इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०१९

गुरूवारपासून छत्रपती शिवाजी ट्रेल ट्रेक देश-विदेशातील 1 हजार एनसीसी छात्रांचा सहभाग




          कोल्हापूर, दि. 26 (जि.मा.का.) : एनसीसी गट कोल्हापूरच्यावतीने गुरूवार दि. 28 नोव्हेंबरपासून पन्हाळा ते विशाळगड असा छत्रपती शिवाजी ट्रेल ट्रेक शिबिराला  सुरुवात होणार आहे. 28,29,30 नोव्हेंबर  आणि 1 डिसेंबर 2019 अशा चार बॅचेसमध्ये सुरूवात होणाऱ्या या ट्रेकमध्ये श्रीलंका आणि देशातील 1 हजार एनसीसी छात्र सहभागी होणार आहेत. राज्य शासनाने कोल्हापूर येथील फ्लाईंग हबला मंजुरी दिली असून पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव एअरपोर्ट ऑथारिटीकडे पाठवल्याची माहिती  ग्रुप कमांडर ब्रिगेडीयर आर.बी. डोगरा यांनी पत्रकार परिषदेत आज दिली.
या ट्रेकबाबत कर्नल आर.बी. होला माहिती देताना म्हणाले, 28 नोव्हेंबरपासून होणारा हा ट्रेक 31 वा आहे. 8 दिवस होणाऱ्या या ट्रेकमध्ये पन्हाळा ते विशाळगड या मार्गावर पन्हाळा, बांबवडे, शाहूवाडी, पांढरपाणी, गजापूर या ठिकाणी कॅम्प होणार आहेत. विशाळगडावर समारोप होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य, त्या इतिहासाची प्रेरणा एनसीसी छात्रांना देणे हा प्रमुख उद्देश या ट्रेक मागील आहे. आंतरराज्य तसेच श्रीलंकेतील छात्रांना राज्य,देश यामधील ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक माहिती करून देणे हाही एक उद्देश आहे. यासाठी स्थानिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
ब्रिगेडीयर डोगरा यांनी यावेळी एनसीसी युनिट ग्रुपबाबत सविस्तर माहिती दिली. कोल्हापूरच्या अंतर्गत सातारा, कराड, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालय आणि शाळांचा समावेश आहे. 300 हून अधिक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये एनसीसीचा समावेश आहे. 51 वर्षानंतर प्रथमच 75 ते 80 शाळा आणि महाविद्यालयांमध्ये एनसीसीची वाढ झाली आहे. युनिट ग्रुपच्या अंतर्गत 1 नौदल युनिट, 9 आर्मी आणि 1 वायुदलाचा समावेश आहे. कोल्हापूर येथे फ्लाईंग हब होण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून राज्य शासनाने पुढील कार्यवाहीसाठी केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाकडे हा प्रस्ताव सप्टेंबरमध्ये पाठवला आहे. या हबमुळे छात्रांना प्रशिक्षण मिळणार असून पायलट बनू इच्छिणाऱ्या छात्रांना फायदा होणार आहे. राज्य शासनामुळे मुलींचे वसतिगृह,सुसज्ज इमारत, गन गॅरेज, स्वयंपाकगृह,शौचालय आदीसह पायाभूत सुविधा पूर्ण झाल्याचे सांगून त्यांनी राज्य शासनाचे आभार मानले.
या पत्रकार परिषदेला कर्नल राजेश शहा, कर्नल एम. के. तिवारी, लेफ्टनंट कर्नल सुनील नायर उपस्थित होते.
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.