इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, २८ डिसेंबर, २०२१

व्यावसायिक कारणांसाठी घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांवर कारवाई करा -जिल्हाधिकारी राहुल रेखावार


 



कोल्हापूर, दि. 28 (जिमाका): घरगुती गॅस सिलेंडरचा बेकायदेशीरपणे व्यावसायिक कारणासाठी वापर होणार नाही, याची दक्षता सर्व गॅस कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे सांगून घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करणाऱ्यांवर कारवाई करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके तसेच समिती सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, व्यावसायिक कारणांसाठी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करणे बेकायदेशीर आहे. गॅस कंपन्यांनी त्यांच्या अधिनस्त सर्व गॅस एजन्सीजची तपासणी करुन याबाबत माहिती घ्यावी. घरगुती गॅसचा बेकायदेशीर वापर होत असल्याचे आढळल्यास संबंधित व्यावसायिक आणि गॅस एजन्सी चालकांवर कारवाई करा. सीएनजी वरील गाड्यांमध्ये अनधिकृतपणे घरगुती एलपीजीचा वापर होत असल्याचे आढळून आल्यास गॅस कंपन्यांनी तपासणी करुन पोलीस विभाग व पुरवठा विभागाच्या मदतीने संबंधितांवर कारवाई करा, अशा सूचना देऊन गॅस सिलेंडर देताना व घेताना कोणती खबरदारी घ्यावयाची याबाबत गॅस वितरक कंपन्यांनी जनजागृती करावी, असे सांगितले.

वैधमापन शास्त्र विभागाने जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत दुकानातील वजन व मापांची तपासणी करावी. शॉप ॲक्टनुसार नोंदणी झालेल्या वजन, मापाशी संबंधित सर्व दुकानांची गाव, तालुकानिहाय यादी करा. ही यादी अद्ययावत करुन जिल्ह्याच्या वेबसाईटवर प्रकाशित करा, असे जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी सांगितले.

जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी ग्राहकांच्या संरक्षणासाठी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

 गॅस सिलेंडर ग्राहकांनी तक्रार असल्यास एच पी गॅस- 1800 233 3555 तर भारत पेट्रोलियम- 1800 224 344  या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन  यावेळी गॅस कंपन्यांच्या प्रतिनिधींनी केले.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.