे कार्यादेश दिले जातात. यामध्ये कृषी, पायाभूत सुविधा, गतिशीलता आणि संकीर्ण या क्षेत्रांचा समावेश आहे.

महाराष्ट्र स्टार्टअप वीक आजवर चार वेळा यशस्वीपणे संपन्न झाला असून विजेत्या स्टार्टअप्सने राष्ट्रीय आरोग्य मिशन, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, महावितरण, ग्रामविकास विभाग, विविध महानगरपालिका, जिल्हा कार्यालये अशा विविध शासकीय संस्था / विभागांसोबत काम पूर्ण केले आहे. यावर्षी देखील प्रशासनात नाविन्यता आणण्यासाठी व स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप वीक २०२२ वे आयोजन करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी ईमेल team@msins.in अथवा ०२२-३५५४३०९९ या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.