बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

राधानगरी धरणाचे सर्व्हिस गेट ओपन: पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन


 

संध्याकाळपर्यंत राधानगरी धरणातून विसर्ग बंद होण्याची शक्यता

कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांची माहिती

 

कोल्हापूर, दि.29 (जिमाका): आज सकाळी साडेनऊ वाजता राधानगरी धरणाच्या गेटच्या दुरुस्तीचे तांत्रिक काम सुरु असताना अचानक अपघाताने सर्विस गेट ओपन झाले आहे. यामुळे नदीपात्रात सुमारे 4 ते 5 फुटांनी पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने महसूल, जलसंपदा व संबंधित विभागांच्या वतीने नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. पब्लिक ऍड्रेस सिस्टीम (पीएएस) द्वारेही नागरिकांना याबाबत माहिती देण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी कपडे धुणे, जनावर अथवा गाडी धुणे, मासेमारी करण्यासाठी नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

राधानगरी धरणाचे हे गेट शॉर्ट सर्किटमुळे ओपन झाले असल्याचा पाटबंधारे विभागाच्या इलेक्ट्रिकल टीमचा प्राथमिक अंदाज आहे.  हे सर्विस गेट बंद करण्यासाठी जलसंपदा विभाग व यांत्रिकी विभागाच्या टीम्स राधानगरी धरणावर पोहोचल्या आहेत. इमर्जन्सी गेट टाकून त्यानंतर सर्विस गेट बंद करण्यात येणार आहे. यासाठी साधारण पाच ते सात तासाचा वेळ लागणार असून अंदाजे संध्याकाळपर्यंत राधानगरी धरणातून होणारा विसर्ग बंद होईल, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिली आहे.

     सध्या धरणातून 4 हजार क्युसेक्स विसर्ग सुरु असून पंचगंगा नदीवरील केटीवेअरचे बर्गे काढून बंधाऱ्यावरुन पाणी वाहणार नाही, याची दक्षता जलसंपदा विभागाकडून घेण्यात येत आहे. पंचगंगा नदीवरील केटीवेअरवर (कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या ठिकाणी) जलसंपदा विभागाचे कर्मचारी उपस्थित असून नागरिकांना नदीपात्रात उतरण्यापासून परावृत्त करण्यात येत आहे. पाण्याचा अंदाज घेवून शक्य असणाऱ्या ठिकाणी शेतकऱ्यांनी नदीकाठावरील मोटार व पंपसेट काढून सुरक्षित ठिकाणी न्यावेत, असे आवाहन जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता(श्रेणी 1) संदीप दावणे यांनी केले आहे.

000000

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.