इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, २६ जून, २०२३

राजर्षी शाहू जयंतीनिमित्त आयोजित समता दिंडीला भरघोस प्रतिसाद राजर्षी शाहू महाराजांना शाहू महाराज छत्रपती व पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले अभिवादन

 






कोल्हापूर, दि. 26 (जिमाका): लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय ! या जयघोषाने शाहू महाराजांचे स्मरण करुन देणाऱ्या समता दिंडीला कोल्हापूरकरांनी भरघोस प्रतिसाद दिला. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने जिल्हा प्रशासन व सहायक आयुक्त समाजकल्याण विभागाच्या वतीने दसरा चौकात समता दिंडीसह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

 

समता दिंडीचे उद्घाटन श्री शाहू महाराज छत्रपती व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते समता दिंडीला हिरवा झेंडा दाखवून करुन करण्यात आले.

 

  यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, मालोजीराजे छत्रपती, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, ज्येष्ठ इतिहास तज्ञ डॉ. जयसिंगराव पवार, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे, महानगरपालिकेचे रविकांत अडसूळ तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

दसरा चौकात सुरुवात झालेली समता दिंडी पुढे -व्हिनस कॉर्नर- आई साहेबांचा पुतळा- बिंदू चौकात येवून या दिंडीचा समारोप झाला.

 

या समता दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळ, झांज, ढोल ताशा, लेझीम आदी कलाप्रकार सादर केले. दिंडीत एन.सी.सी., एन.एस.एस., स्काऊट गाईडचे विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले. शाहू महाराजांच्या वेशभूषेत उपस्थित मुलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जिल्हा समाजकल्याण कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या चित्ररथामध्ये पारंपरिक वेषभुषा परिधान करुन जिवंत देखावा सादर करण्यात आला. कोल्हापूर नगरी ही खेळाडूंची नगरी असल्याने कुस्ती, फुटबॉल सह इतर खेळाडू त्यांच्या खेळाशी निगडीत वेषभूषा करुन यावेळी या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. तर बहुतांशी विद्यार्थी-विद्यार्थिनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले. जिल्हा प्रशासन व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाद्वारे आयोजित समता दिंडी साठी विविध विभागांनी सहभाग घेतला.

 

दरम्यान शाहिरी पोवाड्यातून राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध शाळांचे शेकडो विद्यार्थी, शाहू प्रेमी, इतिहास प्रेमी नागरिक उपस्थित होते.

   

 

 

 

 

 

 

श्री शाहू महाराज छत्रपती व पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले शाहू महाराजांना अभिवादन

 

दरम्यान श्री शाहू महाराज छत्रपती, पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार प्रकाश आवाडे यांनी दसरा चौक येथे राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, ज्येष्ठ इतिहास तज्ञ डॉ. जयसिंगराव पवार, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक यांनीही आदरांजली वाहिली. यावेळी इतिहास प्रेमी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.