इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, २८ जानेवारी, २०२०

..केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष अंमलबजावणी... आशीर्वाद घेण्याचे काम.. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी साधला शिवभोजन थाळी लाभार्थ्यांशी संवाद















कोल्हापूर, दि. 28 (जि.मा.का.) : सर्वांना जय महाराष्ट्र ! दादा... समाधानी आहात का... शिवभोजन थाळी कशी आहे... योजना आवडली का... सरकार स्थापन होवून आज दोन महिने पूर्ण होत आहेत... केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे... हे सर्व आशीर्वाद घेण्याचे काम आहे... मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज येथील रूद्राक्षी स्वयं महिला बचत गट संचलित आण्णा रेस्टॉरंटमधील शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांशी आणि बचत गटाच्या अध्यक्षांशी वेब लिंकवरून संवाद साधला.
आण्णा रेस्टॉरंट येथे 26 जानेवारी रोजी पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते शिवभोजन थाळी योजनेचा प्रारंभ करण्यात आला. याच ठिकाणी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज वेब लिंकच्या माध्यमातून लाभार्थ्यांशी संवाद साधला. भोजनाची गुणवत्ता, टापटिपपणा आणि स्वच्छता यांच्याशी अजिबात तडजोड नको, असे सांगत मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, आज सरकारला दोन महिने पूर्ण होत आहेत. केवळ घोषणा करून न थांबता ही योजना प्रत्यक्ष अंमलात आणली आहे. या योजनेचे शासनामध्ये मित्र पक्षानेही स्वागत केले आहे.
 रुद्राक्ष स्वयं महिला बचत गटाच्या अध्यक्ष राजश्री सोलापुरे यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी बातचीत केली. मुख्यमंत्री म्हणाले, जमणार आहे ना हे काम तुम्हाला...आशीर्वाद घेण्याचे काम आहे...आपली संस्कृती आहे.. अन्नदाता सुखी भव म्हणण्याची. यानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी यावेळी माहिती दिली. प्रारंभ केल्यापासून या ठिकाणी 100 टक्के थाळ्या संपत आहेत. समोरच महापालिकेचे सावित्रीबाई फुले रूग्णालय असल्याने शिवभोजन योजनेचा खूप चांगला फायदा होत आहे. यावर मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, योग्य त्या सुविधा दिल्या जातात का  ते पहा आणि त्यांना सहकार्य करा.
शेवटी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो. या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेला होतोय यातच मला आनंद आहे. असे सांगून त्यांनी सर्वांचे धन्यवाद मानले.

सरकारचे वजन वाढले पाहिजे असं काम करा- मुख्यमंत्री
       आण्णा रेस्टॉरंट येथे देण्यात येणाऱ्या पदार्थांचे, चपातीचे वजन हे जास्त असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी यावेळी दिली. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, पदार्थांचे वजन किती आहे हे माहीत नाही, पण सरकारचं वजन वाढलं पाहिजे, अशा पध्दतीने काम करा. यावेळी उपस्थितांनी त्याला दाद दिली.

यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, अन्न धान्य वितरण अधिकारी माधवी शिंदे, सहाय्यक पुरवठा अधिकारी सरस्वती पाटील, महिला बचत  गटाच्या अध्यक्ष राजश्री सोलापुरे, स्म‍िता मुधाळे, प्रमिला केंगारे, लता कुंभार, मधुरा प्रभावळकर,गीता सोलापुरे, प्राची मंडलिक यांच्यासह लाभार्थी प्रकाश पाटील-सरूडकर, मंगल सतीश कासे, अभिजीत सरदेवलकर, कामिनी भाटे, सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.