कोल्हापूर दि. ५ ( जिमाका ) :
छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र प्रचंड प्रेरणादायी आहे. महाराजांच्या कार्यकर्तृत्वामुळेच
आजचे आपले अस्तित्व आहे, याचे भान राखून विद्यार्थ्यांनी त्यांचे स्मरण करावे आणि त्यांच्या
प्रेरणेतून स्वतःची उन्नती साधावी, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे
कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
शिवाजी
विद्यापीठाच्या ५८व्या दीक्षान्त समारंभात घोषित करण्यात आलेली मा. राष्ट्रपती व मा.
कुलपती यांची सुवर्णपदके तसेच शहीद तुकाराम ओंबाळे विशेष पारितोषिक प्रदान समारंभ आज
कुलपती श्री. कोश्यारी यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात ते बोलत होते. राजर्षी शाहू
सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस.
पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
कुलपती
श्री. कोश्यारी म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नगरीत छत्रपती शिवाजी
महाराज यांच्या नावाने असलेल्या शिवाजी विद्यापीठाचा हीरकमहोत्सव आणि देशाच्या स्वातंत्र्याचा
अमृतमहोत्सव असा योग जुळून आला आहे, ही महत्त्वाची बाब आहे. विद्यापीठाने आपल्या शैक्षणिक
कार्याबरोबरच सामाजिक दायित्वही निष्ठेने जपले आहे. कोविडच्या कालखंडात विद्यापीठ परिवाराने,
विशेषतः राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी अतिशय मोलाचे योगदान दिलेले आहे, हे
अत्यंत अभिमानास्पद आहे.
कोविडच्या
काळात शैक्षणिक बाबतीत पडलेला खंड आता विद्यार्थी-शिक्षकांनी दुप्पट मेहनतीने भरून
काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आवाहन करून श्री. कोश्यारी म्हणाले,
सध्याच्या विद्यार्थ्यांनी आपल्या दिसण्यावर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे विविध अॅप्स
पाहिले की सहज निदर्शनास येत आहे. तथापि, केवळ दिसण्यापेक्षा आपण अनेकविध चांगल्या
गोष्टी करण्यावर अधिक भर देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी मेहनत करून कोणत्याही क्षेत्रात
नावलौकिक मिळविण्याचा प्रयत्न करावा. आपण सर्वांनी मिळून एकदिलाने प्रगतीपथावर वाटचाल
केली पाहिजे. त्यातून आपल्या प्रदेशाचे, देशाचे नाव उंचावण्याचे ध्येय समोर ठेवले पाहिजे.
आपल्या
भाषणात नैतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करून कुलपती श्री. कोश्यारी म्हणाले, भारतमाता
आणि मातृभाषा यांच्याप्रती आदरभाव सदैव बाळगून आपण कार्यरत राहिले पाहिजे. सर्व भाषा
शिकल्या पाहिजेत, सर्वच भाषांचा आदरही केला पाहिजे, पण त्यात मातृभाषेचे स्थान उच्च
असले पाहिजे. शिक्षकांनीही अशा विविध भाषांचा अवलंब करून शिकवित असताना असे अभ्यासक्रम
जास्तीत जास्त मातृभाषेतून कसे शिकविता येतील, यादृष्टीने प्रयत्न करावा, असे आवाहनही
त्यांनी या प्रसंगी केले.
कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, विद्यापीठ आता
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०च्या अंमलबजावणीसाठी पूर्णतः तयार आहे. विविध एकात्मिक
अभ्यासक्रम, कौशल्य विकास शिक्षण व प्रशिक्षण, मूल्यशिक्षण, मूल्यवर्धित अभ्यासक्रम
आदींच्या माध्यमातून सक्षम विद्यार्थी घडविण्यास विद्यापीठ तत्पर आहे. त्याचप्रमाणे
टाटा-स्ट्राईव्ह, वाधवानी फौंडेशन आदी संस्थांसमवेत केलेल्या सामंजस्य करारांच्या माध्यमातून
विद्यार्थ्यांत रोजगाराभिमुखतेचा विकास करण्याचे उपक्रमही सातत्याने राबविले जात आहेत.
संशोधनाच्या बाबतीत विद्यापीठाच्या शिक्षकांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रमवारीत
स्थान पटकावून विद्यापीठाचा लौकिक उंचावला आहे. क्रीडा क्षेत्रातही विद्यापीठाची विद्यार्थिनी
सबिना मुलाणी ही कर्णबधिरांसाठीच्या ऑलिंपिकसाठी पात्र ठरली आहे , ही बाब विद्यापीठासाठी
अत्यंत अभिमानास्पद आहे.
यावेळी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात विद्यापीठाच्या
रसायनशास्त्र अधिविभागात द्वितिय वर्षात शिकणाऱ्या श्रीमती ऐश्वर्या आकाराम मोरे (मु.पो.
वडरगे, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) या विद्यार्थिनीस शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रपती
सुवर्णपदक तसेच एम.ए. (हिंदी) परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल सांगली येथील कस्तुरबाई
वालचंद महाविद्यालयाच्या श्रीमती स्वाती गुंडू पाटील (मु.पो. दानोळी, ता. शिरोळ, जि.
कोल्हापूर) या विद्यार्थिनीस कुलपती सुवर्णपदक श्री. कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान
करण्यात आले. तर सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील केंट क्लब, कोल्हापूर निर्मित ‘शहीद
तुकाराम ओंबाळे विशेष कला, साहित्य, सांस्कृतिक प्रावीण्य पारितोषिक व स्मृतिचिन्ह’
मयुरेश मधुसुदन शिखरे (विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर) या विद्यार्थ्यास कुलपतींच्या
हस्ते प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी.एस.
पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी
आभार मानले.या कार्यक्रमास विद्यापीठाचे सर्व संवैधानिक अधिकारी, विविध विद्याशाखांचे
अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी,
विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.