इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१९

'कुमरी' शेतकऱ्यांना आता वनजमिनी कायमस्वरुपी वहिवाटीचा हक्क जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचा महत्वपूर्ण निर्णय






चंदगड, राधानगरी, पन्हाळा, आजरा, शाहूवाडी तालुक्यातील 100 वर्षांपासूनची प्रलंबित मागणी पूर्ण


                               कोल्हापूर दि. 30 (जि.मा.का.) :  'कुमरी' पध्दतीने शेती करणाऱ्या वन निवासींना कायमस्वरुपी वहिवाटीस देऊन त्यांची नावे सातबाऱ्यावरील इतर हक्कात घेण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले. सुमारे 100 वर्षांपासून असणारी वहिवाटीच्या हक्काची मागणी आता पूर्ण झाली आहे. या निर्णयाने जिल्ह्यातील चंदगड, राधानगरी, पन्हाळा, भुदरगड, आजरा, शाहूवाडी आणि करवीरमधील 41.29 हेक्टर शेतजमीन आणि 20 हजार चौरस मीटर रहिवासी क्षेत्राचा लाभ 1 हजार 720 लोकसंख्येला मिळणार आहे.
        जिल्ह्यात 1927 व त्यापूर्वीपासून वननिवासी शेतकरी कुमरी पध्दतीने 16 वर्षांच्या फेरपालटाने नागली, वरी ही पिके घेत होती. परंतु या पध्दतीने जंगलातील छोटा झाड-झाडोरा साफ करुन शेतकरी शेती करीत असत. नवीन क्षेत्र निर्माण करण्याकडे लोकांचा कल होता. त्‍यामुळे जंगलाची हानी होत होती.  वनविभाग कुमरी पध्दतीने शेतीसाठी केलेल्या जमिनीचे भाडे दरवर्षी वसूल करुन त्याच्या भाडे पावत्याही देत होती.
            असे शेत वहिवाटीचे हक्क कायमस्वरुपी मिळावेत अशी वननिवासी शेतकऱ्यांची 100 वर्षापासून मागणी होती.  केंद्रशासनाने यासाठी अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी, वन हक्काची मान्यता अधिनियम 2006 आणि नियम 2008 हा कायदा पारित केल्याने वहिवाटीचे हक्क कायमस्वरुपी मिळण्यास कुमरी धारक शेतकरी पात्र झाले. या शेतकऱ्यांकडे पुरावे असूनही उपविभागीय अधिकारी स्तरावरील समितीने नाकारला होता. याची सुनावणी आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर झाली. असे सर्व दावे मान्य करुन या शेतकऱ्यांना वनजमिनी कायमस्वरुपी वहिवाटीस देऊन त्यांची नावे सातबाऱ्याच्या इतर हक्कात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले. यावेळी सदस्य सचिव प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर, सहाय्यक उपवनसंरक्षक सुनील निकम आदीसह पक्षकार उपस्थित होते.
            जिल्हास्तरीय वन हक्क समितीचे समन्वयक, निवृत्त उपजिल्हाधिकारी डी. के. शिंदे हे 2009 पासून काम पाहत आहेत. आज झालेल्या सुनावणीत एकूण 103 अपील आणि 241 दाव्यानवर सुनावणी झाली. या निर्णयामुळे संबंधित तालुक्यातील रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबून कायमस्वरुपी रोजगाराचा प्रश्न मिटणार आहे.
            चंदगड तालुक्यातील वाघोत्रे, कोदाळी, जांभरे, उमगाव, नगरगाव कोदाळी, गुळंब, कानुरखुर्द, पिळणी, बुझवडे. आजरा तालुक्यातील आवंडी खानापूर, करवीर तालुक्यातील धोंडेवाडी, पन्हाळा तालुक्यातील वाघवे, गोठे, पोर्ले तर्फ ठाणे, निवडे, उत्रे, शाहूवाडी तालुक्यातील पेरीड पैकी गाडेवाडी, भेडसगाव, राधानगरी तालुक्यातील रामणवाडी, बनाचीवाडी, मांडरेवाडी, भुदरगड तालुक्यातील पेठशिवापूर या गावांचा समावेश आहे.  या निर्णयामुळे जिल्ह्यातील एकूण 1 हजार 720 लोकसंख्येला 41.29 हेक्टर शेतजमीन आणि 20 हजार चौरस मीटर रहिवास क्षेत्राचा लाभ मिळणार आहे.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.