इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, २४ डिसेंबर, २०२१

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून कोल्हापूरात 'ग्राहक राजा'च्या हस्ते स्टॉल्सचे उद्घाटन ग्राहकांनी फसवणूक झाल्यास जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दाद मागावी -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

 








कोल्हापूर, दि.24 (जिमाका): ग्राहक हा देशाच्या अर्थकारणाचा राजा आहे. आपण दररोज ग्राहक असतो. ग्राहक म्हणून वावरताना आपल्या हक्कांसाठी जागरुक रहा. कोणतीही वस्तू खरेदी करताना अथवा सेवा घेताना फसवणूक झाल्यास ग्राहकांनी स्वतःहून पुढे येऊन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दाद मागावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले. 

अन्न व नागरी पुरवठा विभाग व जिल्हा प्रशासनाच्यावतीने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त भवानी मंडप येथे जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली ग्राहक जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा सविता भोसले, राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तथा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अरुण यादव, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर, वैधमापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक राजेंद्र गायकवाड, तहसीलदार शितल मुळे- भामरे, प्रबोधन प्रचार प्रमुख संदीप जंगम, वीज वितरण ग्राहक तक्रार निवारण मंचाचे सदस्य कमलाकर बुरांडे आदी  उपस्थित होते. 

यावेळी ग्राहक पंचायत प्रबोधन विभाग व शहाजी लॉ कॉलेज यांच्या वतीने ‘ग्राहक राजा जागा हो’ विषयावर पथनाट्य सादर केले. ग्राहक प्रबोधनामध्ये उल्लेखनीय कार्याबद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या कोल्हापूर प्रतिनिधी वैदेही पाध्ये व वैदेही जोशी यांचा जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या ठिकाणी लावण्यात आलेल्या विविध विभागांच्या ग्राहक जागृतीपर स्टॉल्सचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते तसेच त्यांच्या संकल्पनेतून उपस्थित ग्राहक यास्मिन जमादार, हिंदुराव कांबळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

          ग्राहक संरक्षण कायदा 24 डिसेंबर 1986 रोजी मंजूर झाला. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. देशात ग्राहकांची चळवळ आणि जागरूकता मोठ्या प्रमाणात झाल्यामुळेच ग्राहक संरक्षण कायदा 2019 हा नवीन स्वरूपात मंजूर करण्यात आला आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, ग्राहकांना जागरूक करुन त्यांचे अधिकार मिळवून देण्यामध्ये ग्राहक संरक्षण कायदा महत्वपूर्ण आहे. आपल्या हक्काच्या पैशातून विकत घेतलेली कोणतीही वस्तू, साहित्य, सेवेमध्ये फसवणुक झाली किंवा त्रुटी आढळून आली तरीही ग्राहकाला निश्चित न्याय मिळेल, अशी खात्री जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी व्यक्त केली.

          जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा सविता भोसले म्हणाल्या, जिल्हा ग्राहक आयोगामध्ये पाच लाखापर्यंतच्या फसवणुकीची तक्रार दाखल करण्यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही. दिशाभूल करणाऱ्या फसव्या जाहिराती, ठरल्याप्रमाणे सेवा-सुविधा न मिळाल्यास देखील ग्राहक तक्रार दाखल करू शकतात. ग्राहकांनी कोणतीही वस्तू अथवा सेवा घेताना जागरूक रहावे. फसवणूक झाल्यास ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करावी. ‘हे ग्राहक राजा, मागुन काही मिळत नाही... त्यासाठी लढावंच लागतं...’ ही छोटी कविता सादर करून त्यांनी ग्राहकांना आवाहन केले.

राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य अरुण यादव म्हणाले, देशाच्या कोणत्याही भागातून आपण वस्तू खरेदी केली असली आणि ती वस्तू खराब असल्याचे आढळले तरीदेखील जिल्हा ग्राहक आयोगाकडे दाद मागता येते. वस्तू अथवा सेवा घेतल्यानंतर एक कोटी रुपयांपर्यंतच्या नुकसान भरपाईसाठी जिल्हा ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल करता येते. ग्राहक आणि विक्रेता यांनी सामोपचाराने प्रकरण मिटवावयाचे असल्यास या कायद्यांतर्गत ‘मध्यस्त कक्षा’ची निर्मिती केली आहे. ऑनलाईन वस्तू खरेदी केल्यास फसवणूक झाली तरीही दाद मागण्याचा हक्क ग्राहकांना आहे. 

ग्राहकांच्या हक्काबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांनी मार्गदर्शन केले. अन्नसुरक्षा मानके कायदा 2006 मधील मूलभूत बदलाबाबत त्यांनी माहिती दिली. औषध खाद्यपदार्थ खरेदी करताना मुदतबाह्य होणारी तारीख आवर्जून पहा. वस्तूंचे बिल घ्या, अन्न पदार्थांमध्ये भेसळ असल्याचे आढळल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाशी  संपर्क साधा, असे त्यांनी सांगितले. 

खरेदी केलेल्या वस्तूचे वजन अथवा माप कमी आढळल्यास वैधमापन शास्त्र विभागाशी 0231- 2542549 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वैधमापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक राजेंद्र गायकवाड यांनी केले.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.