इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१९

दिव्यांगांच्या स्वावलंबनासाठी संस्थांनी पुढे यावे - रविकांत अडसूळ









               
                कोल्हापूर दि. 27 (जि.मा.का.): दिव्यांगांना स्वावलंबी बनवून कायमस्वरुपी  उदरनिर्वाहाची व्यवस्था निर्माण व्हावी, यासाठी शासन विविध योजना व अभियान राबवित आहे. या उपक्रमांमध्ये सामाजिक, स्वयंसेवी संस्थांनीदेखील पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ यांनी व्यक्त केले.
            समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर  जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा व रोटरी क्लब ऑफ होरायझन्‍ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग मुलांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते  ज्योत प्रज्वलीत करुन उद्घाटन करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
            यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी दिपक घाटे, रोटरी क्लब ऑफ होरायझनचे अध्यक्ष समीर पाटील, झंवर उद्योग समुहाचे नरेंद्र झंवर, रोटरीचे नामदेव गुरव, अमरसिंह बिचकर, देवराज नाईक-निंबाळकर, जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.  
            श्री. अडसूळ म्हणाले, दिव्यांगांच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील असून त्यामध्ये सामाजिक संस्थांनी योगदान दिल्यास दिव्यांगांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी गती मिळेल. या स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ होरायझन व झंवर उद्योग समुहाचे त्यांनी आभार व्यक्त केले. स्पर्धेत सहभागी मुलांनी  राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवून जिल्ह्याचे व आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करावे अशा शुभेच्छा दिल्या. 
            यावेळी नरेंद्र झंवर, समीर पाटील, नामदेव गुरव, देवराज नाईक-निंबाळकर आदींनी मनोगत व्यक्त करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक श्री. घाटे यांनी केले. सुरुवातीस स्पर्धकांनी उत्कृष्ट संचलन केले. चेतना विकास मंदिरच्या मुलांनी क्रीडा फॅशन शो करुन उपस्थित सर्वांची मने जिंकली. क्रीडा शपथ घेऊन स्पर्धेला सुरुवात झाली.
            यावेळी कोल्हापूर  जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळांचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक इतर कर्मचारी, रोटरी क्लब ऑफ होरायझन व झंवर उद्योग समूहाचे इतर अधिकारी, पदाधिकारी व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.