इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१९

छत्रपती शिवाजी महाराज की जय ! घोषणा देत पदभ्रमण मोहिमेसाठी पहिली तुकडी मार्गस्थ छत्रपतींचा इतिहास प्रेरणा देणारा- जिल्हाधिकारी दौलत देसाई










 
                कोल्हापूर दि. 28 (जि.मा.का.): औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूला उपलब्ध साधनसामुग्री आणि काही शेकडो मावळ्‌यांच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी नामोहरम केले. मराठा साम्राज्य निर्माण करून इतिहास घडवला. या प्रेरणा देणाऱ्या इतिहासाचा अभ्यास करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
        सुरूवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत शिवाजी पदभ्रमण मोहिमेसाठी पहिली तुकडी आज मार्गस्थ झाली. एनसीसी गीतानंतर जिल्हाधिकारी श्री. देसाई, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, ग्रुप कमांडर ब्रिगेडीयर  आर. बी. डोगरा यांनी या तुकडीला ध्वज दाखवून मार्गस्थ केले.
         आजच्या या तुकडीमध्ये महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक आणि गोवा निदेशालयाचे छात्र सहभागी झाले आहेत. या छात्रांना शुभेच्छा  देताना जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, घनदाट अरण्य, डोंगरवाटा, सतत पडणारा पाऊस आणि तितकाच घनदाट काळोख अशा प्रतिकुल परिस्थितीत सिध्दी जौहरसारख्या शत्रूला चकवा देत कुशल युध्दनितीच्या जोरावर आणि अवघ्या काही मावळ्यांच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यावरून आपली सुटका करून घेतली. हा प्रसंग इतिहास  घडवून गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात साम्राज्य उभे केले.  त्यांनी घडवलेला  इतिहास छात्रांना प्रेरणा देणारा आहे. त्याचा जरूर  अभ्यास करा, असेही ते म्हणाले.
            कुलगुरू डॉ. शिंदे शुभेच्छा देताना म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज जगातील महान योध्दा आहेत. गनिमी कावा, कुशल युध्दनितीच्या जोरावर इतिहास घडवला. स्वराज्याचे ध्येय ठेवल्याने हा इतिहास घडला. जीवनात ध्येय ठेवल्यास इतिहास घडू शकतो हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कार्य कर्तृत्वाने दाखवून दिले आहे. तत्कालीन प्रतिकुल परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी काही मोजक्या मावळ्यांच्या सहाय्याने ही मोहीम कशी फत्ते  केली असेल, याचा सध्याच्या गुगल मॅपच्या युगात विचार करा.
            कर्नल आर.बी. होला यांनी यावेळी या पदभ्रमण मोहिमेची माहिती दिली. यावेळी निवृत्‍त कर्नल डी.पी. पी. थोरात, कर्नल राजेश शहा, कर्नल गुलशन चढ्ढा, कर्नल के.के. मोरे, लेफ्टनंट कर्नल सुनील नायर, कॅप्टन अंकुश शर्मा आदी उपस्थित होते.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.