शनिवार, १९ सप्टेंबर, २०१५


जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत उपलब्ध होणारा
निधी यंत्रणांनी प्राधान्याने खर्च करावा-- पालकमंत्री चंद्रकांत पाटील
जिल्ह्यास यंदा 321 कोटी 76 लाखाचा नियतव्यय मंजूर

कोल्हापूर, दि. 19 :  जिल्ह्यास यंदा सर्वसाधारण, विशेष घटक योजना आणि ओ. टी. एस. पी. साठी 321 कोटी 76 लाखाचा नियतव्यय मंजूर झाला असून, सर्व यंत्रणांनी त्यांना उपलब्ध होणारा निधी प्राधान्याने खर्च करण्याच्या कामास सर्वोच्च प्राधान्य द्यावे अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली.
जिल्हा नियोजन समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस खासदार धनंजय महाडिक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील,आमदार चंद्रदीप नरके, आमदार सत्यजित पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार सुजित मिणचेकर, आमदार उल्हास पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक यांच्यासह  जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक एच. टी. जगताप, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांच्यासह समितीचे सन्माननीय सदस्य, सदस्या उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्व कार्यान्वीत यंत्रणांनी त्यांच्याकडील योजनांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी तात्काळ सादर करुन हा निधी त्या त्या योजनांवर प्राधान्यक्रमाने खर्च करण्याचे निर्देश देवून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, यंदा जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत उपलब्ध झालेला निधी वेळीच खर्च करणे संबंधित खात्याची जबाबदारी असून आतापर्यंत खर्च झालेल्या विभागांनी तात्काळ प्रस्ताव मंजूर करुन घ्यावेत. अखर्चित रक्कम असणाऱ्या विभागांची स्वतंत्र बैठक घेवून याबाबत आढावा घेण्याची सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.
यंदा म्हणजे 2015-2016 या आर्थिक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यास जिल्हा वार्षिक योजना आराखड्यांतर्गत 321 कोटी 76 लाख 28 हजाराचा नियतव्यय मंजूर झाला असून आतापर्यंत 88 कोटींवर निधी वितरीत केला आहे. त्यापैकी जवळपास 56 कोटी रुपये विविध विभागांच्या माध्यमांतून खर्च करण्यात आले आहेत. उर्वरित निधी त्या त्या योजनांवर खर्च करण्याच्यादृष्टीने सर्व विभागांची दक्षता घ्यावी, अशी सूचनाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. या बैठकीत खर्चाच्या तरतुदींचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विभागनिहाय आढावा घेवून मार्गदर्शक सूचना केल्या.
पुढीलवर्षीच्या जिल्हा वार्षिक योजना प्रारुप आराखड्‌यासाठीचे प्रस्ताव तात्काळ देण्याची सूचना करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, हा आराखडा देतांना सर्व विभागांनी लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेवून सर्वसमावेशक प्रस्ताव दाखल करावेत. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांनी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव दाखल करताना संबंधित संस्थांच्या ठरावासह आराखडे सादर करावेत. पुढील वर्षीचा जिल्हा वार्षिक योजना आराखडा तयार करण्यासाठी सर्व यंत्रणांकडून प्रस्तावांचे एकत्रिकरण करुन प्रारुप तयार करावे आणि त्यास लहान गटाच्या समितीकडून छाननी करुन ते जिल्हा नियोजन समितीपुढे अंतिम प्रारुपास मान्यता देण्यासाठी ठेवावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.
कोल्हापुरातील सीसीटीव्ही यंत्रणेसाठी नाविण्यपूर्ण योजनेतून निधी
यंदाच्या जिल्हा वार्षिक योजना आराखड्यात विविध नाविण्यपूर्ण योजना हाती घेतल्या असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर शहरात सीसी टीव्ही यंत्रणेसाठी जिल्हा नियोजन समितीतून दोन कोटी आणि महापालिकेकडून साडेचार कोटी असा साडेसहा कोटीचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तलावातील गाळ काढण्यासाठी 2 एक्स्कॅव्हेटर खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच या अभियानांतर्गत 8 कोटी 19 लाखाच्या 98 कामांना 84 लाखांच्या निधीस मान्यता देण्यात आली. कोल्हापूर प्रादेशिक योजना तयार करण्यासाठी 30 लाख, जिल्हाधिकारी तहसिल कार्यालयामध्ये कॉम्पॅक्टर बसविण्यासाठी 1 कोटी 47 लाख, शालेय किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकीन पुरविण्यासाठी 34 लाख, इपीएनद्वारे हुमणी नियंत्रण उत्पादन केंद्र विकसित करण्यासाठी 35 लाख, सीपीआरमध्ये व्हेंटीलेटर पुरविण्यासाठी 30 लाख अशा अनेकविध नाविण्यपूर्ण योजनांचा समावेश करण्यात आला आहे.
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान अधिक गतिमान करण्यास प्राधान्य दिले असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या अभियानांतर्गत जिल्ह्यात पहिल्या वर्षी 69 गावांची निवड करुन 556 कामे पूर्ण केली आहेत. यापुढील काळात या अभियानात गावांचा सहभाग वाढविण्यासाठी जी गावे लोकसहभागाचा प्रत्यक्ष हिस्सा जमा करतील त्या गावांचा या योजनेत समावेश करण्यास प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांनी याबाबत पुढाकार घेवून जिल्ह्यातील अधिकाधिक गावात हे अभियान राबविण्याचे आवाहनही त्यांनी केले. जलयुक्त शिवार अभियानातून येत्या 5 वर्षात जिल्ह्यातील 1100 गावे टंचाईमुक्त करण्याचा निर्धार असल्याचेही ते म्हणाले.
जिल्ह्यात हत्तीं तसेच गव्यांपासून होणारे शेती पिकांचे नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्याची सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित विभागांना केली. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक दर्जेदार करण्याबरोबरच जे वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी केली. जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यू आणि डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाने आवश्यक उपाययोजना करण्याची सूचनाही त्यांनी केली. तसेच शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमीन सुधारणेसाठी कृषि आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची द्वीसदस्यीय समिती नियुक्त करुन त्यांचा अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करण्यात आलेल्या ठरावामध्ये कोल्हापूर विमानतळासाठी केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या निकषाप्रमाणे 1 कोटी 75 लाखाचा निधी देण्यास केंद्र शासनाने नकार दिल्यास राज्य शासनाकडून हा निधी वर्ग करण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. लघु पाटबंधारे योजनांसाठी खर्चाचे मापदंड 2009 चे असून भूसंपादन अन्य बाबीवरील खर्चात मोठी वाढ झाल्याने याबाबतचे सुधारित मापदंड शासनाने करावेत असा ठराव संमत करण्यात आला. जिल्ह्यातील ज्या वाड्यावस्त्यांवर अद्याप वीज पोहोचलेली नाही अशा 38 वाड्यावस्त्यांना वीजपुरवठा सुविधा पुरविण्यासाठी प्रस्ताव दिनदयाळ उपाध्याय योजनेतून करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. जिल्ह्यात यंदा सरासरीच्या 48 टक्के पाऊस पडला असून आगामी काळात निर्माण होणारी टंचाई परिस्थिती विचारात घेवून कृत्रिम पावसाचा प्रयोग कोल्हापूर जिल्ह्यातही राबवावा, असा ठराव आजच्या बैठकीत करण्यात आला. जिल्ह्यात आणेवारी निश्चित करताना 33 टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रशासनामार्फत सर्व्हेचे काम हाती घेतले असून हे काम तात्काळ करण्याची सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
यावेळी जलयुक्त शिवार अभियानाचाही आढावा घेण्यात आला. प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांनी स्वागत प्रास्ताविक केले. शेवटी सहाय्यक नियोजन अधिकारी बी. जी. देशपांडे यांनी आभार मानले.


000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.