इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, १९ जून, २०२३

दूधगंगा धरणाच्या स्थैर्यता व सुरक्षिततेसाठी पाणीसाठा कमी केला

 


कोल्हापूर, दि. 19 (जि.मा.का.) : दूधगंगा धरणामध्ये सन 2022-2023 मध्ये जाणीपूर्वक 6 अ.घ.फु. ने पाणीसाठी कमी करण्यात आला. ही कार्यवाही धरणाच्या स्थैर्यता व सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देवून पूर्णत: तांत्रिक अभ्यासानुसार करण्यात आली आहे, अशी माहिती दूधगंगा कालवे विभाग क्र. 1 च्या  कार्यकारी अभियंता  विनया बदामी यांनी दिली.

राधानगरी तालुक्यातील दुधगंगा प्रकल्प अंतर्गत 25.40 अ.घ.फु. क्षमतेचे धरण (मातीचे धरण, वक्र द्वारासहित सांडवा प्रकार) बांधण्यात आले. सन 2006 पासून या धरणात पूर्ण क्षमतेने म्हणजेच 25.40 अ.घ.फु. इतका पाणीसाठा करण्यात येत असून सद्यस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील 41 हजार हेक्टर क्षेत्र सिंचित करण्यात येत आहे. प्रकल्पाच्या आंतरराज्यीय करारानुसार कर्नाटक राज्यास नदी, कालवा या माध्यमातून 4 अ.घ.फु. पाणी देण्यात येते. धरण प्रकल्पाचा सांडवा व काही भाग (490 मीटर लांबी) हा दगडी बांधकाम प्रकाराचा असून या भागातून धरणामध्ये प्रथम साठा करण्यात आला तेव्हापासून म्हणजेच सन 2007 पासून गळती निदर्शनास आली आहे. सुरुवातीस ती 360 लि./से. इतकी नोंदविण्यात आली. तर सन 2010 ते 2014 मध्ये गळती प्रतिबंधक उपाय योजनेचे काही प्रमाणात काम करण्यात आल्याने सन 2016 मध्ये ती किमान 166 लि./से. इतकी निदर्शनास आली. (वस्तूतः IS 11216-85 प्रमाणे अनुज्ञेय गळती ही कमाल 70 लि./से. इतकीच आहे.)

सन 2021-22 च्या हंगामात दगडी धरणातील गळती पुन्हा साधारणतः 350 लि./से. इतकी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे जलसंपदा विभागांतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व केंद्र शासनाच्या CW&PRS, पुणे या संस्थेकडून या विषयी पहाणी करून याबाबत अभ्यास करण्यात आला.  त्याप्रमाणे गळती ही धरणाच्या पूर्ण अंगास छेद देऊन खालील बाजूस पाणी उसळत असल्याने, धरणास उर्ध्व बाजूस Concrete Septum नसल्याने, धरणाच्या बांधकामाची घनता कमी झाल्याने, अनुज्ञेय गळती (70 लि./से.) पेक्षा निदर्शनास आलेली गळती 350 लि./से. ही जास्त प्रमाणात असल्याने मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, पुणे यांच्या पहाणीनंतर धरणाच्या स्थैर्यता व सुरक्षिततेकरिता गळती प्रतिबंधक उपाय योजनेचे काम सर्व प्रशासकीय मान्यता, सोपस्कार पूर्ण करून प्रत्यक्ष हाती घेईपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून धरणामध्ये सन 2022-23 च्या हंगामात पाणीसाठा हा कमाल उंचीने (68 मी.) न करता तो 5 मी. कमी उंचीने म्हणजेच 25.40 अ.घ.फु. ऐवजी 19.68 अ.घ.फु. इतकाच करण्यात यावा असे निर्देश देण्यात आले. जेणेकरून धरणाचे दगडी बांधकाम, स्थैर्यता व अंतर्गत मजबुतीवर कमीत कमी गळतीचा परिणाम होईल.

 गळती रोखण्याकरिता सर्व आवश्यक चाचण्या, अभ्यास विविध संस्था यांच्याकडून पूर्ण करण्यात आल्या असून त्याप्रमाणे सुचविण्यात आलेल्या सर्व उपाययोजना अंमलात आणण्याकरिता ग्राऊटिंग व इतर बांधकाम पद्धतीचे 80.36 कोटी रूपये इतक्या रक्कमेचे अंदाजपत्रक शासनाच्या वेगवेगळ्या छाननी टप्प्यातून मंजुरी घेऊन जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन, यांच्याकडे अंतिम मंजुरी (प्रशासकीय मान्यता) साठी सादर करण्यात आले आहे.

सन 2022-23 चा सिंचन हंगाम देखील उपलब्ध पाण्यामधून यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला आहे. सद्यस्थितीत उपलब्ध साठा (1 अ.घ.फु. अचल साठा मधील) हा पावसाळा लांबल्यामुळे 15 जुलै पर्यंत पिण्याच्या पाण्याकरिता सर्वोच्च प्राधान्य देवून राखून ठेवण्यात आला असल्याचे दुधगंगा कालवे विभाग 1 च्या कार्यकारी अभियंता श्रीमती बदामी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.