इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, २७ मार्च, २०२०

प्रशासन दक्ष; नागरिकांनी सहकार्य करा - पालकमंत्री सतेज पाटील





        कोल्हापूर, दि. 27 (जि.मा.का) :- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासन दक्ष असून जनतेनेही प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे.
        पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, परदेशातून तसेच पुणे, मुंबई येथून आलेल्या प्रवाशांना जर सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी ताबडतोब प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधावा. आपण स्वत: दक्ष रहा आणि ताबडतोब प्रशासनाला कळवा. त्यामुळे इतरांना संसर्ग होणार नाही. अशा लक्षणांमुळे पहिला धोका हा आपल्या घरातील व्यक्तींना असणार आहे, याची दक्षता घ्यावी.
वृत्तपत्रांना प्रशासनाचे सर्व सहकार्य
            जिल्ह्यातील प्रमुख दैनिकांच्या संपादकांनी आज पालकमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी पालकमंत्री म्हणाले, बंद असणाऱ्या वृत्तपत्रांना प्रशासनामार्फत सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल. पत्रकारांना अत्यावश्यक सेवेचे पास देण्यात आले आहेत. त्याच बरोबर अंक विक्रेत्यांनाही तसेच वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही पास देण्यात आले आहेत. वृत्तपत्र वितरण करणाऱ्यांनी मास्क वापरावेत. स्वत:ची तसेच वाचकांचीही योग्य ती खबरदारी घ्यावी. यावेळी दैनिक पुढारीचे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव, दैनिक सकाळचे संपादक-संचालक श्रीराम पवार, निवासी संपादक निखील पंडितराव, दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे संपादक विजय जाधव, दैनिक तरुण भारतचे निवासी संपादक मनोज साळुंखे, दैनिक लोकमतचे वरिष्ठ         सरव्यवस्थापक  मकरंद देशमुख,  दैनिक पुण्यनगरीचे वृत्तसंपादक राजकुमार चौगुले आदी उपस्थित होते.
राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस् बँकेकडून लाखाचा धनादेश
            ज्यांना मदत करायची आहे त्यांनी 'कोल्हापूर डिझास्टर रिलीफ फंड' या नावाने मदत करावी असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले.  या आवाहनाला  प्रतिसाद देत राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस् बँकेचे संचालक, अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून एक लाख एक हजार एकशे अकरा रुपयाचा धनादेश आज पालकमंत्री यांच्याकडे सुपूर्द केला.
            अनेक स्वयंसेवी संस्था जेवण पुरविण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे स्वागतार्ह आहे. परंतु, त्याची नोंद प्रशासनाकडे करावी. प्रशासनाच्या परवानगीशिवाय कोणतीही गोष्ट करु नये. जेणेकरुन कोणताही धोका निर्माण होणार नाही. महापुराच्या कालावधीत ज्या पद्धतीने स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सेंट्रल किचन सुरु करुन जेवणाची सुविधा करण्यात आली होती त्याच पद्धतीने यावेळी देखील करण्याचा विचार आहे.
अडकलेल्या लोकांना त्याच ठिकाणी सुविधा पुरवू
            मुंबई, लातूर, रोहा आणि गोवा या ठिकाणी  नातेवाईक अडकल्याचे अनेक जणांचे फोन येत आहेत. त्या सर्वांना तिथे जेवणाची सुविधा पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे. तशी कुणाची राहण्याची, जेवणाची अडचण असेल तर आम्हाला कळवा. तिथे आम्ही सुविधा  पुरविण्याचे नियोजन निश्चित करु. परंतु त्यांना इकडे आणण्याचा आग्रह धरु नका, कारण जिल्हाबंदी घातली आहे. काटेकोरपणे आपण संचारबंदी राबविली तर निश्चितपणे या संकटातून बाहेर पडू असा विश्वास पालकमंत्री श्री. पाटील यांनी व्यक्त केला.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.