इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, २९ जानेवारी, २०२०

तृतीयपंथीयांना मतदान ओळखपत्र देण्यास प्राधान्य - जिल्हाधिकारी दौलत देसाई




कोल्हापूर, दि. 29 (जि.मा.का.) : तृतीयपंथीयांना मतदान ओळखपत्र देण्याच्या कामास प्रशासन  प्राधान्य देईल, मात्र संबंधितांनी  तृतीयपंथीयांची एकत्रित यादी व आवश्यक फॉर्म भरुन माहिती सादर करावी, जेणे करुन तृतीयपंथीयांना नव्या नावावर आणि नव्या छायाचित्रासह नवीन मतदान ओळखपत्र उपलब्ध होईल, अशी माहिती  जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज येथे बोलतांना दिली.
        जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.  त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विलास देशमुख, जिल्हा आरसीएच अधिकारी डॉ. एफ.ए. देसाई, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दिपा शिपुरकर, जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी तसेच स्वयंसेवी-सेवाभावी संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.
          तृतीयपंथी यांच्याबाबतीत समाजाचा दृष्टीकोन बदलावा,  यादृष्टीने तृतीयपंथी यांच्याबाबतीत योग्य ती माहिती समाजासमोर यावी, यासाठी लवकरच सर्व संबंधितांच्या व्यापक कार्यशाळेचे आयोजन करण्याची सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई  यांनी केली. समाजात समलिंगी, स्त्री - पुरुष, तृतीयपंथी यांच्याबाबतीत योग्य ती माहिती नसल्याने त्यांच्याबरोबर हिंसा व भेदभाव घडतो. त्यांना समाजाने स्विकारले नसल्याने हा गट एचआयव्हीला बळी पडन्याची शक्यता असल्याने जिल्हा एड्स नियंत्रण पथकाकडून समाजातील विविध स्तरावर जागृती आणि प्रबोधनावर भर दिला जाईल, असे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दिपा शिपुरकर यांनी सांगितले.
          जिल्हयात एचआयव्ही संसर्गीतांचे प्रमाण कमी होत चालले असून त्यांना एआरटी सेंटरच्या माध्यमातून नियमित औषधोपचार सुरु आहे. एचआयव्ही संसर्गाबाबत पूर्णपणे गोपनीयता ठेवली जाते. त्याबाबत संबंधितांच्या नातेवाईकांनाही माहिती दिली जात नाही, एचआयव्ही संसर्गीतांना एसटी प्रमाणेच केएमटी बसचा लाभ मिळवून देण्यासाठी महानगरपालीकेशी पाठपुरावा, करण्याची सूचनाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केली. एचआयव्ही संसर्गितांना संजय गांधी निराधर योजनेचे लाभ मिळण्याबाबतच्या अडचणी तात्काळ दूर करण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
बैठकीत सुरुवातीला जिल्हा एड्स नियंत्रण पथकाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी दिपा शिपुरकर यांनी जिल्ह्यात एचआयव्ही / एड्स बाबत होणाऱ्या कार्यक्रमाचा आढवा घेतला. जिल्हा एड्स नियंत्रण पथकास इंडोकाऊंट फाऊंडेशन सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत 15 संगणक तसेच 12 रेफ्रिजरेटर देण्यात आल्याबद्दल इंडोकाऊंट संस्थेचे यावेळी समितीच्यावतीने  अभिनंदन करण्यात आले.
प्रारंभी  प्र. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विलास देशमुख यांनी स्वागत केले तर आभार जिल्हा पर्यवेक्षक श्री. निरंजन देशपांडे यांनी मानले. यावेळी अभिमान संस्थेच्या सायरा खानविलकर व विशाल पिंजानी यांनी तृतीयपंथी यांना सामाजिक समावेशनात येणाऱ्या अडचणी, हक्क याबद्दल माहिती दिली.
या बैठकीस वैद्यकीय अधिक्षक डॉ. तेजस्विनी सांगरुळकर, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अमोलकुमार माने, पी. एन. देशपांडे, विद्येश  नाईक तसेच, वैद्यकीय अधिकारी, एआरटी केंद्राचे समुपदेशक, स्वयंसेवी संस्थाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.