इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, ३० जून, २०२३

शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील ई-पीक पाहणीची नोंदणी पूर्ण करुन घ्यावी

 

कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : खरीप हंगामाची प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे करण्यासाठी दिनांक १ जुलै २०२३ पासून सुरुवात करण्यात येत आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२३ साठी दिलेल्या कालावधीमध्ये आपली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ई-पीक पाहणी प्रकल्प (पुणे) चे राज्य समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांनी केले आहे.

 ई-पीक पाहणी मोबाईल अॅपच्या सहाय्याने सर्व खातेदार शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरुन आपल्या ७/१२ वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. महसूल विभागाचा ई - पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून महाराष्ट्रात राज्यभर राबविण्यात येत आहे. या अॅपमध्ये आतापर्यंत सुमारे १.८८ कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे व आपल्या पिकांची नोंदणी केली आहे.

खरीप हंगाम २०२३ पीक पाहणी नोंदणीसाठी ई-पीक पाहणीचे २.०.११ हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सर्व खातेदार शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील ई-पीक पाहणीच्या नोंदणीसाठी नवीन व्हर्जन अपडेट करुन घेणे आवश्यक आहे, असे ही पत्रकात नमुद आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.