इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, ३१ जानेवारी, २०२०

रोजगार मेळाव्यात 406 उमेदवारांची निवड



कोल्हापूर, दि. 31 (जि.मा.का.) : शिवाजी विद्यापीठ आणि राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्यावतीने घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात 406 बेरोजगार उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र आणि राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने काल येथील राजर्षी शाहू कॉलेजमध्ये पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर  व विद्यापीठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त ज.बा.करीम यांच्या हस्ते  करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजर्षी शाहू कॉलेजचे प्राचार्य डॉ.एस.टी.साळुंखे हे होते.
पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 16 उद्योजकांनी सहभाग नोंदविला. यामध्ये एकूण 755 रिक्तपदे (तांत्रिक/अतांत्रिक) अधिसूचित करण्यात आली होती. या रोजगार मेळाव्यात 465 उमेदवार सहभागी झाले होते, त्यामध्ये 406 बेरोजगार उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी नोकरीबाबत बेरोजगार तरूणांना व उद्योजकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले. सहाय्यक आयुक्त ज.बा.करीम यांनी बेरोजगारांना रोजगार मेळावा व नोकरी विषयक संधी याबाबत मार्गदर्शन केले. शिवाजी विद्यापीठाचे प्लेसमेंट सेलचे प्रमुख डॉ. जी.एस. राशिनकर यांनी बेरोजगार तरूणांना संभाषण कौशल्य याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.टी.बाठे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन व कामकाज कार्यालयातील वरिष्ठ लिपीक अ.रा.खेडेकर व लिपीक वि.वि.धुमाळ  यांनी केले.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.