इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०१९

दिव्यांग मुलांसाठी आज क्रीडा महोत्सव



कोल्हापूर, दि. 26 (जि.मा.का.) : 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ होरायझन आणि जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून उद्या बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी दिव्यांग मुला-मुलींसाठी एक दिवसीय क्रीडा महोत्सव होणार आहे, अशी माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी दिपक घाटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
       जिल्हा पोलीस परेड ग्राऊंडवर उद्या सकाळी 8.30 वाजता या क्रीडा महोत्सवाचे उद्धाटन होणार आहे. जिल्ह्यातील अस्थिव्यंग, कर्णबधीर, अंध, गतिमंद प्रवर्गातील 500 हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. स्पर्धेमध्ये धावणे, पोहणे, लांबउडी, स्थिरउडी, हलका  चेंडूफेक बुध्दिबळ आदी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांकाने यशस्वी होणाऱ्या क्रीडा स्पर्धकाचे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड होणार आहे. विशेष म्हणजे या जिल्हास्तरीय महोत्सवासाठी होणारा संपूर्ण खर्च रोटरी क्लब होरायझन यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. पुढील 5 वर्षाकरिताही संपूर्ण खर्च या क्लबकडून करण्यात येणार आहे.
            9 ऑक्टोबर रोजी दिव्यांग शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांची एक दिवशीय कार्यशाळा राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात झाली. या कार्यशाहेत माहितीचा अधिकारी अधिनियम 2005, शिक्षक व विद्यार्थी यांचे निकोप मानसिक स्वास्थ्य, बालकांचे आरोग्य व समस्या, दिव्यांग बालकांकच्या सहवासात या जन्मावर शतदा प्रेम करावे अशा विविध विषयावर विशेष तज्ञांकडून सखोल मार्गदर्शन करण्यात आले होते. या कार्यशाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध हस्तकलेच्या वस्तुंचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते. तसेच दिपावली करिता दिव्यांग कार्यशाळेमध्ये तयार करण्यात येणाऱ्या हस्तकला वस्तू उदा. आकाशदिवे, सुवासिक उटणे, दिपावली पणती, दिपावली शुभेच्छा कार्ड इ. वस्तूचे प्रदर्शन भरवण्यात आले.
            3 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता व दिव्यांग विद्यार्थ्यांची जनजागृती प्रभातफेरी मिरजकर तिकटी ते केशवराव भोसले नाट्यगृहापर्यंत होणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी चित्रकला, रांगोळी, गायन, वाचन इत्यादी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे विविध गुणदर्शन,  सांस्कृतिक कार्यक्रमदेखील केशवराव भोसले नाट्यगृहात सकाळी 8.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत होणार आहे.           जिल्हा परिषदेकडील 5 टक्के दिव्यांगाकरिता राखीव स्विय निधीमधून हेलन केलर दिव्यांग प्रेरणा पुरस्कार अंतर्गत दिव्यांग शाळेतील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहे.दिव्यांगांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध योजना व सवलती याबाबतची माहितीदेखील दिली जाणार असल्याचे श्री. घाटे म्हणाले.
            या पत्रकार परिषदेला रोटरी क्लबचे ईव्हेंट चेअरमन नामदेव गुरव, अध्यक्ष समीर पाटील, उद्योजक नरेंद्र झंवर उपस्थित होते.
0000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.